वहिनी

 सख्ख्या दिराचा लग्नसोहळा पार पाडला तरी शैला ला काही उसंत मिळत नव्हती…

“अहो आत्याबाई पोचल्या का? फोन आला का त्यांचा?? आणि हे नारळ आणि टोपी, ज्याची त्याची देऊन टाका बरं… मिनू मावशी…जेवून जा आता, अश्याच काय निघताय??”

दिराचं लग्न झालं आणि सर्वजण शैला च्याच घरी थांबले, कारण लग्न त्याच गावात होतं… दिर आणि देराणी मात्र लग्नानंतर मोठ्या शहरात राहणार होते…

मनीष आणि तुषार, दोघेही सख्खे भाऊ…काही वर्षांपूर्वीच त्यांची आई गेली अन त्यांचं मातृछत्र हरपलं… पण घराला पुन्हा एकदा उभं केलं ते शैला ने…थोरल्या मनीष च्या बायकोने घराला एक चैतन्य दिलं…आईची माया, काळजी, प्रेम देत सर्वांना तिने आपलं केलं…

सासूबाई नाहीत याची जाणीव असल्याने धाकल्या दिराला, तुषार ला तिने मुलाप्रमाणे वागवलं…त्यांच्या वयात फारसं अंतर नव्हतं, पण थोरली वहिनी म्हणजे आईसमान असते हे ती जाणून होती…खान्या पिण्यापासून ते आजारी पडल्यावर काळजी घेईपर्यंत… आईची कमतरता तिने भासू दिली नाही…आपल्याला इतकी प्रेमळ आणि समजूतदार बायको मिळाली म्हणून मनीष समाधानी होता…तुषार ला त्याच्याच ऑफिस मधली एक दुसऱ्या जातीची मुलगी आवडायची, दोघांनी लग्नाचा हट्ट केला…मनीष आणि वडिलांनी जोरदार विरोध केला पण शैला ने आईच्या जागी असल्याप्रमाणे दोघांची समजूत घालून त्यांना राजी केलं…
लग्न करून दिर आणि देरानी आधी शैला कडे आले…मुख्य घर असल्याने तिथेच तिचा गृहप्रवेश झाला…

त्यांचा दोन दिवस तिथे मुक्काम होता, नंतर ती दोघेही त्यांच्या शहराकडे रवाना होणार होती…

शैला ने दोघांसाठी भरपूर पदार्थ बनवून दिले…लोणचं, चटण्या, पापड यांचे डबेच्या डबे भरून दिले…त्यांची जाण्याची वेळ झाली…तुषार ची बायको तिच्या खोलीत आली तेव्हा तिने पाहीलं की शैला तिथेच उभी होती, हातात एक पिशवी होती..

ती चिडली….

“तुषार, तुझ्या वहिनीला विचार, माझ्या खोलीत काय करताय म्हणून, चोरीचा इरादा आहे काय??? हो माझ्या आई वडिलांनी दिलंय मला भरपूर, तुम्हाला दिलं नसेल म्हणून दुसऱ्याच्या वस्तूंवर हात टाकायचा का??”

तुषार धावत येतो..

“वहिनी हे काय ऐकतोय मी??? खोलीत कुणाच्या परवानगी ने आलात? माझ्या बायकोला त्रास होईल असं का वागल्या तुम्ही??”

तुषार चे ते शब्द कानात वितळलेल्या लोखंडाचा रस घातल्यासारखे गेले…शैला च्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं…

“वहिनी बोला ना, गप्प का??”

इतक्यात मनीष तिथे येतो…

“काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय??”

“वहिनी आमच्या खोलीत काय करत होती विचार..”

“विचारत नाही, मीच सांगतो ती काय करत होती…तिच्या हातात पिशवी दिसते ना, ते आपल्या आईचे दागिने आहेत.. आई नंतर ते शैला कडे आले आणि आता तिला ते तुझ्या बायकोला द्यायचे होते…परंपरा पुढे नेत होती ती…तिला हवं तर तिने दिलेही नसते, कोणी विचारलं असतं?? पण तीच म्हणाली, सासूबाईं नंतर मलाच खंबीर होऊन कुटुंब सांभाळावं लागेल…मीच स्वार्थी झाले तर कुटुंब विस्कळीत होईल….आणि सोबत तिने काही रक्कमही काढून ठेवली होती, तुम्हाला तिथे नवा फ्लॅट घ्यायला थोडीफार रक्कम हाताशी राहील म्हणून…पण मला वाटतं तुम्ही त्या लायकीचे नाही…”

ज्या दिराची आई बनून त्याच्यासाठी इतकं केलं, त्याने काल आलेल्या मुलीवर विश्वास ठेवून आईसमान असलेल्या वाहिनीचा अपमान केला हे बघून शैला पुरती कोसळली…जाता जाता इतकंच म्हणाली..

“वहिनीच्या जागी आई म्हणून पाहिलं असतं तर …आज असं बोलला नसतास…”

2 thoughts on “वहिनी”

Leave a Comment