व्हाट्सअप्प ग्रुप चे admin आहात? तुम्हालाही सायबर क्राईम कडून फोन येऊ शकतो…
“नमस्कार मी श्री. **** बोलतोय सायबर ब्रँच कडून, तुमच्या विरोधात व्हाट्सअप्प ग्रुप बद्दल गुन्हा दाखल झाला असून लवकरच तुमच्यावर कारवाई करण्यात येईल..”
घरात बसून आरामात मोबाईलवर टाइमपास करणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीला जर असा फोन आला तर काय वाटेल? नक्कीच घाबरगुंडी उडेल ना?
तुम्ही जरी चांगल्या हेतूने एखादा व्हाट्सअप्प ग्रुप बनवला असेल तरी त्यातील मेम्बर्स च्या चुकीच्या वर्तुणुकीने ग्रुप अडमीन काहीही चूक नसतानाही धोक्यात येऊ शकतो.
साधारण 2 वर्षांपूर्वी मी एक मोफत ऑनलाइन ट्युटोरिअल साठी एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवला होता, विद्यार्थी जास्त असल्याने प्रत्येकाला ऍड करणं शक्य नव्हतं… मग मी ग्रुप invite लिंक शेयर केली, माझ्या फेसबुक पेजवर शेयर केली. अनेक विद्यार्थी जॉईन झाल्याने ग्रुप फुल झाला आणि म्हणून मी अजून 3 ग्रुप बनवून त्याच्या लिंक्स दिल्या. काही महिने मी ट्युटोरिअल घेतली, पण नंतर काही कारणास्तव ग्रुप वर काहीही अपडेट दिले नाही. सेटिंग only admin can send message अशी करून ठेवली जेणेकरून सर्वांच्या मेसेज चा एकमेकांना त्रास नको. त्यानंतर ग्रुप बंदच राहिला आणि तो तसाच पडून राहिला.
आता या गोष्टींमुळे मला भविष्यात इतका मोठा मनस्ताप सहन करावा लागेल याची मुळीच कल्पना नव्हती.
साधारण 2 वर्षांपूर्वी फेसबुक पेजवर टाकलेल्या त्या ग्रुप वर काही दिवसांपूर्वी एक अनोळखी इसम ऍड झाला. त्या व्यक्तीने ग्रुप मधील काही महिलांना आक्षेपार्ह पोस्ट पाठवल्या, काही वेळाने मलाही तसे मेसेज आले आणि की तात्काळ त्या व्यक्तीला ब्लॉक केले. ग्रुप मधून त्याला remove करण्यासाठी त्याचा नंबर ग्रुप मध्ये शोधत होते, इतक्यात दुसरं काम निघालं आणि मोबाईल बॅटरी discharge झाली. पण या काळात गृप मधील कुणीतरी तात्काळ पोलिसात तक्रार केली आणि ग्रुप admin म्हणून माझ्यावरही संकट ओढवले गेले.
तुमच्यावर कारवाई होईल असं तत्सम पोलिसांनी मला सांगितलं, आता या गोष्टीसाठी खरं तर मी घाबरले नाही, कारण माझी काही चूक नव्हती. मी सत्य परिस्थिती पोलिसांना सांगितली. इतर अनेक पोलिसांशी सम्पर्क झाला, भीती ती नव्हती…भीती ही होती की फोनवरील माझं संभाषण घरातील मंडळी ऐकत होती आणि नाना प्रकारचे प्रश्न विचारत होती. मी तर घाबरले नव्हते पण पोलीस, complaint, कारवाई, नोटीस हे शब्द ऐकून कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला भीती वाटणारच. त्यांना मी सत्य सांगितलं आणि घाबरायचं काही कारण नाही हेही सांगितलं. कारण मला हे सर्व माझ्या परीने हँडल करायचं होतं.
पोलिसांशी माझे फोन सुरु होते, त्यांनी सांगितलं की तो नंबर दुबई चा असून ती व्यक्ती महाराष्ट्रात राहतेय, त्या नंबर ला आपल्याला फोन करता येत नाही, मात्र तिकडून फोन येऊ शकतो. त्यांना मी माझी बाजू नीट समजावून सांगितली, मग त्यांनी मला हमी दिली की तुम्हाला काहीही होणार नाही फक्त तुम्ही काही प्रोसिजर फॉलो करा. त्या पद्धतीने मी सगळं करून स्वतःची सुटका करून घेतली.
एकंदरीत माझा व्याप बघता हे असलं काहीतरी कधीतरी होणार याची कल्पना मला होतीच. पण ह्या गोष्टी घडणं नक्कीच एखाद्याला मनस्ताप देऊ शकतं.
त्यामुळे तुम्ही जरी चांगल्या भावनेने एखादा व्हाट्सअप्प ग्रुप बनवला तरी त्यात अनोळखी व्यक्ती नसाव्यात याची खात्री बाळगा. ग्रुप वर कुणी आक्षेपार्ह पोस्ट टाकत नाहीये ना याची पडताळणी करा. ग्रुप च्या लिंक्स ओपन ठेऊ नका. मागे पडलेले ग्रुप तात्काळ डिलीट करा. ग्रुप मधील कुणालाही एखाद्या मेम्बर ने त्रास दिला तर आधी admin ला कळवा असं ग्रुप मध्ये जाहीर करा. असं काही घडलं तर ग्रुप मधून तात्काळ त्या व्यक्तीला काढून टाका.
दुर्लक्ष केले तर पुढचा फोन तुम्हाला असेल…
पण ग्रुप चे सेटिंग ओन्ली ऍडमिन असे असताना त्या इसमाने ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट कशी टाकली.
खबरदारी घेण्यास सोयीचे व्हावे म्हणून विचारत आहे. गैरसमज नसावा