संसार म्हणजेच सर्व काही का?

 

घटस्फोटित आणि एकटी राहणारी वसुधा सर्वांसाठी एक “बिचारी” स्त्री होती…नवऱ्याचा जाचाला कंटाळून अखेर तिने एकटं राहण्याचा निर्णय घेतला, आई वडिलांवर ओझं नको म्हणून छोटीशी नोकरी करून ती आपलं पोट भरत होती…पण समाधानी होती…लोकं आपल्याकडे ‘लाचार’ म्हणून दयेची भीक घालताय हे तिला अजिबात आवडत नसे…

जो तो तिला सहानुभूती दाखवे…आपण कमावते आहोत, सर्व गोष्टी करायला सक्षम आहोत..अडीअडचणीला धावून येतील अश्या काही मैत्रिणी आहेत…ऑफिस मधल्या कामात चांगला वेळ जातो, आल्यावर छान पदार्थ बनवण्यात आणि tv पाहण्यात वेळ जातो…सुट्टीच्या दिवशी फेरफटका मारून येते…वाचनालयात जाते..मंदिरात जाते…आयुष्य सुखाने चाललंय…पण केवळ ‘नवरा’ सोबत नाही आणि मला संसार नाही म्हणून सगळं संपतं का?

पण बिल्डिंग मधल्या लोकांना हे केव्हा आणि कसं सांगणार…

गणपतीचे दिवस होते…वसुधा सुद्धा सर्व कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाली..पण सहानुभूती च्या नजरा आणि कुजबुज तिच्या नजरेतून काही सुटली नाही…
संगीतखुर्ची मध्ये तिचा नंबर आला..सोसायटीतल्या लोकांनी छान बक्षीस समारंभ ठेवलेला…ती बक्षीस घ्यायला वर गेली..आणि समोरच्या गर्दीतून कुजबुज ऐकू येत होती…’बिचारी….’

तिची सहनशक्ती सम्पली…तिने माईक मागितला आणि बोलायला सुरुवात केली..

“तुम्हाला माझ्यात ‘बिचारी’ स्त्री दिसावं याहून मोठं माझं दुर्भाग्य नाही…मान्य आहे मी घटस्फोटित आहे..मला स्वतःचा संसार नाही…पण संसार नाही म्हणून काहीच नसतं का? संसार हेच सर्वस्व असतं का? मी स्वाभिमानाने चार पैसे कमावून स्वतःचं पोट भरतेय…मला भरपूर वेळ मिळतो..तो मी वाचनात आणि इतर गोष्टीत घालवते…मला खूप आनंद मिळतो…मी अगदी सुखी आहे..त्यामुळे माझ्या बाबतीत सहानुभूती दाखवली नाही तर फार बरं होईल..”

“पोरी…अगं नवरा असला की एक मानसिक आधार असतो… म्हातारपणी आपली सोबत असते…”

समोरच्या गर्दीतून एकजण बोलला…

“आणि त्या स्त्रियांचं काय ज्या सतत नवऱ्याच्या मानसिक दबावाखाली असतात? अगदी शेवटपर्यंत नवऱ्याच्या जाचाखाली वावरत स्वतःचं आयुष्य विसरून जातात..त्यांना तर सुटकेचा मार्गही नसतो…म्हातारपणी तर नवरा आजारी असेल तर आपलं म्हातारपण विसरून त्याचं इतकं करावं लागतं की आपली दुखणी बाजूला राहतात..सगळेच नसतील असे पण काही अंशी आहेतच ना? मग मी भाग्यवान म्हणायची..स्वतःच्या नियमांनी आयुष्य जगतेय…”

“ते असेल..पण शारीरिक गरजांचं काय? आणि एकटी स्त्री असली तर ती सुरक्षित नसते…”

