राउंड अँड राउंड

 दोन वर्षाच्या सियाने खोलीत जाऊन दरवाजा बंद केला अन latch lock केलं तसं घरातले सर्वजण घाबरून दरवाजाकडे पळाले. तिने नुसतं latch ओढलं नव्हतं तर खालून लॉक सुद्धा केलेलं. पण तिला आता ते काही उघडता येईना त्यामुळे ती जोरजोराने रडायला लागली. बाहेरून आजी, आजोबा आणि शशांक ओरडू लागले, आपापसात मोठ्याने गोंधळ घालू लागले.

“तरी मी सांगत होते की किल्ल्या जपून ठेवा म्हणून, आता एवढीशी ती किल्ली घरात कुठे सापडणार?”

“तू शोध तर खरं आई, तोवर मी किल्ली वाल्याला घेऊन येतो..”

“अरे किती रडतेय ती आतून, रडून रडून ताप काढून घेईल..”

“किती घाबरलीय ती..अरे देवा.. काय करू??”

“ही पोरगी इतकी आगाऊ झालीये ना..अजिबात ऐकत नाही कुणाचं..सतत डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. “

सिया जोरजोरात दार ठोठावत होती..तिच्या रडण्याचा आवाज, बाहेरून या तिघांचा आवाज ..वातावरणाने ती अजून घाबरून गेली..

तिची आई घरी नव्हती, ती आल्यावर तिची काय हालत होईल हा विचार करूनच शशांकच्या अंगावर काटा उभा राहत होता.

“अरे खिडकीतून जाता येईल का रे कुणाला?”

“आई आपण सातव्या मजल्यावर राहतो, खिडकीतून जायचा मार्गच नाहीये… हा चावीवाला पण फोन का उचलत नाहीये..”

“फोन नको जाऊन घेऊनच ये त्याला..”

सियाची आई नेमकीच दूध आणायला दुकानात गेलेली, हा गोंधळ चालू असतानाच ती घरी आली.

“काय झालं??”

“सिया ने आतून लॉक केलंय तिला उघडता येत नाहीये.. मी चावी वाल्याला घेऊन येतो थांब..”

सर्वांना वाटलेलं की आई सैरभैर होईल, घाबरून रडायला लागेल पण तसं काहीही झालं नाही. आई शांतपणे दरवाजा जवळ गेली, या तिघांना तिने एकदम शांत बसायला सांगितलं…

“कुणीही काहीही बोलू नका…”

सर्वजण शांत झाले, ते पाहून सियाचा आवाजही कमी झाला..आईने हळूच बाहेरून आवाज दिला….

“सिया बाळा, तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय बघ मी..दरवाजा उघड..बाळा राईट..राईट…राऊंड अँड राऊंड..”

आई हेच बोलत होती….

“राईट राईट, राऊंड अँड राउंड..”

आणि बघतो तर काय, सियाने काही सेकंदात लॉक ओपन केलं. सर्वांचा जीव भांड्यात पडला. सिया आईला बिलगली..

सर्वांना नवल वाटलं, त्यांनी आईला विचारलं, कसं केलंस हे?

आईने सांगितलं..

“मुलं धोक्यात येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो, त्यांच्यावर कुठलं संकट येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो..आपण 24 तास त्यांच्या आजूबाजूला असू आणि त्यांच्यावर काहीही संकट येणार नाही असं गृहीत धरतो. पण अनपेक्षितपणे मुलं जर एखाद्या संकटात सापडली तर त्यातून बाहेर येण्याचा मार्गच त्यांना दाखवत नाही..चक्रव्यूहात जाऊ नकोस हेच आपण त्यांना सांगत आलोय पण चक्रव्यूहातून बाहेर कसं निघावं याचंही शिक्षण त्यांना द्यायला हवं..सिया हे असलं काहीतरी करू शकेल याची जाणीव मला होती, मग मी तिला मुद्दामहून आम्ही दोघी खोलीत असताना दार कसं उघडायचं हे शिकवलं. मी latch लावून घ्यायची आणि ती उघडायचा प्रयत्न करायची. ती latch उलट्या दिशेने फिरवत असायची. ज्याने लॉक उघडणार नव्हतं. मग तिला प्रात्यक्षिक दाखवलं..राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गोल आणि राईट राईट म्हणजे उजव्या बाजूला हे सतत तिला सांगत गेले आणि ती ते शिकली. त्यामुळेच आत्ता नुसतं तेव्हढ्या वाक्यावर तिला दार उघडता आलं..”

मुलांवर संकट येऊ नये म्हणून जेवढा प्रयत्न आपण करतो तेवढाच प्रयत्न त्या संकटातून मार्ग कसा काढायचा हेही मुलांना शिकवलं पाहिजे. 

©संजना सरोजकुमार इंगळे

ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल. 


2 thoughts on “राउंड अँड राउंड”

  1. अगदी खर आहे,. खुप जपन्या पेक्षा स्वावलंबी करणे हेच संस्कार.

    Reply

Leave a Comment