वर्दी माझी झक्कास👌👌👌 (भाग 5)

 “येतील..” शौर्या थंडपणे उत्तर देते..

“अगं येतील काय. . नेहमीपेक्षा 2 तास उशीर झालाय त्यांना..”

“काही होणार नाही..”

“सगळ्या गोष्टी तुला सोप्या वाटतात…नाईक, तुम्ही complaint लिहून घ्या बरं… “

“काळजी करू नका..आम्ही शोधून काढतो मुलांना..”

नाईक जीप काढतात, 2 पोलिसांना घेतात आणि शाळेकडे निघतात..

“अहो उगाच वेळ वाया घालवताय तुम्ही..”

शौर्या मागून आवाज देते पण काही उपयोग होत नाही..

नाईक आणि इतर पोलीस शाळेत चौकशी करतात, cctv मध्ये काही माणसं मुलांना आमिष दाखवून गाडीत नेताना दिसतात… गाडीचा नंबर नीट दिसत नाही, पुन्हा एकदा नाकाबंदी होते.. शौर्याच्या नवऱ्याचं चित्त ठिकाणावर नसतं, तो सतत नाईकांच्या संपर्कात असतो. नाईक गाडीचे वर्णन शहरातील सर्व पोलीस स्टेशनला पोहोचवतात. सर्व यंत्रणा कामाला लागते…संध्याकाळ पर्यन्त नाईक आणि इतर पोलीस बरीचशी माहिती जमा करून आणतात..शौर्या चा नवरा पोलीस स्टेशनला पुन्हा जातो..नाईक आणि साथी त्याला धीर देतात, शौर्याचा नवरा रडकुंडीला येऊन म्हणतो..

“कुठे असतील गं मुलं??”

“कुठे असणार, ही काय लॉकअप मध्ये..”

तो धावत तिथे जातो..

“तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला?? आणि आत काय करताय..”

“आईने डांबले आम्हाला..”

“डांबू नको तर काय करू? कितीवेळा सांगितलं, लोकांनी चॉकलेट चं आमिष दाखवलं तर सुटायचं नाही लगेच…नाही ऐकलं ना??”

“हो आई, पण तू जसं शिकवलं तसं केलं ना गं आम्ही..”

नाईक पुढे येतात..

“काय शिकवलं??”

“आई नेहमी आमच्या दप्तरात एक पावडर ठेवते, ती समोरच्याच्या तोंडावर मारली की तो बेशुद्ध होतो…आम्हाला एका गोडाऊन मध्ये नेलं तेव्हाच समजलं होतं की आम्हाला kidnap केलंय, मग काय, घेतली पावडर आणि लावली त्याच्या तोंडावर. अन आलो पळून..”

“नुसतं एवढ्यावर थांबले नाही हे पोरं.. ती लोकं बेशुद्ध झाली अन त्यांच्या खिशात चॉकलेट चाचपडू लागली…चार पाच चॉकलेट काढले अन मग तिथून सटकले…राहुद्या यांना लॉकअप मध्ये..”

नाईकांना हसावं की रडावं कळत नव्हतं…

“हे बघा नाईक, आपण पोलीस लोकं.. आपल्याला मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात, असं असताना आपली कमकुवत बाजू हेरून आपले शत्रू आपल्याला नामोहरम करण्याचा कट कधीही रचू शकतात याची आपल्याला जाण हवी…म्हणून मी मुलांना नीट ट्रेन करून ठेवलंय…”


“माझ्या kidnap झालेल्या मुलांचा जामीन मी भरतो, सोड आता त्यांना..”

मुलं बाहेर येतात, शौर्याचा नवरा मुलांना घेऊन मिठी मारतो…शौर्याकडे कौतुकाने एकदा बघतो..ती म्हणते..

“इश्श… अहो असं काय बघताय..”

“माझ्या हुशार बायकोकडे बघतोय.”.

शौर्या लाजून तोंड लपवत बाहेर निघून जाते..नाईक नवऱ्याकडे एकदा बघतात..नवरा- “काय करणार, आहे ते माझंच आहे..” असं फक्त हावभावाने व्यक्त करतो..

सर्वजण घरी परततात, शौर्याचा नवरा घरी आल्या आल्या ओरडतो..”चोर… चोर..”

“गप बसा हो…काही चोर वगैरे नाहीये..”

“अगं हे काय हॉल मध्ये बसलेत ना ही लोकं.. कोण आहेत?”

“ही सूर्यभान ची आई, हा भाऊ आणि ही बहीण..”

“कोण सूर्यभान? कोण बहीण? काय चाललंय हे??”

“तुम्हाला नाही समजणार..बरं, तुम्ही तिघांनी जेवण केलं का? मी सर्वांसाठी छान स्वयंपाक करून गेलेले..”

“हो मॅडम, खाल्लय आम्ही, पण सूर्यभान ला सांगा, आम्ही उपाशी आहोत म्हणून, त्याशिवाय अक्कल ठिकाणावर यायची नाही त्याची..”

“अगं शौर्या, कोण आहेत ही लोकं?”

“सूर्यभानचे कुटुंबीय… सूर्यभान नावाचा एक गुंड आहे..लोकांना धमकवतो, त्रास देतो..आणि कुणी ऐकतच नसेल तर त्याच्या कुटुंबियांना पळवून नेतो..”.

“मग आपली मुलं त्यानेच??”

“होय…त्याने तिकडे आपली मुलं पळवली, आणि मी इकडे त्याच्या घरची माणसं पळवली….अहो यांना तर कल्पनाही नाही, की सूर्यभान असं काही वागतोय म्हणून, हे बिचारे आपला मुलगा मोठा बिझनेसमन आहे याच गैरसमजात..”

___

तिकडे सूर्यभान सैरभैर होतो, एक तर शौर्याच्या मुलांनी पळ काढलेला असतो अन वर त्याचे कुटुंबीय गायब असतात. काय करावं त्याला सुचेना.. त्याचे सहकारी त्याला पोलिसात जायचा सल्ला देतात, पण कोणत्या तोंडाने तो जाणार होता?
पण कुटुंबियांपुढे तो हतबल होतो.हात जोडून पोलिसांसमोर नतमस्तक व्हायला तयार होतो..

“काय, तुझे आई बाप गायब झालेत वाटतं..” पोलीस स्टेशनमध्ये गेल्या गेल्या शौर्या त्याला विचारते..सूर्यभान दचकतो,

“मॅडम, तुम्ही तर माझ्या कुटुंबीयांना??…हे बघा मॅडम, जी काही दुष्मनी आहे ती आपली आहे, उगाच घरच्यांना यात ओढू नका…”

“हे तू सांगतोय? तू काय केलंस आजवर? लोकांच्या लहान मुलांना, बायकांना पकडून बंदिस्त करायचास, आणि आज तुझ्यावर वेळ आली तर इतका गयावया करतोय??”

“मॅडम, ज्या घरासाठी इतका माज करतोय, त्यात माणसंच नसतील तर काय उपयोग, मला माफ करा..पुन्हा मी कुणाच्या वाटेला जाणार नाही..”

Leave a Comment