श्रीमंती

दोघींचा अपघात झाल्याची बातमी कळताच घरात सर्वांची धावपळ उडाली…अर्चना आणि नेहा..दोघी मैत्रिणी स्कुटर वरून बाजार आणायला गेलेल्या, येतांना समोरून येणाऱ्या ट्रक ला त्या धडकल्या… दुखापत गंभीर होती…लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचा घरी कळवलं…
अर्चना एकत्र कुटुंबात वाढलेली, लग्नानंतरही एकत्र कुटुंबात राहणारी…नेहाचा मात्र राजा राणीचा संसार..या दोघांनाही नातेवाईक, मित्र, शेजारी नको असायचे… फक्त तू अन मी…असा नेहा आणि तिच्या नवऱ्याचा स्वभाव…घरात दोघेच, अनय ला भरघोस पगार…त्यामुळे दोघांची चंगळ असायची…विकेंड ला बाहेर जाणं, महिन्यातून एकदा बाहेरगावी फिरायला जाणं… आयुष्य अगदी एन्जॉय करत होते दोघे..
याउलट अर्चना…तिला स्वतःसाठी असा वेळच मिळेना..घरात 10 माणसं… कमावणारे कमी…मग हौसमौज तर सोडाच, पण काही घ्यावेसे वाटले तरी ते बोलून दाखवता येत नसे…नवरा बिचारा त्याच्या आवाक्यात जेवढं होईल तेवढं बायकोसाठी करत असे…
अर्चना आणि नेहा, शाळेपासून मैत्रिणी… नेहा ने घर बदललं आणि योगायोगाने अर्चना च्या घराजवळ ती राहायला आली.
अर्चना ला तिला भेटून खूप आनंद झाला…तिच्याशी किती गप्पा मारू अन किती नको असं झालं…पण तिला आठवलं, घरी पुतण्या शाळेतून येईल, त्याला नाष्टा बनवायचा आहे….अर्चना नेहाचा निरोप घेऊन लगेच निघाली…

दोघींच्या भेटीगाठी होत राहिल्या, अर्चना ला नेहा चं सुखी आयुष्य पाहून हेवा वाटू लागला…तिची प्रायव्हसी, हौसमौज पाहून अर्चना ला ईर्षा वाटू लागली…तिच्या स्वभावात बदल होऊ लागला..ती चिडचिड करू लागली…आपल्यालाही नेहा सारखं आयुष्य का नाही मिळालं म्हणून आतल्या आत कुढु लागली..
एकदा नेहा ने तिला शॉपिंग साठी सोबत यायचा घाट घातला..अर्चना ला नाही म्हणता येईना…नेहा ने तिची स्कुटी काढली आणि दोघी निघाल्या..
रस्त्यावर बरीच गर्दी होती, नेहा ओव्हरटेक करायला गेली आणि समोरच्या ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिली..
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दोघींच्या घराची एकच धावपळ उडाली…
नेहा चा नवरा आला,
“माझ्या बायकोची ट्रीटमेंट इतक्या छोट्या हॉस्पिटलमध्ये करणार नाही” म्हणून त्याने तिला दुसरीकडे शिफ्ट केलं..
अर्चना च्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, आपण इतके श्रीमंत नाही की मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करून अर्चना ची ट्रीटमेंट करावी…
दुखापत जास्त नव्हती पण किरकोळही नव्हती…

नेहा ला अनय ने नवीन हॉस्पिटलमध्ये भरती केलं खरं, पण सोबत कुणीही नव्हतं..तो एकटा किती करणार… नातेवाईकांशी संपर्क नव्हता त्यामुळे कुणी येणार नव्हतं.. आई वडील दूर गावी…शेजारी पाजारी कुणाशी संबंध नव्हता…अनय एकटाच सगळं काही करत होता…
“मिस्टर अनय, ताबडतोब ऑफिस ला या, लंडन वरून कलाइन्ट आले आहेत..”
अनय मोठ्या जबाबदारी च्या पदावर असल्याने त्याला कामंही तशीच होती..अखेर नाईलाजाने नर्स च्या भरवशावर नेहा ला सोडून त्याला ऑफिस ला जावं लागलं..
नेहा साठी डॉकटर ने औषधं लिहून दिली, ती आणायला कुणी नव्हतं…भूक लागली असता नर्स ने हॉस्पिटलचं जेवण आणून दिलं, ते काही घशाखाली उतरेना…नेहा अगदी एकटी पडली… अंगावरच्या जखमांपेक्षा एकटेपणाची सल जास्त बोचू लागली…
तिकडे अर्चना हॉस्पिटलमध्ये आहे ऐकून तिथे एकच गर्दी जमली…नातेवाईक, शेजारी, मैत्रिणी… अर्धे हॉस्पिटल तिला पाहायला येणाऱ्यांनीच भरले होते..
“वहिनी, मी डबा आणते…”
“अगं मी आणणार आहे…आधीच सांगितलंय तसं मी.”
“नाही…मी आणणार डबा…”
डबा मी आणणार यावरून प्रेमळ वाद वहिनी, जाऊ, बहीण यांत होऊ लागला…
“रात्री अर्चना जवळ आम्ही थांबणार…” म्हणून जवळपास दहा लोकं तयार झाले…
“काकू, तुला बाऊ झाला?”
“सुनबाई…दुखतंय का गं जास्त? बघू पाय, मी चोळून देते..”

“वहिनी, तुम्हाला काय खाऊ वाटतंय? मी बनवून आणते..”
“ताई, एवढं खाऊनच घ्यायचं ह..मी माझ्या हाताने भरवते..”
अर्चना ची काळजी करायला लोकं न सांगता धावून आलेली..तिच्या कुटुंबातील सर्वजण “आमची वहिनी” म्हणून हॉस्पिटलमध्येच थांबलेले…घरी जायची ताकीद दिली तरी कुणी हलेना…
अर्चना चा नवरा तिच्या जवळ आला..अर्चना ने विचारले,
“नेहा कशी आहे..?”
“तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलंय..”
असं म्हणत तो रडू लागला…
“माझी ऐपत असती तर मीही…पण मी नाही गं इतका श्रीमंत..”
“कोण म्हटलं तुम्ही श्रीमंत नाही? भलेही पैशाने आपण नसू श्रीमंत, पण आज आपण कमावलेल्या माणसांच्या श्रीमंतीची ओळख पटली मला…कुणालाही न बोलावता आज इतकी माणसं धावून आली माझ्यासाठी.. लहान पुतण्या सुद्धा काकू आजारी आहे म्हणून काळजीत पडलाय…सासूबाई देवाच्या धावा करत होत्या, सासरे काळजीने नुसते येरझारा घालत होते..नणंद बाई तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी सोडून धावत आल्या..खरंच, किती श्रीमंत आहे मी…जाणीव आज झाली मला….”


3 thoughts on “श्रीमंती”

Leave a Comment