वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 2)

शौर्या आपली साडी सांभाळत पोलीस स्टेशन मध्ये जाते. मागे वळून आपल्या नवऱ्याला सांगते..

“तुम्ही फ्लॅट वर जा… पोरांना खाऊ घालून झोपवून द्या…डबा आहे ना सोबत??”

नवरा बागेतून डबा काढतो, एका कपड्यात बांधलेल्या पोळ्या दाखवतो…

“हा..जा आता, मी आले थोड्या वेळात…पोरांनो, पप्पांना त्रास द्यायचा नाही..बंट्या…बंट्या??? कुठे गेला हा??””

बंटी पोलीस स्टेशन मधेच हरवून जातो. शौर्या एकदम घाबरते, तिची नजर भिरभिरु लागते…डोक्यात नको ते विचार येतात..

“त्याला कोणी kidnap तर केलं नसेल ना?? चला पटकन, पोलिसात तक्रार देऊन येऊ. ”

नवरा तिच्याकडे बघतो..

“बघताय काय..चला..”

“हेच पोलीस स्टेशन आहे आणि तूच पोलीस आहेस..”

शौर्या भानावर येते, खाली बसून तोंड पदराला लावून रडायला लागते..तेवढ्यात बंटी आवाज देतो..

“ये ढाई किलो का हाथ…”

सर्वजण लॉकअप कडे पाहायला लागतात, बंटी एका खुल्या लॉकअप मध्ये जाऊन बसलेला असतो….

” दिडफुटया..बाहेर ये…ये बाहेर…पोलिसांना सांगून तुला कोंडूनच ठेवते…” शौर्या हातातील समान इन्स्पेक्टर च्या हातात देऊन बंटी कडे पळते.

“तू कोंडायच्या आतच मी जाऊन बसलेलो. हा हा हा. ”

“अहो, इथली टवाळखोर पकडणं सोपं आहे हो, पण हे कार्ट एकदम बेकार, तुम्ही निघा आधी…”

“हो मी जातो…पण लक्षात आहे ना मी सांगितलेलं??”

“हो हो. .आज पहिला दिवस आहे, कुणाला त्रास द्यायचा नाही, आगाऊपणा करायचा नाही..”

“आणि सगळ्यात महत्त्वाचं??”

“हा..मी पोलीस आहे हे विसरायचं नाही..”

“नशीब माझं…आता पुन्हा काही झालं तर पोलिसांना बोलवा, पोलिसांना बोलवा असं म्हणायचं नाही..”

नवरा कपाळावरचा घाम पुसत पोलीस स्टेशन मधील इतर पोलिसांकडे बघतो…आणि मूकपणे

“नीट सांभाळून घ्या आता तुम्हीच. ” असं सांगतो…

नवरा दोन्ही मुलांना घरी नेतो…एक शिपाई त्यांचं सामान पोचवायला मदत करतो…इतका वेळ चाललेला तमाशा संपल्याने पोलिसही सुस्कारा टाकत खुर्चीत बसले…या गोंधळात शौर्या परत गायब झाली..

“नाईक..मॅडम कुठे गेल्या आता?? नाईक..नाईक??”

इन्स्पेक्टर पाटील परत डोक्याला हात लावतात,

“आता दोघे गायब, अरे पोलीस स्टेशन आहे की धर्मशाळा??? कुणीही केव्हाही गायब होतं??”

पाटील पुन्हा खुर्चीवरून उठतात, पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला नाईक दोन झाडांना दोर बांधत असतात, महिला कॉन्स्टेबल खाली एक साडी अंथरतात..आणि ACP शौर्या..त्याच दोरीवर कपडे वाळत टाकत असतात….खाली अंथरलेल्या साडीवर बॅगेतून डबा काढतात आणि त्यातले तांदूळ काढून साडीवर पसरवतात..

हे सगळं बघून पाटील डोक्याला हात लावतात..शौर्या मॅडम सगळं आटोपून ऑफिस मध्ये येतात अन आपल्या खुर्चीवर बसतात. आपल्या टेबलवर पर्स मधून देवाचा फोटो काढतात, अगरबत्ती लावतात अन नमस्कार करतात..

पोलीस स्टेशन मधले सर्वजण त्यांचाकडे फक्त बघत असतात..शौर्याला ते समजतं… ती म्हणते,

“असं का पाहताय माझ्याकडे?? ते काय झालं ना, मी घरून निघाले अन पाऊस सुरू झाला..बॅगेतले कपडे ओले झाले..अन आता दिवाळी आलीये ना, मी भाजणी साठी तांदूळ भाजून ठेवलेले तेही ओले झाले…मग काय, इथे सर्व वाळवावे लागले… असो…आपण कामाला सुरुवात करू..”

पाटील शौर्याच्या टेबल समोर येतात, अन हिम्मत करून विचारतात..

“मॅडम, तुम्ही खरंच ACP आहात??”

शौर्या त्यांच्याकडे बघते..आणि एकदम रडायला लागते. खुर्चीवर मांडी घालून बसते आणि म्हणते..

“तरी मी सांगत होते यांना…एकदा पार्लर मध्ये जाऊन येते म्हणून…फेशियल केलं असतं तर वाटले असते जरा डॅशिंग..बघा, हे असं होतं..”

“साहेब…मंदार बँकेत दरोडा पडलाय… चला लवकर..”

