वास्तुदोष

  

आज पुन्हा घरातल्या कटकटीला कंटाळून मोहित घरातून निघून गेला,

“वास्तुदोष असेल का घरात? कापटाची जागा तर चुकीची नाही ना? झोपायची दिशा चुकतेय का? शांती करावी लागेल बहुतेक…सगळंच गणित चुकतंय…घरात 2 मिनिट शांतता नांदत नाही…”

असे असंख्य विचार त्याचा मनात फेर घालत होते..

सकाळपासून जे झालं त्याचा मोहित विचार करू लागला…

“रोजचंच आहे, सकाळी सुचित्रा आणि आई पूजेला काय गेले, नाष्टा बनवायला उशीर झाला तर अप्पांनी आणि सुजित ने घर डोक्यावर घेतलं… अप्पा आई आणि सुचित्रा ला नको ते बोलून गेले…आई ची चिडचिड झाली, मग सुचित्रा वर सगळा राग निघाला…सुचित्रा रडू लपवत कामं आटोपु लागली…सुजित चा रिझल्ट लागला..त्याचे 2 विषय राहून गेले… मी आणि अप्पा त्याला नको ते बोललो…तो दरवाजाची कडी लावून आत कुढत बसलाय..सुचित्रा ला काल अंघोळीला उशीर काय झाला तर घरी सर्वांनी तिला धारेवर धरलं… पहिल्या वर्षाला असलेल्या राधिका चं प्रेमप्रकरण घरात काय समजलं…तिचं बाहेर जाणं बंद करून टाकलं..अप्पांची नोकरी काय गेली, अप्पा त्याला घरात सर्वांना जबाबदार ठरवू लागले…घरात पैशांची अडचण सलू लागली…एकदा तर गॅस सिलेंडर संपलं आणि नवीन आणायला पैसेही उरले नाही…मग घरात अजून चिडचिड..सुचित्रा सर्वांना कंटाळून माहेरी निघून गेली…आईवर सर्व कामाचा भार पडला..या घरात आता पाय ठेवणंही मुश्किल झालंय…”


या विचारात असतांनाच समोरून येणाऱ्या गाडीला तो धडकला, गाडी वेळीच थांबली म्हणून मोहित वाचला…गाडीतील माणूस बाहेर आला..

“अरे मोहित तू? काय झालं? कसल्या विचारात आहे??”
ती गाडी त्याचा काकांची होती…

मोहित काहीही न बोलता रडू लागला…
काकांना काहीसं लक्षात आलं, ते म्हणाले

“काही दिवस ये आमच्याकडे राहायला..जरा हवापालट…”

मोहित गपगुमान गाडीत बसला आणि काकांकडे राहायला गेला..

काकांच्या घरातही सारखीच माणसं…काकांची दोन मुलं, एक मुलगी, एक सून…काकांची नोकरी गेल्याने काका घरीच असायचे…

दुसऱ्या दिवशी मोहित सकाळी उठला…

कानावर आवाज आला..


“तुझी आई आणि बायको गेलेत पूजेला..बरीय जरा शांतता..चल आपण एक गम्मत करू, आज आपण मिळुन पोहे बनवू…त्या दोघींना सरप्राईज देऊ…”

“भारी आयडिया आहे बाबा, पण जमतात का तुम्हाला?”

“त्यात काय एवढं…नेट वर पाहून घेऊ…”

दोघांनी उत्साहाने पोहे करायला घेतले…

“बाबा पोहे तिखट असतात ना? चला आपण लाल तिखट
घालू…”

असे विविध प्रकारचे डोके लढवून त्यांनी शेवटी पोहे बनवलेच… मोहितही त्यात सामील झाला…त्याला खूप दिवसांनी अशी मजा येत होती..

“बाबा पोहे लाल काय दिसताय? आई पिवळे करते ना?”

“नवीन प्रकार आहे, असं सांगू…उगाच आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन नको..”

इतक्यात आई आणि सून येताय, “हे काय आहे?”

“मसाला पोहे…” काकांनी जागच्या जागी पदार्थाचं नामकरण केलं..

सर्वांनी हसत खेळत पोहे एन्जॉय केले…नाष्टा नाही म्हणून कटकट घालणारे आपण कुठे आणि या परिस्थितीला हसत खेळत सामोरं जाणारं हे कुटुंब कुठे असा विचार मोहित च्या मनात येऊन गेला..

इतक्यात काकांचा मधला मुलगा घरी आला, त्याचा रिझल्ट लागला होता, 3 विषयात तो नापास झालेला..

निराश होऊन सोफ्यावर बसला होता इतक्यात काका म्हणाले,

“काय झालं रे?”

