लेकाची माया

अक्कामाई मरणाच्या दारातून परत आली होती. जवळपास आठवडाभर मुलांचा टांगणीला लागलेला जीव आज मोकळा झाला होता. स्वतःकडे दुर्लक्ष करणारी अक्कामाई शुगर, bp, थायरॉईड अश्या अनेक आजारांनी घेरली गेली होती, पण जेव्हा ती जिन्यावरून पडली तेव्हा तिचा पाय फ्रॅक्चर झालाच पण हे बाकीचे आजारही समजून आले. त्या आधी अनेक दुखन्यांकडे ती दुर्लक्षच करत होती. 

अक्कामाई ला 3 मुलं, मोठ्या दोन मुली आणि धाकला मुलगा. दोन्ही मुलींची लग्न झालेली, पण आई ऍडमिट आहे म्हटल्यावर संसारपाणी सगळं सोडून त्या आठवडाभर आईजवळ थांबून होत्या. सासरी रोष ओढवून घेणार हे माहीत असून या मुलींनी त्याची तमा बाळगली नव्हती. वडील गेल्यानंतर आपली मुलंच अक्कामाई चा आधार बनली होती. मुली कायम आईच्या सेवेत तिच्या जवळ असायच्या, मुलगा आतिष मात्र फार थोडावेळ हॉस्पिटलमध्ये थांबत असे.

तिथे असलेली एक वृद्ध परिचारिका हे सगळं बघत होती. लेकी कश्या जीव लावतात हे तिने पाहिलं होतं. त्यांची सेवा बघून तिला आपल्या लेकीची आठवण यायची. 

आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. आतिष येऊन सर्व बघून गेला, सर्व सामान घेतलं की नाही हे बघितलं. आता अर्ध्या तासात डॉक्टर येऊन तपासून जाणार होते आणि लगेच या सर्वांना निघायचं होतं. 

“मी आलोच जरा..”

आतिष पुन्हा बाहेर गेला, त्या परिचरिकेला राहवलं नाही..

“खरंच लेकीची माया वेगळीच असते, मुलं कितीही लाडकी असली तरी शेवटी मुलीच माया करणार. तुमचा मुलगा, आताही इथे थांबायला तयार नाही, थोडावेळ तरी थांबावं ना त्याने, एकही दिवस इथे थांबल्याचं आठवलं नाही मला..”

एवढं बोलून नर्स तिथून बाहेर पडली, गेटजवळ आतिष फोनवर बोलत होता..

“साहेब, गेले आठवडाभर मला ओव्हरटाईम करू दिलं तुम्ही, मला हॉस्पिटलमध्ये लागणारे पैसे दिलेत खरंच तुमचे उपकार झालेत साहेब, नाहीतर कुठून आणले असते मी पैसे? मला आजच्या दिवस फक्त सुट्टी द्या, आईला घरी न्यायचं आहे..”

एवढं बोलून आतिष बाहेर गेला, डॉक्टर येऊन तपासून गेले..सर्वजण आतिषची वाट बघत होते, बहिणी बोलू लागल्या,

“निदान आता तरी थांबावं ना याने इथे, आपण आपल्या घरी गेल्यावर आईची काळजी हा कसा घेईल शंकाच आहे..”

थोड्या वेळाने आतिष आला, एक व्हीलचेअर घेऊन..

“आईची आबाळ व्हायला नको, तिला चालायला त्रास होईल..”

आपला भाऊ आईसाठी व्हीलचेअर आणायला गेलेला हे बहिणींना समजलं, आपल्या तर डोक्यातही आलं नाही हे..

ती नर्स वरमली, आपण नको ते बोलून गेलो याची सल तिच्या चेहऱ्यावर झळकू लागली..अक्कामाईंनी ते ओळखलं, जाता जाता तिला एवढंच म्हणाले,

“लेकीला माया असतेच, पण लेकराची मायाही जगावेगळी असते, फक्त ती सर्वांना दिसत नाही..”

Leave a Comment