‘राधा’ उमगली जेव्हा…

 

गोकुळाष्टमी जवळ येत होती अन कावेरीचेही दिवस भरत आले होते, कृष्ण जन्माष्टमी ला कावेरीच्या पोटी कृष्णच जन्माला येणार असा गोड समज सर्वांनी करून घेतला होता. मध्यंतरी कावेरी ला भेटायला आलेले गावाकडची माणसंही सांगून गेलेली की कावेरी ला मुलगाच होणार म्हणून…

कावेरीच्या सासूने तिचं बाळंतपण आपल्याकडे करायचं ठरवलं होतं, सासूबाई हौशी होत्या, त्यात कावेरी त्यांची लाडकी सून ..तेवढं कॊडकौतुक कमी म्हणून आजेसासूही सोबत होत्या…कावेरीला बाळंतपणात कुठे ठेऊ अन कुठे नको असं त्यांना झालेलं…कामं तर सोडाच, पण तिला आयतं खाऊ घालून घालून कावेरी ला अगदी गुटगुटीत बनवून टाकलं होतं त्यांनी….

सर्वांना आता प्रतीक्षा होती ती तान्ह्या बाळाच्या आगमनाची, तिच्या सासू आणि आजेसासुनी कृष्णाचा वेष मोठ्या मुश्किलीने बनवून आणला होता, इवल्याश्या बाळासाठी कृष्णाचा पोशाख कुठे मिळेना, मग एका ओळखीतल्या टेलर ला सांगून तो बनवून घेतला…घरीच छान मुकुट बनवला, मोत्यांचे दागिने, पायातल्या वाळ्या सगळं अगदी छान बनवलं होतं..

अखेर कृष्णाष्टमी च्या दिवशी बरोबर कावेरी ला पोटात कळा सुरू झाल्या…ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं….

कावेरीला आत नेलं आणि बाहेर सर्वजण प्रतिक्षा करत होते…अखेर बाळाच्या रडायचा आवाज आला आणि सासूबाई म्हणाल्या..

“कृष्णाचा जन्म झाला बरे…”

नर्स बाळाला घेऊन आली आणि म्हणाली..

“अभिनंदन, मुलगी झाली आहे..”

सर्वजण काही क्षण स्तब्ध झाले, पण तरीही आनंदाने बाळाला घेतलं…त्याच्याकडे कौतुकाने बघायला लागले…

घरी आल्यावर कावेरी ने सोफ्यावर तयार ठेवलेला कृष्णा चा पोशाख पाहिला आणि तिला जरा वाईट वाटलं…1-2 नातेवाईक ताबडतोब बाळाला पाहायला घरी आले, त्यातली एक आगाऊ बाई म्हणाली,

“मला वाटलं होतं कृष्ण जन्माला येईल…आता टाकून द्या तो कृष्णाचे कपडे, मुलीला थोडीच घालणार हे..”

ती बाई निघून गेली आणि कावेरी ला राग आला, तिने ते कपडे घेतले आणि बाळाला घालायला लागली…

मागून आजेसासू आल्या आणि त्यांनी सुंदर अश्या राधेचा पोशाख पुढे केला…सासूबाई अवाक झाल्या, यांनी हे कधी तयार केलं?

“आईआजी, मुलगी असली म्हणून काय झालं, मी हिला कृष्णच बनवणार…” कावेरी डोळ्यात पाणी आणून म्हणायला लागली…

“पोरी…अगं कृष्णच जन्माला यावा असा अट्टहास का बरं असतो?? कधी राधे कडेही त्याच प्रेमाने पाहिलंय कुणी?? “

“आजी पण त्या बाई..”

“लोकांचं सोड गं… तुला माहितीये, राधा कोण होती ते?? अगं जो या विश्वाला नियंत्रित करायचा अश्या कृष्णाला नियंत्रित करणारी एक दैवी शक्ती होती ती….स्त्री शक्तिशिवाय कुठलाही देव अपूर्ण आहे…”राधेकृष्ण” मध्ये सर्वात पहिलं नाव कुणाचं? राधा चं…”लक्ष्मीनारायण”, “सीताराम” या मध्येही स्त्री शक्तीलाच प्राधान्य आहे…राधेचं प्रेम अलौकिक होतं… तुला माहितीये? एका पुराणात कृष्ण भगवान स्वतः म्हणाले होते की जेव्हाही मी एखाद्याच्या तोंडून “राधा” हे नाव ऐकतो तेव्हा माझं प्रेम मी त्याला बहाल करतो आणि त्याच्यामागे मी नकळत खेचला जातो…शब्दशः अर्थ न घेता त्याचा असा अर्थ आहे की राधा एक अशी अध्यात्मिक शक्ती आहे जिला कशाचीही तोड नाही…भक्ती, प्रेम, करुणा, आर्तता या सर्वांचं परमोच्च स्थान म्हणजे राधा…पण दुर्दैव असं की आज समाज फक्त कृष्णा ला ओळखतो, पण कृष्ण जीच्याशिवाय अपूर्ण आहे अश्या राधेला कुणी ओळ्खलंच नाही…केवळ कृष्णाची प्रेयसी म्हणून तिला बघितलं गेलं..जेव्हा तिच्याकडे एक शक्तीचं जाज्वल्य प्रतीक म्हणून पाहिलं जाईल ना, तेव्हा कृष्णाला खऱ्या अर्थाने प्रणाम केला असं समजावं…”

कावेरी आणि तिच्या सासूच्या डोळ्यात अश्रू आले, आजेसासु नी आज खऱ्या अर्थाने कृष्ण आणि राधा समजावले होते…

कावेरी ने प्रेमाने राधा चा वेष हातात घेतला आणि आपल्या मुलीला घालायला सुरवात केली…नवीन कपडे घालताच ती खुदकन हसली.. जणू तिला कृष्णा पेक्षा राधा जास्त भावली होती..

2 thoughts on “‘राधा’ उमगली जेव्हा…”

Leave a Comment