शेरास सव्वाशेर

 “अरे हिचा बायोडेटा नीट पाहिला नव्हतास का? डिओर्स झालाय तिचा..तुला हीच मिळाली का?”

“अगं आई मी खरंच नीट पाहिलं नाही, फोटो बघितला अन आमंत्रण देऊन आलो..”

“अरे देवा..आमंत्रण देऊनही आलास? कर्म माझं..आता काहीतरी वेगळं कारण सांगून नकार द्यावा लागेल..”

“हो पण आमंत्रण दिलं गेलंय, येऊ देत त्यांना..नंतर बघू..”

“बरं.. दिसायला सुंदर आहे, शिक्षण आणि नोकरी उत्तम आहे..अविवाहित असती तर विचार केला असता..”

इरावती चिडचिड करत निघून गेली. आधीच कॉलेजमध्ये व्याख्यान देऊन दमली होती. इरावती नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरीला होती. भाषणात तिचा हात कुणीही धरू शकत नव्हतं. नुकत्याच एका कॉलेजमध्ये स्त्रीवादी व्याख्यानाला ती गेली होती. तिथे स्त्री स्वातंत्र्य आणि समाज दृष्टिकोन या विषयावर तिने तासभर व्याख्यान दिलं होतं. त्यात विधवा अन घटस्फोटित महिलांना मिळणारी तुच्छ वागणूक यावर सडेतोड भाषण दिलं, पण घरी आल्यावर मात्र “लोका सांगे ब्रह्मज्ञान” अशी वृत्ती.

ठरल्याप्रमाणे मुलगी अन तिचा मोठा भाऊ घरी आले. इरावतीने त्यांना अनिच्छेनेच चहा नाश्ता केला. आधीच यांच्यासाठी तिला कॉलेजमधून हाफ डे घ्यावा लागलेला.त्यात मोठ्यांना  न बोलवता फक्त पोरं आली..सुयश मंजिरी कडे बघतच राहिला. तिचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ करणारी नजर यात तो पूर्ण हरवून गेलेला. 

“तुम्हाला आमची मंजिरी पसंत असेल तर फोन करून कळवा.. वेळ घ्या तुम्ही..”

मंजिरीचा मोठा भाऊ म्हणाला. 

“पसंत आहे.”

सुयशच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले. हे ऐकून इरावती मात्र चिडली..

“काय बेडबिड लागलंय का तुला?? ती घटस्फोटित आहे माहितीये ना?”

“आम्ही तसं बायोडेटा मध्ये दिलं होतं की आधीच..काही लपवलेलं नाही आम्ही..”

“हो..पण आमच्या कारट्याने कुठे पाहिलं ते. अन दिलं आमंत्रण तसंच. हे बघा, चुकून तुम्हाला आमंत्रण दिलं गेलं आहे..असंही आम्ही यानंतर नकारच देणार होतो. “

“वाह..इरावती मॅडम वा..” इतका वेळ शांत असलेली मंजिरी बोलायला लागते.

“मॅडम..ऐकलं आहे की तुम्ही स्त्रीवादी विषयांवर मोठमोठे भाषणं देतात..पण स्वतः मात्र काहीही अंमलात आणत नाही हे आज दिसलं.”

“वा गं… मला शिकवतेस काय? एक तर घटस्फोटित, वर इतका रुबाब??”

“कसं आहे ना, मी ना विवाहित होते ना माझा घटस्फोट झाला होता..मी अविवाहित आहे आणि घरच्यांनी नुकतंच माझ्यासाठी मुलगा बघायला सुरवात केली होती. त्यात एका नातेवाईकाने मला सुयश चा बायोडेटा दाखवला, त्यात तुमचा हुद्दा अगदी ठळकपणे लिहिला होता. योगायोगाने तुम्हीच कॉलेजमध्ये भाषण दिलं आणि मी तुम्हाला ओळखलं. तेव्हा मुद्दाम मीच बायोडेटा मध्ये फेरफार करून घटस्फोटित असं टाकलं. मला बघायचं होतं, बोले तैसा चाले अशी माणसं आहेत का या घरात म्हणून, पण तुम्ही हे सिद्ध केलंत, की बाहेर कितीही भाषणं दिलीत तरी स्वतःच्या घरात स्त्रीला पुन्हा तोच तुच्छपणा द्यायचा. यापुढे लक्षात ठेवेन अन मैत्रिणींनाही सांगेन, जे बोलतात ते करून दाखवणारी माणसं असतील त्याच घरात पाऊल ठेवा..”

एवढं सांगून दोघे निघून गेली, इरावती चा आत्मविश्वास अगदी खालावून गेला, एका तडफदार मुलीने त्यांच्या भाषणातील सडेतोडपणा काही क्षणात गारद केला..सुयशही आईच्या चुकीमुळे इतकी सुंदर मुलगी हातातून गेली म्हणून चरफडत राहिला…

6 thoughts on “शेरास सव्वाशेर”

Leave a Comment