वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 6)

तिकडे सूर्यभान सैरभैर होतो, एक तर शौर्याच्या मुलांनी पळ काढलेला असतो अन वर त्याचे कुटुंबीय गायब असतात. काय करावं त्याला सुचेना.. त्याचे सहकारी त्याला पोलिसात जायचा सल्ला देतात, पण कोणत्या तोंडाने तो जाणार होता?

पण कुटुंबियांपुढे तो हतबल होतो.हात जोडून पोलिसांसमोर नतमस्तक व्हायला तयार होतो..

“काय, तुझे आई बाप गायब झालेत वाटतं..” पोलीस स्टेशनमध्ये गेल्या गेल्या शौर्या त्याला विचारते..सूर्यभान दचकतो,

“मॅडम, तुम्ही तर माझ्या कुटुंबीयांना??…हे बघा मॅडम, जी काही दुष्मनी आहे ती आपली आहे, उगाच घरच्यांना यात ओढू नका…”

“हे तू सांगतोय? तू काय केलंस आजवर? लोकांच्या लहान मुलांना, बायकांना पकडून बंदिस्त करायचास, आणि आज तुझ्यावर वेळ आली तर इतका गयावया करतोय??”

“मॅडम, ज्या घरासाठी इतका माज करतोय, त्यात माणसंच नसतील तर काय उपयोग, मला माफ करा..पुन्हा मी कुणाच्या वाटेला जाणार नाही..”

“जाऊ सुद्धा शकत नाही, पुन्हा जर कुणाच्या वाटेला गेलास आणि घरच्यांना हात लावलास, तर तुझ्या घरातले एकेक मेम्बर कमी होतील लक्षात ठेव..”

सुर्यभानला शौर्याने चांगलाच धडा शिकवला. सुर्यभान ची पुन्हा एकही तक्रार पोलीस स्टेशनला आली नाही..पुन्हा एकदा सूर्यभान सारख्या माणसाला, ज्याला पोलिसही घाबरायचे..चांगलाच सरळ केला आणि तिचं कौतुक झालं..

“मॅडम, ATS वरून कॉल..”

“हॅलो..मिस शौर्या हिअर सर..”

“मिस शौर्या, आमच्या अंतर्गत हेरांच्या माहितीनुसार लाहोर मधील दहशतवादी संघटना अल-मुहम्मद यातील दोन जिहादी तुमच्या शहरात आलेले आहेत..कदाचित तुमच्या शहरात हल्ला करण्याचा त्यांचा मानस असावा..तुम्हाला सतर्क राहावं लागेल.”

“Yes सर..”

“काय झालं मॅडम?? ATS चा कॉल??”

“काही नाही, दोन दहशतवादी आलेत म्हणे शहरात..”

“काय?? आपल्या शहरात??”

“होय.”

“आपल्याला आता सतर्क राहावं लागेल…यंत्रणा कामाला लावली पाहिजे… बरोबर ना मॅडम??”

“होय…सर्व खबरदारी घ्या, हे दोन दहशतवादी लवकरच आपण शोधून काढायला हवेत..”

शहरात तसं पाहिलं तर विशेष असं काहीही नव्हतं… ना कुठली मोक्याची जागा ना कुठली राष्ट्रीय स्थळ… प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय असं शौर्याला वाटलं…

ड्युटी संपवून शौर्या घरी जायला निघते, जाताना वाटेत भाजीपाला घ्यायला थांबते… पूर्ण भाजी मंडई पालथी घातली, पण ती नेहमी ज्या बाईकडून भाजी घ्यायची ती काही दिसली नाही, तिने थोडाफार भाजीपाला घेतला अन चालू लागली…
पोलिसाच्या वेशात चालत असलेल्या तिच्याकडे आजूबाजूची माणसं बघत होती..पण तिचं लक्ष नव्हतं, ती स्वतःशीच बरळत चालली होती…

“आज काय बनवावं बरं, गिलकी कालच खाल्ली…वांगी मुलं खात नाहीत…खिचडीला आमचे हे नाक मुरडतात…खरंच, रोज रोज काय बनवावं माणसाने…आज एखादी मसाल्याची भाजी करूया..हा…उसळ आवडते सर्वांना…मोडही आलेत उसळीला… पण मसाले संपलेत वाटतं..आता किराणा दुकानात जाऊ अन तेही घेऊ..”

बरळत बरळत ती किराणा मॉल मध्ये जाते..ती जाताच सर्वजण उभे राहिले..घाबरले सगळे, पोलीस अचानक इथे कसे??

“अहो घाबरू नका..मी किराणा घ्यायला आलीये..कसं आहे ना, घरी जाऊन कपडे बदलून येईपर्यंत मुलं त्यांच्या वडिलांना कच्च खाऊन टाकतील, त्यापेक्षा घरी जातानाच नेलेलं बरं..”

शौर्या एकेक समान बास्केट मध्ये टाकू लागली, नेमका भाजीसाठी लागणारा लाल मसाला संपलेला होता अन मॉल मध्ये तो नव्हता, तिने पुन्हा दुसऱ्या दुकानाकडे मोर्चा वळवला आणि एका छोट्याश्या दुकानातून लाल मसाला विकत घेतला, तिथला मुलगा शौर्याला पाहून घाबरूनच गेला…दुकान नवीन दिसत होतं, आणि मुलगाही तरुण होता.

“पुढच्या वेळी युनिफॉर्म मध्ये खरेदी करणारच नाही..”

शौर्या वैतागून घरी जाते. घरी गेल्या गेल्या मुलं आईला बिलगतात, शौर्या पटापट फ्रेश होते अन कामाला लागते…तिच्या नवऱ्याने कणिक मळून ठेवलेलं असतं आणि तो पोळ्या लाटायला सुरवातच करत असतो..

“अहो अहो अहो…हे काय.”

“कुठे काय, पोळ्या करतोय..”

“मी असताना तुम्ही का करायच्या??”

“अगं तू इतक्या मोठ्या पोस्ट वर आहेस, तरी जुनाट विचार लावून धरतेस?”

“पोस्ट चा प्रश्न नाही, तुमच्या पोळ्या माहितेय मला..मागच्या वेळी पोरं अर्धपोटी जेवलेली, तुम्ही झाडू मारा घराला, स्वयंपाक मी करते..”

नवऱ्याला पिटाळून शौर्या स्वयंपाकाला लागते..किराणा दुकानातून आणलेलं सामान पिशवीतून काढते…तिचं लक्ष सामान गुंडाळलेल्या वर्तमानपत्राकडे जातं…तिच्या डोक्यात ठिणगी पेटते..हे उर्दू वर्तमानपत्र, तेही या शहरात??

क्रमशः

Leave a Comment