शिदोरी

“काय दिवसभर साफसफाई करत असतेस…जरा बाकीच्या गोष्टीतही लक्ष घालत जा की जरा..”

सासूबाई आपल्या सुनेला रागवत होत्या..

“अहो फार धूळ येते हो घरात…कितीही साफसफाई करा…स्वच्छ वाटतच नाही..”

“अजून किती स्वच्छ पाहिजे घर?”

अभ्यासात आणि विविध कलागुणांमध्ये निपुण असलेली रिया लग्न झाल्यावर संसारात रमली होती. नवऱ्याने आणि सासूने तिला बाहेर पडण्यासाठी, नोकरीसाठी प्रोत्साहन दिलं पण रिया आता घर आणि संसार यातच प्राथमिकता देत होती…

नवऱ्याला बरं वाटलं, रिया घराकडे इतकं लक्ष देते की त्याला घरात तक्रार करायला काहीही कारण उरत नाही…

अशातच सासूबाई चिडचिड करू लागल्या… घरात सर्वांशी बोलणं सोडून दिलं…एकाकी राहू लागल्या…रिया चं कुठलं वागणं त्यांना सलत होतं देव जाणे…

सुनेला समजेना..आपलं काय चुकलं? सासूबाई अश्या का वागताय मधेच?

एकदा सुनबाई कंदिलची काच स्वच्छ करत होती..कितीतरी वेळ..आतून बाहेरून पुसून पुसून काच अगदी लक्ख केलेली..साधारण 15 मिनिटं हा खटाटोप चालला आणि रिया ने काच स्वच्छ झाल्याचा निःश्वास सोडला…

ते पाहून सासूबाई गरजल्या,

“नुसती काच स्वच्छ असून चालत नाही…आत ज्योतही असावी लागते…”

सासूबाईना असं मधेच काय झालं? ती घाबरली…

“आई काय झालं?”

तिच्या या प्रेमळ शब्दांनी सासूबाईंना रडू आलं…त्या सांगू लागल्या…

“पोरी, मीही तुझ्यासारखंच आयुष्य काढलं, घर एके घर…त्या काळात बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण मीही तुझ्यासारखीच घर संसारात रमले होते..पण एक वेळ अशी आली की मला गृहीत धरलं गेलं…घरातल्या कष्टांची जाणीव कोणी ठेवली नाही…तुझ्यासारखंच मी घर सतत स्वच्छ करत असायचे…इतकं की धूळही आत यायला घाबरायची…पण बाहेरची स्वछता करता करता आतली स्वछता राहून गेली…मनावर धूळ चढली होती, मरगळ चढलेली..आयुष्यात काहीही नावीन्य नव्हतं..जे काम मी रोज करत होते त्याचा काही काळाने कंटाळा येत गेला…मी नवीन गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरवात काय केली तर सर्वांना माझ्या कामाची इतकी सवय झालेली की माझं दुसरीकडे लक्ष असणं कुणालाही सहन झालं नाही..माझ्या आयुष्याला नवीन आकार देण्याच्या प्रयत्नाला सर्वांनी धुडकवलं… का? कारण मीच सर्वांना माझी असण्याची, माझ्या कामाची इतकी सवय करून दिलेली की त्या साच्यातून मला बाहेर काढणं त्यांना अवघड झालं…पुन्हा मला त्याच खाईत लोटलं गेलं..माझ्या वाट्याला जे आलं ते तुझ्या वाटेला येऊ नये…म्हणून जीवानिशी सांगतेय गं..”

“सासूबाई, समजू शकते मी…एक माऊलीच असा विचार आपल्या सुनेसाठी करू शकते…पण तुम्ही सांगा मला, काय करू मी नेमकं?”

“बाहेर पड… नोकरी कर किंवा काहीही उद्योग सुरू कर..हक्काचे चार पैसे कमव, म्हणजे उद्या माझ्यासरखं तुला परावलंबी राहण्याची गरज पडणार नाही…तू हुशार आहेस, घराव्यतिरिक्त इतर गोष्टीत हुशारी दाखव…तुला घरातल्या पिंजऱ्यात बंद झालेलं मला पाहायचं नाहीये, काहीतरी ध्येय बनव…सकाळी उठायचं ते आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठीच…काहीतरी उदात्त ध्येय असुदे…आणि ध्येय कधीही विसरू नकोस, नाहीतर आहे त्यात संतुष्ट राहायची सवय लागेल…”

रिया मधलं हरवलेलं तेज आज सासूबाईंनी पुन्हा जागृत केलं…तिच्यातली विझलेली ज्योत आज पुन्हा तेवती केली..

कोण म्हणतं संस्कार फक्त आई वडीलच करतात…आईसमान सासू सुद्धा उर्वरित आयुष्यासाठी संस्कारांची शिदोरी देत असते…

Leave a Comment