वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 3)

“खरंच मॅडम, इतक्या सहजासहजी कसं ओळखलं तुम्ही चोरांना? आणि तेही तासाभरात??”

“मी लहानपणी गावाला जायचे आजीकडे, तिथे छान उसाची शेतं होती. आम्ही इतकी मजा करायचो ना, शेतात दिवसभर खेळत असायचो…आमचा एक चुलतभाऊ होता..त्याची एकदा गंमतच झाली बघा, त्याचा निकाल लागला होता शाळेचा, बाबा रागावतील म्हणून गायब होऊन गेला..आम्ही त्याला वेड्यासारखं शोध शोध शोधलं..”

“यांच्या घराला गायब व्हायचं खूळ आहे वाटतं..” नाईक इन्स्पेक्टर पाटलांच्या कानात कुजबुजतात..

“आणि तो कुठे सापडला माहितीये?? आंब्याच्या झाडावर..एकदम टोकाला जाऊन बसलेला…हा हा हा..”

शौर्या एकटीच हसत असते..बाकीचे हतबल होऊन पाहत बसतात.

“मॅडम, चोरांना कसं पकडलं..”

“हा तेच सांगतेय ना…तर उसाच्या शेतात आम्ही होतो, आमच्या गावचे ऊस म्हणजे अहाहा…काय चव असायची…पुढच्या वेळेस येताना घेऊन येईल मी, सर्वांना वाटून देईल…”

“मॅडम…चोर..”

“हा..तर मी म्हणत होते की उसाच्या शेतात..”

“मॅडम बस झालं, तुम्ही उसाच्या शेतात जायचे, खूप मजा करायचे, गायब व्हायचे…”

“आणि ऊस पण आणेन सर्वांना..”

“हो ऊस पण आणणार आहेत, पण चोर कसा पकडला ते सांगा हो..”

“शेतात हिंडायला आमचे आई वडील आम्हाला शूज घालून द्यायचे, गावभर हिंडल्यावर आणि ऊसाच्या शेतात खेळल्यानंतर आमच्या बुटात धसकटे घुसायची…मग आम्ही आल्यावर आई ते काढायची…अगदी तसंच मला त्या चोराने सोडून गेलेल्या बुटात दिसले.. माझ्या लक्षात आलं की हे चोर शेतकी भागातील आणि त्यातल्या त्यात उसाच्या शेतातील आहेत. म्हणून मी लँड लिस्ट मागवून उसाच्या शेताकडे गाडी घेतली, शहरात उसाची शेती मोजकी आहे…आणि हे चोर शंका येऊ नये म्हणून उगाच हातगाड्यांवर फिरत होते…मला सांगा, शेतकी भागात भंगारवाला जातो का कधी?? जातो तो बुढी के बाल वाला नाहीतर पेप्सीवाला..वस्तूंच्या बदल्यात भंगार घेतो तो..आणि हा शेतकी भाग, दारातच भाजीपाला पीकतो, अश्या ठिकाणी भाजीवाले फिरतात?? चोर ऍडपटच दिसतंय.. हे हे..”

सगळं पोलीस स्टेशन निःशब्द होतं.. मॅडम कश्याही असल्या तरी हुशार आहेत याची पोलीस स्टेशनला खात्री पटली…

मॅडम आल्यापासून पोलीस स्टेशनचा चेहराच बदलून गेला होता. पोलीस स्टेशनच्या गेटजवळ आणि आतल्या दरवाजाजवळ आता रांगोळी काढलेली असायची. आत अगरबत्ती चा सुगंध आणि घंटीचा नाद येऊ लागलेला.

शौर्या आपल्या घरची व्यवस्था लावून पोलीस क्वार्टर वर राहायला आलेली, त्यामुळे सकाळी लवकर उठून पोलीस स्टेशन तीच उघडायची..साफसफाई करायची, रांगोळी काढायची आणि मग खोलीवर जाऊन आवरून अन युनिफॉर्म घालून परत यायची.

“मॅडम, तुमची मागची पोस्टींग कुठे होती??”

“गडचिरोली..”

“बापरे…नक्षलवादी भाग..”

“हे नक्षल वगैरे सगळं झूठ आहे हो..मुळात ही लोकं का असं वागतात, त्यावर आपण काय कृती करतो हे महत्त्वाचं..”

“म्हणजे?? आम्हाला समजलं नाही..”

“सांगते..डिटेल मध्ये सांगते…तिथे की नई….”

नाईक खुर्चीवर आरामशीर बसून घेतात, इन्स्पेक्टर पाटील ड्रॉवर मधून पॉपकॉर्न काढतात, बाकी सर्व लोकं काशाचातरी आधार घेऊन बुड टेकवून घेतात..कारण हा 3 तासाचा चित्रपट आता रंगवून रंगवून सांगणार हे सर्वांना माहीत होतं..

“तर झालं असं, पहिल्या 3 ठिकाणी मला वैतागून सहकारी पोलिसांनी माझ्या बदलीसाठी तक्रार दिली..मग मला धडा शिकवावा म्हणून माझी बदली गडचिरोली मध्ये करण्यात आली..”

