शिक्षणातलं घरकाम

 आपल्याला घरकाम करणारी सून हवी यावर इंदूताई ठाम होत्या. खूप स्थळं येत होती, जवळपास प्रत्येक मुलगी काहीना काही नोकरी करत होती आणि त्या प्रत्येकीला नकार दिला गेलेला. मनोजला हे काही पटत नव्हतं पण आईच्या हट्टापुढे काय चालणार. 

“शिकलेल्या मुली नोकरी करणार, मग तिच्या नोकरीसाठी आपण तडजोड करायची, वर तिचा पगार आपल्याच घरासाठी कामात येईल याची काय शाश्वती? नकोच उगा ती झंझट..”

पण अशी कमी शिकलेली मुलगी काही मिळेना. या काळात त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं. मुलाचं लग्न होणार म्हणून नवीन घर बांधण्यात येत होतं. त्या कामानिमित्त बिल्डरचं घरी येणं जाणं असायचं. पण एका trannsaction वरून दोघांत वाद सुरू होते. मनोजचं म्हणणं की पैसे दिलेत पण बिल्डर म्हणे ते आलेच नाही. केस कोर्टात न्यायची वेळ आलेली. 

एके दिवशी बिल्डरची मुलगी, साधारण 22 वर्षाची असावी. अंगभर पोशाख आणि निरागस चेहरा असणारी ती घरी आली पण कुणीही तिला ओळखलं नाही. आल्यावर तिने दारातच सर्वांना नमस्कार केला.

“नमस्कार, मी मंजिरी कामत..कामतांची मुलगी..”

घरात सर्वजण शंकेने पाहू लागले.

“पैशांचा जो घोळ आहे त्यावर बोलायला आलीये, बाबा आजारी आहेत त्यामुळे त्यांना आराम करायला सांगून मी त्यांची कामं करतेय..मीही सिव्हिल इंजिनिअर आहे..”

मंजिरी आत आली. सर्व प्रकरणाची नीट माहिती घेतली आणि मग तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली,

“माफ करा, चूक आमची आहे.. तुम्ही शेवटचं पेमेंट UPI ने केलं त्यामुळे त्याची छापील रिसीट बाबांच्या फाईल मध्ये दिसली नाही. बाबांना कागदोपत्री सगळी तपासायची सवय. त्यामुळे हे सगळं झालं.तुम्ही पेमेंट केलं आहे..आपण पुढचं काम सुरू करूया..”

इंदुमती बाईंना नवल वाटलं. नाजूकशी पोर, प्रकरण कोर्टात जाणार होतं ते हिने काही मिनिटात सोडवलं..

त्यानंतर घराचं काम पूर्ण झालं. आता इंटेरिअर बाकी होतं. मनोजने एका कंपनीला काम दिलं आणि शिखा नामक इंटेरिअर डिझाइनर त्या कामानिमित्त घरी आली. घराचं पूर्ण रूप बघून तिने सुंदर कल्पना दिल्या.

“सिंकच्या जवळ भांड्यांची टोपली जागा अडवते, त्यापेक्षा आपण सिंकच्या वर भिंतीलाच inbuilt जाळी बसवू शकतो..”

इंदुमती: “कंपनीची आयडिया आहे का ही?”

शिखा: “नाही, आमच्या घरात कामं करत असताना मला एका गृहिणीच्या अडचणी लक्षात येतात, आणि त्यामुळे मी अश्या आयडिया देऊ शकते..”

इंदुमती: “तू घरातली कामही करतेस?”

शिखा: “हो मग, सकाळी आईला मदत करते. भाजी टाकते, भांडी घासते, कपडे वाळत घालते, पापड कुरडया करायला मदत करते, रात्रीची भांडी मीच घासते..वेळापत्रक बनवलं आहे मी, त्यानुसार घरातलं काम आणि ऑफिसचं काम अगदी वेळेत होतं.. सतत बिझी असल्याने मन active राहतं..”

इंदुमती: “अरेवा..आम्हाला अजून अश्या छान छान आयडिया सांग बरं..”

“टेरेस मध्ये एक उंचवटा बांधून घ्यायला हवा..आपण धान्य वगैरे वाळवतो तेव्हा पूर्ण टेरेस धुवावा लागतो. पण घाई असेल तेव्हा फक्त एवढा उंचवटा धुवून धान्य वाळवता येईल..”

मनोजने एकेक आयडिया ऐकून घेतल्या आणि इंदुमतीनेही संमती दिली. 

“मॅडम एकदा देवघर बघून घ्या, तिथे काही करता आलं तर बघा..”

सर्वजण देवघराच्या खोलीकडे जातात. फरश्या बसवायच्या अजून बाकी असतात. सर्वजण पटापट आत जातात पण शिखा बाहेरच उभी राहते. तिची सँडल काढते आणि मग आत येते…आणि मग पुढचे सजेशन देते..

संध्याकाळी इंदुमती बाईंना फोन येतो..

“इंदू, अगं तुला हवी तशी एक शाळा न शिकलेली मुलगी शोधली आहे, दिवसभर घरात राहून कामं करेन बघ..”

इंदुमती शांततेत म्हणाली,

“माझं मत आता बदललं आहे, मला मनोज साठी शिकलेली मुलगीच हवीय. शिकलेल्या मुली आपलं शिक्षण आणि हुशारी फक्त गर्व बाळगायला, बाहेर आवाज करायला आणि पैसे कमवून दुसऱ्याला किंमत न देण्यासाठी वापरतात हा माझा गैरसमज दूर झाला. बिल्डरची ती मुलगी, नम्रपणे सगळं तिने हाताळलं. इंटेरिअर करणारी ती मुलगी, घरातल्या बारीकसारीक गोष्टी तिला माहिती, देवघरात चप्पल घालून जायचं नाही हे आम्हाला नाही पण तिला सुचलं..ही हुशारी, ही नम्रता, ही विशाल दृष्टी शिक्षणानेच येते..”

इंदुमतीचं मतपरिवर्तन झालेलं पाहून मनोजलाही बरं वाटतं..

________

❤️❤️❤️ईरा दिवाळी अंक 2021 ❤️❤️❤️
मर्यादित प्रति..
आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

2 thoughts on “शिक्षणातलं घरकाम”

Leave a Comment