“आयुष्यातले असे किती दिवस जोडपी शारीरिक सुख अनुभवतात? 2 मुलानंतर वेगवेगळ्या खोलीत झोपणारी जोडपी मी पाहिली आहेत…आणि मनावर संयम असला की सगळं शक्य होतं… आणि राहिला प्रश्न सुरक्षिततेचा…तर स्त्री अगदीच हात पाय गाळून बसणारी असेल तर ती सुरक्षित असेलच कशी?? प्रसंगाशी दोन हात करण्याचं आणि जवळ हत्यारं बाळगून स्व संरक्षण मी जर करत असेन तर हेही निभावून जातं….आणि संसाराच्या नावाखाली सुखी आयुष्य जगणारी आहेत तरी किती? बऱ्याच ठिकाणी संसार म्हणजे तडजोड, मानसिक लाचारी, दुःखं आणि घुसमट.. आयुष्यभर नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी, मुलांसाठी आयुष्य घालवायचं… आणि पदरी निराशा घेऊनच जगाचा निरोप घ्यायचा…मी भाग्यवान आहे की मी त्यांच्यातली नाही…”

“मुलंबाळं?? ती नकोत??”

“लग्न होऊन मूल न होणाऱ्या स्त्रिया मी पहिल्या आहेत..वांझोटी म्हणून लांच्छन लागणं.. मूल होत नाही म्हणून घटस्फोट घेणं…ट्रीटमेंट घेताना औषधांच्या अतिवापराने शरीराचा खेळखंडोबा होणं… मी भाग्यवान नाही का की मला यातलं काहीही नाही म्हणून? आणि राहिला प्रश्न संतानाचा…मी ठरवलं आहे की एक मूल दत्तक घेणार…म्हणजेच माझ्या आयुष्यासोबत त्याचंही आयुष्य मार्गी लागेल…”

आता मात्र गर्दी निःशब्द झालेली..

“संसार करण्याचा विरोधात मी नाही..पण मला हेच म्हणायचं आहे की संसार करून आणि न करून अमुक वा तमुक दुःखं प्रत्येकाच्या पदरी कमी अधिक पडतातच…उगाच एखादं जोडपं सोबत आहे, संसार करताय म्हणजे ते सुखी आहे असा अर्थ होत नाही..आणि घटस्फोट झालेली महिला लाचार आहे असा होत नाही..त्यामुळे कृपया मला सहानुभूती देणं टाळा…मी माझ्या आयुष्यात सुखी आहे…”

गर्दीने साक्षात सकारात्मकतेची मूर्ती डोळ्यादेखत पहिली आणि आपली मानसिकता बदलण्याचा किंचित का असेना…पण विचार केला…

6 thoughts on “संसार म्हणजेच सर्व काही का?”

  1. अगदी माझ्या मनातलं.. माझ्या बाबतीत असंच घडतं.. मलाही सहानुभूती नको असते.. मी अतिशय आनंदी असते..
    पण लोकांना उत्सुकता असते.. माझ्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची.. मला सांगण्याची इच्छा नसली तरीही.. लोकांचे प्रश्न थांबत नाहीत.. तू पुन्हा लग्न कर.. लोकांचा प्रेमळ सल्ला असतोच.. त्यांचं कदाचित बरोबरही असेल.. पण जीला तिला आपलं व्यक्तिगत आयुष्य जगू द्यावं लोकांनी.. उगाच ढवळाढवळ नको असं वाटतं.. अनेकदा..

    Reply
  2. अगदी माझ्या मनातलं.. माझ्या बाबतीत असंच घडतं.. मलाही सहानुभूती नको असते.. मी अतिशय आनंदी असते..
    पण लोकांना उत्सुकता असते.. माझ्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची.. मला सांगण्याची इच्छा नसली तरीही.. लोकांचे प्रश्न थांबत नाहीत.. तू पुन्हा लग्न कर.. लोकांचा प्रेमळ सल्ला असतोच.. त्यांचं कदाचित बरोबरही असेल.. पण जीला तिला आपलं व्यक्तिगत आयुष्य जगू द्यावं लोकांनी.. उगाच ढवळाढवळ नको असं वाटतं.. अनेकदा..

    Reply
  3. Kharach… Aajchi paristhiti pn ashich aahe.. aaj hi kityek striya navryacha jaach sahan karat rahat aahet…. Jo pryant samajache vichar badalat nahit toparynt hya goshti ashyach chalat rahnar aahet

    Reply
  4. तिने तिचे स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगावे. तिने त्रास का सहन करावा समाजाला का घाबरावे.

    Reply

Leave a Comment