“तुम्हाला तिकडे चांगलाच त्रास झाला असेल..”

“अजिबात नाही…lockdown सारखी परिस्थिती असायची तिथे, बाहेर जास्त कुणी फिरकत नसायचं, घरांच्या कंपाउंड च्या भिंती 5-6 फुटा पर्यन्त बांधलेल्या…त्यामुळे घरात चोऱ्या व्हायच्या नाही, गुन्हे नोंदले जायचे नाही…मग आम्हाला काय, आरामच आराम..”

“पण नक्षलवाद्यांशी गाठभेट झाली होती का??”

“झालं असं, की मुलांना मी माझ्या माहेरी ठेवलं होतं.. नवरा त्याच्या माहेरी गेलेला..”

“काय??” सगळे एकसाथ ओरडले…

“म्हणजे…माझ्या सासरी, त्यांच्या आई वडिलांकडे..”

“हां…”

“मी बस ने तिकडे गेले..नंतर समजलं की पोलीस स्टेशन इथून 3 किमी वर आहे..माझ्या हातात जड जड बॅग..आणि सर्वांना सरप्राईज द्यायचं म्हणून मी एक दिवस आधीच, कुणालाही न कळवता तिकडे गेले..”

“घ्या, मॅडमला नक्षलवाद्यांना सरप्राईज द्यायचं होतं..”

” नाईक पुटपुटले..

“तिकडे मला 2 माणसं दिसली, एकाच्या हातात बंदूक होती, त्याने ती काढली आणि माझ्यावर रोखली..”

“बापरे, मग तुम्ही घाबरल्या असाल..”

“नाही, मी माझी बंदूक काढली आणि त्यांच्यासमोर धरली..”

“मग ते घाबरले असतील..”

“नाही ओ… त्यांच्या बंदुकांवर मस्त डिजाईन होती…इतक्या चांगल्या बंदुका आपल्याला सरकार का देत नाही कळत नाही…मला त्याची बंदूक फार आवडली…त्याला म्हटलं, ही बंदूक कुठून आणली?? तो काहीही बोलेना, दोघे एकमेकांकडे बघत राहिले…त्यांना समजलंच नाही की मी पोलीस आहे..”

“मग ते काय म्हणाले पुढे??”

“ते म्हणाले की आम्ही नक्षल आहोत..”

“मी काय करू मग..”

“आम्ही तुम्हाला मारू शकतो..”

“ते तर मीही करू शकते..ही मारामारी जाऊद्या हो, आयुष्यभर हेच करायचं आहे..मी काय म्हणते, आपण बंदुका exchange करूया ना..”

“काय??”

“अहो तीच तीच बंदूक वापरून कंटाळा नाही येत का तुम्हाला??”

“नकोय आम्हाला..”

“घ्या हो, पोलिसांची बंदुक आहे , चांगली quality आहे…खूप टिकेल, आम्हाला मिळतच असतात हो, पण तुम्हाला परत परत थोडीच मिळेल..”

“मॅडम पण तुम्हाला कशाला हवी होती बंदूक??”

“अहो काय सुंदर बंदूक होती ती, त्याला सिल्वर बॉर्डर होती, एकदम स्लिम अँड फिट आकाराची होती…त्यांनी विचार केला, मी त्यांना एक गोळी आकाशात सोडून दाखवली..आवाज ऐकूनच त्यांना ते पटलं… त्यांनी बंदुका exchange केल्या..”

“पण मी म्हटलं, की माझी बंदूक 5000 ची आहे, आणि तुमची 2000 ची…मला 3000 परत द्या..त्यांच्याकडे पैसे नव्हते, मग मी त्यांना माझ्या बॅग पोलीस स्टेशन पर्यन्त नेण्याच्या बोलीवर सौदा केला..”

“बापरे मॅडम, खतरनाक हा तुम्ही…पण ते दोघे कुठले नक्षल होते??”

“हे तेच नक्षल होते ज्यांनी गावातल्या जवळपास 20 लोकांची हत्या केलेली, गावात दहशत माजवत होते आणि पोलिसांच्या हातीही लागत नव्हते..”

“मॅडम तुम्ही त्यांना तिथेच गोळ्या घालायच्या होत्या..”

“पण मग माझ्या बॅग कुणी उचलल्या असत्या?? आणि कोण म्हणे मी गोळ्या झाडल्या नाही?? तिथेच encounter केला त्यांचा..”

“काय?? कसा?? त्यांचाकडे बंदूक होती ना तुमची??”

“त्यांची बंदूक माझ्याकडे…ज्यात ठासून भरलेल्या गोळ्या होत्या..आणि माझी बंदूक त्यांचाकडे, ज्यात एकच गोळी होती..”

“आणि त्या गोळीचा नेम लागला असता तुम्हाला तर??”

“रिस्क आणि पोलीस, समानार्थी… आकाशात गोळी कुणी सोडली होती??”

क्रमशः

2 thoughts on “वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 3)”

Leave a Comment