एक हवालदार धापा टाकत येऊन सांगतो…

“चला चला चला लवकर..” शौर्या म्हणते…

सर्वजण तिच्याकडे एकदा बघतात…

“काय…मी ACP आहे..मला नेलं नाही तर मी पोलिसात ….नाही नाही, वरच्या पोलिसात जाईल हा..”

“मॅडम तुम्ही बसा गाडीत… जाऊ सगळे..”

सर्वजण बँकेत जातात…शौर्या काही हालचाल करेल असं काही वाटत नव्हतं.. इन्स्पेक्टर पाटील फोनवर आदेश देतात..

“नाकाबंदी करा…सर्व CCTV चेक करा..”

बँकेत सर्वांची चौकशी होते, दरोडेखोर एकाला ओलीस ठेऊन बँक लुटतात…पोलिसांची धावपळ सुरू होते..घाबरलेले कर्मचारी एका ठिकाणी उभे असतात..शौर्या संपूर्ण बँकेत एक नजर टाकते.. एका दरवाज्याजवळ एक बूट तिला दिसतो…एक कर्मचारी सांगतो..”मॅडम सायरन वाजताच एका चोराचा बूट निघतो अन तो बूट सोडुन तसाच पळतो..”

शौर्या तो बूट नीट निरखून पाहते.

तिथे एक स्त्री अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत बसलेली असते, शौर्याचं लक्ष सारखं तिच्याजवळ जातं. ती खूप दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते पण त्या स्त्रीवरचं तिचं लक्ष काही हटेना..अखेर न राहवून ती त्या स्त्री जवळ जाते..

“हे बघा, घाबरू नका..पोलीस आपलं काम नीट करतील, आणि दरोडेखोर गेलेत…आता घाबरायचं काम नाही… पोलीस आहेतच..”

“तुम्ही??”

“मीपण पोलीस..”

ती स्त्री खालून वर एकदा शौर्या कडे बघते,

“काय कटकट आहे…डोक्यात फरक पडलाय का या बाईच्या??” मनातल्या मनात

“घाबरू नका…मला फक्त एक सांगा… हे तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठून केलं आहे??”

“JK ज्वेलर्स मधून..”

“अच्छा, किती ग्रॅम चं आहे??”

“अमुक एक ग्रॅम चं..”

“अच्छा…आता आहेत का अश्या डिझाइन?? मागच्या दिवाळीतच करायचं होतं.. पण आमचे हे..”

“मॅडम प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय..”

पाटील चिडून बोलतात..

“कुणाशी बोलताय तुम्ही??”

“सॉरी मॅडम..”

“अन कसला प्रसंग..”

“दरोडा पडलाय मॅडम, 50 लाख चोरीला गेलेत..”

“त्यात काय एवढं, आत्ता शोधुन देते चोरांना..”

“मॅडम मजाक करायची वेळ नाही ही..”

“चला माझ्यासोबत, गाडीत बसा..”

“मॅडम तुमचं मंगळसूत्र आणायला नंतर कधीतरी जाऊ आपण.. पण आता..”

“मंगळसूत्र नाही, बसा गपचूप..”

सर्वजण नाईलाजाने गाडीत बसतात..

“नाईक, मला लँड रेकॉर्ड काढून घ्या..पटकन..”

नाईक मोबाईल मधून शौर्याला pdf दाखवतात..शौर्या सर्च फिल्टर लावून तिथे काहीतरी शोधते..

“मॅप चालू करा नाईक…मी सांगते तिथे चला..”

“मॅडम..”

“सांगितलेलं ऐका..”

गाडी शौर्याने सांगितलेल्या दिशेनें फिरते..शहराच्या एका टोकावर भरपूर शेती असते अश्या भागात ती जाते…रस्त्याने एक भंगारवाला जात असतो, त्याच्या मागेपुढे हातगाडी घेऊन काही लोकं भाजीपाला तर काही नारळ घेऊन जात असतात..

“गाडी थांबवा..”

गाडी थांबताच ही लोकं पळत सुटतात..

“पकडा त्यांना..”

पोलीस त्या तिघांना पकडून आणतात..

“या भंगारवाल्याच्या भंगारात 50 लाख असतील, ते काढून घ्या..”

खरोखर तिथे पैसे असतात..सर्व पोलीस जवळजवळ धक्क्यातच जातात…पोलीस स्टेशन ला येऊन त्यांना बंद करण्यात येतं… तासाच्या आत दरोडेखोर पकडले जातात…

“मॅडम तुम्ही कमाल केली..कसं ओळखलं तुम्ही??”

क्रमशः

_______
#भाजणीच्या_चकल्या बनवा 15 मिनिटात.
घरगुती आणि सुरक्षितरित्या बनवलेल्या “माहेश्वरी” चकली भाजणी पिठाच्या चकल्या, पूर्ण रेसिपी सह. चकली शिवाय फराळ पूर्ण कसा होईल? आता बनवा झटपट चकल्या अगदी सोप्या. घरपोच पीठ मिळवा अगदी सहज. खालील नंबर वर तुम्ही व्हाट्सअप्प/कॉल करू शकता.
1 kg- 300 रुपये फक्त.आजच संपर्क करा.
9421609656
9834029424

1 thought on “वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 2)”

Leave a Comment