राधिकाचं आगळंवेगळं वाण

 “या वयात काय होऊन जातं कुणास ठाऊक…कसली कामं होत नाही अन कसला उत्साह राहत नाही…अंग जड पडतं, साधी भाजी टाकायची तरी अर्धा तास लागून जातो…”

राधिकाच्या सासूबाई असं सांगत असतानाच तिला आईचं बोलणं आठवलं, आईही अगदी हेच म्हणत होती…दोघींनी वयाची पन्नाशी ओलांडली होती…रजोनिवृत्ती चा काळ होता आणि शारीरिक बदल दोघींना त्रस्त करत होते…

अधिक मासात आई आणि सासूची ओटी भरण्याची पध्द्त राधिकाकडे होती. कमावती असल्याने ओटीसोबतच ती महागडी साडी, सोन्याचा दागिना, चांदीची वस्तू आणि पैसे देऊन यथोचित कार्यक्रम करे. पण यावेळी मात्र तिने वेगळ्या पद्धतीने ओटी भरण्याचं ठरवलं…

ठरल्याप्रमाणे तिने आईला घरी बोलावलं…आईला वाटलं की दरवेळी प्रमाणे ही साडी देऊन ओटी भरेन…सासूबाईही त्याच भ्रमात..त्याही छान तयारी करून बसल्या…

दोघींजनी गप्पा मारत बसल्या, मग काही वेळाने आई म्हणाली…

“बेटा ओटी भरून दे लवकर आणि मला मोकळं कर…घरी जायचं आहे, गाडी पकडावी लागेल..”

“हो…लगेच करते..”

राधिकाने दोघींची पूजा केली आणि ओवाळले…यावेळी तिने साडी, सोनं दिलं नाही म्हणून आई अन सासूला विशेष वाटलं..

“आता चला माझ्याबरोबर..”

“कुठे?”

“तुम्हाला वाण द्यायचं आहे..”

“अच्छा म्हणजे यावेळी आमच्या पसंतीचे घेणार तर..”

राधिका आपल्याला साडीच्या दुकानात नेऊन आपल्या आवडीची साडी घेऊन देणार असं दोघींना वाटलं..
राधिकाने गाडी काढली आणि सरळ एका हॉस्पिटलमध्ये नेलं…तिथल्या लॅब मध्ये तिने दोघींना नेलं…दोघींचे रक्ताचे नमुने घ्यायला लावले…आणि पैसे भरून ती घरी आली…

सासूबाई आणि आईला कळेना…हे काय असं विचित्र? वाण द्यायचं म्हणे आणि घेऊन गेली लॅब मध्ये..

“बरं आई, अजून पूर्ण वाण द्यायचं बाकी आहे…तू संध्याकाळ पर्यन्त इथेच थांब..”

राधिकाच्या वागण्याचं दोघींना फार विचित्र वाटलं…पण ती उगाच काही करणार नाही हेही दोघींना माहीत होतं..

संध्याकाळी राधिका रिपोर्ट घेऊन आली…आणि ते पाहून रागाने दोघींकडे तिने पाहिलं…

“चला आता..”

“आता कुठे??”

“चला फक्त..”

राधिका दोघींना डॉक्टर कडे घेऊन गेली…

“डॉक्टर, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत…हे बघा…दोघींचे रिपोर्ट आणलेत मी…हिमोग्लोबिन पासून ते थायरॉईड… सगळं विस्कटलेलं आहे…”

“आणि या वयात काही विशेष काळजी घ्यावी लागते… शक्यतो बायका अंगावर काढतात या वयातील दुखणी, पण त्याला नजरअंदाज करून चालत नाही…वेळेवर उपचार झाले नाही तर असहनीय त्रास होतो पुढे…बरं झालं तुम्ही वेळेवर ट्रीटमेंट घेताय…आता मी दोघींना काही इंजेक्शन चा कोर्स देते…काही औषधं देते…ते वेळेवर घ्या..”

राधिका मेडिकल मध्ये जाऊन औषधं आणते आणि सर्वजण घरी जातात..

ती इंजेक्शन आणि औषधं दोघींचे वेगवेगळे पॅक करून ती त्यांचा हातात देते आणि म्हणते,

“हे तुमचं वाण…यावेळी माझ्याकडून हीच ओटी समजा..”

आई आणि सासूबाईंना कौतुक वाटलं..

“वेगळंच वाण आहे गं तुझं, पण आवडलं हो आम्हाला..”

“नाहीतर काय, तुम्ही बायका…आयुष्यभर इतरांसाठी राब राब राबलात…स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही, दुसऱ्याला सर्दी पडसं झाली तरी जीवाचं रान कराल मात्र स्वतःकडे लक्ष द्यायचं झालं की सपशेल दुर्लक्ष करणार…म्हणून म्हटलं, साडी चोळीवर खर्च करण्यापेक्षा या सगळ्यावर केला तर कमी येईल..”

राधिकाच्या या आगळ्यावेगळ्या वाणाने आई आणि सासूबाईं भरून पावल्या…

5 thoughts on “राधिकाचं आगळंवेगळं वाण”

  1. मस्त छान विचार आहे अशी सून आणि मुलगी सर्वांना मिळो माझ्या सासूबाई आणि दोघीही आज या जगात नाहीत पण खुप मोठा आधार असतो या दोघींचा

    Reply
  2. आता च्या वेळेची ही खरी गरज आहे बाकी सगळं करतात पण तब्येतीची काळजी घेतली जात नाही

    Reply

Leave a Comment