लग्न की शिक्षण

 

“आई तुला कितीवेळा सांगितलं आहे,  की मला लग्न करायचं नाहीये… तरी का हात धुऊन माझ्या मागे लागलीयेस?”

“अरे बेटा तुला समजतेय का? योग्य वयात लग्न झालं नाही  नाही तर पुढे जाऊन तुला कोण मुलगा देणार आहे?”

“आई,  पण माझं नुकतंच शिक्षण संपलेलं आहे… पुढे मला नोकरी करायची आहे आहे त्यासाठी पुढील शिक्षण घ्यायचं आहे..”

“लग्न झाल्यावर कर… त्यात काय एवढं?”

“आई हे तू बोलतेय?  तुही लग्नानंतर शिक्षण केलं होतंस ना?  काय झालं मग त्याचं? केलीस का तू नोकरी? केला का तुझ्या शिक्षणाचा वापर?”

राधिका असं बोलली आणि आईच्या डोक्यात एकच कळ निघाली… भूतकाळ सरसर डोळ्यासमोरुन गेला…

आईला आधीचे दिवस आठवले… किती हुशार होती मी अभ्यासात.. पण लवकर लग्न लावून दिलं गेलं.. लग्नानंतर शिकवतील असं वचन सासरच्यांनी दिलेलं… पण बाळाची चाहूल लागली आणि सगळंच राहून गेलं… पण राधिका च्या बाबतीत मात्र असं करायचं नाही…

आईने ठरवल ही राधिका च्या बाबतीत असं काही होऊ द्यायचं नाही,  पण वडिलांचं काय? ते काही ऐकणाऱ्यातले नव्हते…

राधिकाला नुकतेच स्थळ  चालून आले… मुलगा श्रीमंत आणि चांगल्या पगारावर नोकरीला होता… मुलाच्या पगाराचा आकडा ऐकूनच राधिका च्या आई वडील तिच्या मागे लागले होते… पन्नास हजार पगार हा आकडा गरीबीत पिचलेल्या आई बापाला खूप मोठा वाटत होता… त्यांच्या डोळ्यासमोर ते 50000 आणि मुलीचं  सुख हे दिवस-रात्र फिरत होतं. आपल्यासारखा आपल्या मुलीला पै पै जोडून, काटकसर करून संसार करावा लागू नये आणि अगदी मजेत आणि आनंदात आयुष्य मिळावं एवढंच त्या आई बापाला वाटत होतं….

पण राधिका मात्र काही ऐकायला तयारच नाही .. तिने स्पष्टपणे लग्नाला नाही सांगितले आणि आईने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली… वडील संतापले… घरात बरेंच वादविवाद झाले… शेवटी राधिकाने एक मत मांडलं,
…ती म्हणाली,

“मला फक्त दोन वर्ष हवी आहेत त्यानंतर तुम्हाला हव्या त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे”

.. शेवटी आई-वडिलांनी तिच्यापुढे हात टेकवले आणि दोन वर्ष थांबण्याची तयारी दाखवली.  राधिकाने या काळातच पुढचं शिक्षण घेतलं, चांगले गुण मिळवत गेली… राधिका च्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट सुरू झाल्या.. प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार कंपनी मिळत होती…

राधिका घरी आली,
वडील वाटच बघत होते…

“तू दिलेली दोन वर्ष आता संपलेली आहे आणि योगायोग बघ…आजच एक स्थळ चालून आलेलं आहे..त्या मुलाला चक्क 65 हजार रुपये पगार आहे… अजून काय पाहिजे?  आता मुकाट्याने लग्नाला हो म्हण आणि तयारीला लाग. असं म्हणत वडिलांनी तिच्या हातात मुलाचा बायोडेटा टेकवला.. ती मिस्किलपणे हसली.. तिच्या हसण्यचं कारण वडिलांना काही समजलं नाही… तिने तिच्या बागेतून एक कागद काढला आणि वडिलांच्या हातात ठेवला… वडिलांनी निरखून पाहिले आणि त्यांना ला आश्चर्याचा धक्का बसला…

राधिकाला एका नावाजलेल्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली होती… आणि पगार होता “महिना दीड लाख…”

राधिका म्हणाली,

“बाबा… मला वाटतं दीड लाख 65 हजारांहून जास्तच असतात… आणि मी आयुष्य सुखाने व आनंदाने जगावे यासाठी पाच आकडी पगार असलेल्या मुलाचा शोध घेण्याची गरज नाही.. कारण माझ्यात स्वतः तेवढं कमवण्याची धमक आहे…”

आई-वडिलांना कळून चुकलं… त्यांच्या मते मुलीचं आयुष्य तिच्या नवऱ्याने दिलेल्या छत्रछाये वरचं अवलंबून असतं.. पण स्वतःचं भविष्य स्वतः लिहिणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीकडे ते अभिमानाने बघत होते..

2 वर्षांपूर्वी राधिका चं लग्न घाईघाईने त्या मुलाशी लावून दिलं असतं तर??

राधिका ला आज एका बंदिस्त घरात आणि नवऱ्याच्या आधारावरच अवलंबून राहावं लागलं असतं.

आजही आपण बघतो,  कि आपल्या मुलींना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी मोठा आकडी पगार असलेला मुलगा शोधला जातो… का? तर आपल्या मुलीला कधीही पैशाची कमी पडू नये म्हणून… पण आपण हाच वेळ आणि हीच शक्ती आपण पण मुलींना सक्षम करण्यासाठी वापरली तर? तिला स्वतःचे आयुष्य सुखी करण्यासाठी नवऱ्याच्या पगाराची कधीही गरज पडणार नाही… तिला नवरा मिळेल एक मित्र म्हणून, एक पार्टनर म्हणून…तिच्याकडेही आदराने पाहिलं जाईल….

समाजात असंही दिसतं की श्रीमंत घरात मुली दिल्या जातात…तिथे मुलाकडे बक्कळ पैसा असतो पण बायकोवर खर्च करताना ना तो उपकाराच्या भावनेने करत असतो.. मग अशा वेळेस स्वतःच्या स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची गळचेपी करून ती आयुष्यात सुखी तरी कशी होईल?

3 thoughts on “लग्न की शिक्षण”

  1. खुप छान लिहिलं आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. Financially independent असणं हे खूप महत्वाचं आहे.

    Reply
  2. खुप छान लिहिलं आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. Financially independent असणं हे खूप महत्वाचं आहे.

    Reply
  3. खुप छान लिहिलं आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. Financially independent असणं हे खूप महत्वाचं आहे.

    Reply

Leave a Comment