“रिझल्ट लागला बाबा माझा, 3 विषय गेलो…”

“हात्तीच्या… एवढंच ना…उरलेले 3 विषय तर पास झालास ना? त्याची पार्टी करूया…हे घे पोहे… पुढच्या वेळी हे 3 विषय काढलेस की याहून भारी पार्टी देईल…”

त्याचा मूड क्षणात बदलला…पोहे तोंडात टाकले…आणि तो म्हणाला…


“बाबा, मला वाटतं ते 3 विषय राहूच द्यावे…”

सर्वांत एकच हशा पिकला..

दुसऱ्या दिवशी काकांच्या सुनेला अंघोळीला वेळ लागत होता… बाहेर सर्व ताटकळत होते… आता या गोष्टी साठी चिडचिड न करता सर्वजण हॉल मधून वाहिनीची चेष्टा करत होते…

“वहीनी.. आज महास्नान आहे का….”

“आले हो, केस धुतेय…वेळ लागतो…”

“अरे देवा…म्हणजे आज वहिनी शाम्पू ची बाटली पूर्ण संपवणार…”

काका आणि काकू दीर आणि वहिनीच्या चेष्टेला खूप हसत होते…

इतक्यात काकांची मुलगी त्याचा मित्राला घरी घेऊन आली…घरात सर्वांशी ओळख करून दिली…

“ये पोरा…घे मसाला पोहे खा..”

“अहो त्याला तरी सोडा…” काकू म्हणाल्या…

“बरं… काय गं पोरी…हा फक्त मित्र की अजून काही…”

“बाबा तुम्ही पण ना…आमचं आहे प्रेम…पण तुम्हाला सर्वात आधी सांगणं मला महत्वाचं वाटलं…तुम्हाला विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाऊ…आधी शिक्षण, नोकरी मग पुढचं पुढे…”

काकू उठल्या…”मग जवाईबापू…काय घेणार? चहा की कॉफी??”

काका म्हणाले, “मला एक सांग, तुला भविष्यात काय करायचं आहे?”

“काका मला एक बिझनेस सुरू करायचा आहे…”

“बस, झालं तर…मला पण तेच करायचं आहे..कसं आहे, नोकरीवर मी फार काम करायचो, त्यामुळे मालक घाबरला, त्याचा पगारही मला जाईल की काय या भीतीने मला काढून टाकलं..पण बरं झालं, त्यामुळे माझं बिझनेस करायचं स्वप्न पूर्ण होईल….” काका हसून हसून सांगत होते…

घरात पैशाची चणचण होतीच…पण कोणी तसं जाणवू द्यायचं नाही…

एकदा घरी फक्त काकू आणि वहिनी होत्या, गॅस संपला आणि पैसेही नव्हते..इतक्यात काका, त्यांची मुलं आली..

“आई जेवायला वाढ, फार भूक लागलीये…”

काकूंनी परिस्थिती ओळखतात सांभाळून घेतलं…

“आज स्पेशल मेनू आहे…चुलीवरची खिचडी….”

एव्हाना घरात सर्वांनी ओळखलं की गॅस सम्पलय…
पण तरीही अश्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी वातावरण बिघडवलं नाही…

“व्वा…तोंडाला पाणीच सुटलंय बघ…”

“हो ना? चला मग, तुम्ही दोघांनी गच्चीवर चूल मांडा… लाकडं जमा करा..मी आणि माझी सून बाकीची तयारी करतो…”

सर्वांनी खूप आनंदाने चुलीवरची खिचडी खाऊन तृप्तीची ढेकर दिली…
सुनेला माहेरून फोन आला, माहेरी ये जरा आराम करायला म्हणून…

इतक्यात तिचा दीर ओरडला..

“अहो मला बोलवा की…फार सासुरवास देताय मला घरचे…”

“बरं बाबा तुपण चल…” वहिनी चेष्टेने म्हणाल्या…

हसतमुखाने वहिनी माहेरी गेल्या, पण या घराच्या ओढीने त्यांना माहेर जास्त मानवलं नाही…त्या लवकरच परत आल्या…

मोहित या घरातलं वातावरण पाहून भारून गेला…परिस्थिती दोन्ही घराची अगदी सारखी होती, पण ती हाताळण्याचं कौशल्य घरात सर्वांना अवगत होतं..दुसऱ्यावर कुरघोडी करण्यापेक्षा हसत खेळत संकटांना सामना करण्याचं सर्वात बळ होतं, त्यामुळे दुःखाची किनारही त्या कुटुंबाला स्पर्श करत नव्हती…

मोहित ला शेवटी कळून चुकलं…की गृहकलह हा वस्तूंच्या जागा बदलून किंवा शांती करून दूर होत नाही…तर मनाच्या कोपऱ्यात शांतीचा आणि आनंदाचा दिवा सतत तेवत ठेवल्याने होतो…

©संजना सरोजकुमार इंगळे
(लेख नावासकट शेयर करा)


4 thoughts on “वास्तुदोष”

Leave a Comment