विटाळ

विटाळ

सासूबाईंच्या आई सुधा च्या घरी राहायला आल्या तेव्हापासून त्यांचं एकच तुणतुनं..

“कशाला हात लावू देतेस तिला चार दिवस? विटाळ धरायचा असतो विटाळ..”

“काय आई तुपण.. आज जमाना कुठे चाललाय आणि तुझं काय चाललंय…आम्ही काही मानत नाही हे असलं..”

“मुलगीच ऐकत नाही म्हटल्यावर नातसून तरी कशी ऐकेन..”

आजीबाई बरेच दिवस सुट्टी काढुन मुलीकडे राहायला आल्या होत्या..त्यांनी घरात सगळं निरीक्षण केलं… कोण कसं काम करतं, कधी करतं…एकदा सुधा ला त्यांनी मेडिकल मधून पॅड आणताना पाहिलं आणि त्यांना समजलं की सुधा ला मासिक धर्म आहे…तरीही सुधा सगळं करत होती हे पाहून त्यांना जरा राग आला…

सुधा सकाळी लवकर उठून घरातलं आवरून ऑफिस ला जायची, सासरेबुवांच्या पूजेसाठी फुलं आणणं, मंदिरात जाऊन पूजा करणं, घरी येऊन घरातलं आवरणं, सडा रांगोळी करणं, स्वयंपाक करणं हे तिचं रोजचंच काम..

पुढील महिन्यात सुधा ला मासिक धर्म सुरू झाला तेव्हा मात्र अजीबाईंनी आक्रमक पवित्रा घेतला..

“तिला वेगळं ठेवलं नाही चार दिवस तर मी कधीच या घरात पाय ठेवणार नाही.”

सुधा च्या सासूबाईंनी खूप समजावलं…अखेर दोघी मायलेकीत वाद नको म्हणून सुधा ने स्वतः वेगळं राहायची तयारी दाखवली…

“ठीक आहे, चार दिवस मी कशालाच हात लावणार नाही, तुम्ही म्हणाल तसं करेन..चालेल?”

आजेसासू खुश झाल्या…ठरल्याप्रमाणे सुधा खोलीत बसून राहिली, तिला सगळं जागेवर मिळत गेलं.. चहा, नाष्टा, जेवण…तिला खोलीत बोर होऊ लागलं, मग तिने मोबाईल वर एक मूव्ही लावला आणि पाहू लागली…संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे चं टेन्शन नव्हतं त्यामुळे एकापाठोपाठ एक असे 2-3 मुव्ही तिने पाहिले.. पाहता पाहता तिला आयतं जेवण मिळत गेलं. .अगदी पाण्याचा ग्लास सुद्धा हातात मिळायचा…

ती मुव्ही पाहत असताना अचानक आजी खोलीत आल्या आणि सुधा च्या हातात मंदिरातून आणलेला प्रसाद ठेवला… सुधा गडबडली,

“आजी, अहो मला चालणार नाहीये, विसरला का…”

आजी हसायला लागल्या…

“असं काही नसतं गं, या दिवसात सगळं केलेलं चालतं..”

“मग तुम्ही मला विटाळ धरल्यासारखं का एकटं टाकायला लावलं?”

“हे बघ, तुझी घरात किती धावपळ होत होती हे मी पाहिलेलं…त्या चार दिवसात तुला किती त्रास होत होता हेही मला दिसलं…पण फक्त त्या कारणासाठी तुझ्या सासूने तुला आराम दिला असता का? म्हणून मी हे जुनं उकरून काढलं आणि तुला आराम मिळवून दिला..”

“काय आजी…मला वाटलं ह्या काय जुन्या पद्धती लावून धरताय..”

“कदाचित जुन्या काळी असाच विचार केला गेला असेल, त्या काळी कामही तशी जडच असायची, मग अश्या काळात स्त्री ला आराम म्हणून असं वेगळं ठेवलं जातं असावं, पण मग लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असावा…”

“असू शकतं… पण आजी, तुमच्या मुलीला सांगा बरं का..तुम्ही गेल्यावर सुद्धा हा विटाळ पाळायचा म्हणून…”

“का गं? मजा येते ना सगळं आयतं मिळतं म्हणून?”

असं बोलून दोघीजणी हसायला लागल्या..

Leave a Comment