रणधुमाळी (भाग 7)

 “उद्या सकाळी सकाळी निघायचं, प्रत्येक घरात…प्रत्येक माणसाला पकडायचं… त्याच्या हातात ह्या पैशांची चळत ठेवायची…आणि धमकवायचं…आम्ही छुपे कॅमेरे लावले आहेत असं सांगायचं, त्यामुळे चुकीचं मतदान केलं तर तुमच्या घरासकट तुम्हाला जाळून टाकू अशी धमकी द्यायची….एवढं सगळं केल्यावर, बघू कोण मत देतं त्या सानिका ला…”

 

गणपतराव इरेला पेटले होते..सानिका च्या येण्याने त्यांच्या राजकीय वजनावर खूप मोठा परिणाम झाला होता. पराभव झाला तर आयुष्यभर ही हार त्रास देत राहील हे गणपतराव जाणून होते. 

 

इतक्यात गणपतरावांना खबर मिळते, की नगराच्या मध्यावर सानिका एक मोठ्ठा होर्डिंग लावणार आहे…

 

गणपतरावांनी ऑर्डर सोडल्या…

 

“जा…ती जागा आपल्या ताब्यात घ्या…तिने काही करायच्या आधीच आपलं होर्डिंग लावून द्या….रात्रीतून भलंमोठं होर्डिंग बनवा….इकडे तिकडे कुठेही जागा शिल्लक ठेऊ नका…”

 

मतदानाचा आदला दिवस..

 

गणपतरावांचे कार्यकर्ते सकाळपासून कामाला लागले…

 

त्यांचं नगराच्या मध्यात होर्डिंग लावण्यात आलं, कार्यकर्ते गाड्या काढत आणि पैशाच्या थैल्या घेऊन घरोघरी जाऊ लागले….गणपतरावांच्या राज्यात बनलेल्या खड्ड्यांच्या रस्त्यावरून गाडी चालवताना कार्यकर्त्यांना आज नाकी नऊ येत होते…

 

“कोण खबरी आणतं रे? होर्डिंग लावायला एकही जण आला नाही सानिका कडून…”

 

गणपतराव चिडतात…

 

इकडे सानिका आपल्या तीनही टीम मेम्बर्स कडे रिपोर्ट मागते…

 

“सोशल reach किती झालाय??”

 

“Reached upto 1 million people”

 

“Great…धुमाकूळ चालू देत…सर्व ठिकाणी आपला जाहीरनामा आणि transparent board ची खबर सोशल मीडिया वर फिरू द्या…”

 

“अजय, सॉफ्टवेअर तयार आहे ना?”

 

“हो, फायनल टेस्टिंग चालू आहे…”

 

“महेश…रिसर्च पूर्ण झाला?”

 

“हो मॅम…त्या रिसर्च वर आधारित सॉफ्टवेअर बनवलं गेलं आहे…तेच आता डिस्प्ले होणार…”

 

सानिका च्या ऑफिस मध्ये जे 3 लोकं काम करत होती, ती ना कुठली कार्यकर्ती होती ना त्यांना राजकारणाचा कुठला अनुभव होता…

 

इंजिनिअरिंग क्षेत्रातील ते तिघे होते…ज्ञानाचा पुरेपूर वापर करून राजकारणात त्याचा उपयोग करण्यात आला होता. जनतेच्या प्रश्नांची उकल, त्यावर कुणालाही हानी पोचणार नाही अशी उपाययोजना, तरुणांसाठी नगरातच योग्य ते मार्गदर्शन, वयस्कर लोकांच्या समस्या, आरोग्य समस्या या सर्व गोष्टींचा मुळापासून अभ्यास केला गेला…नगरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती मिळवली गेली, त्यांचे नंबर मिळवले गेले, गल्लीत गोंगाट करत प्रचार न करता लोकांना घरबसल्या आपल्या हातातल्या मोबाईल वर सानिका चा जाहीरनामा आणि सानिकालाच का मत दिलं गेलं पाहिजे याचं सखोल वर्णन सोशल मीडिया द्वारे मिळत गेली…महिलांच्या सुरक्षेसाठी cctv, GPS तंत्रज्ञानाचा वापर…तरुणांना डिजिटल लर्निंग साठी मोफत वायफाय आणि डिजिटल लायब्ररी…व्यवसायांची माहिती देण्यासाठी व्याखानमालांचे आयोजन…अश्या नगरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास लक्षात घेण्यात आला होता… आणि त्याचा सोशल मीडिया द्वारे अगदी शांततेत प्रचार करण्यात आला होता…

 

गणपतराव दुनियेचा अडाणी माणूस…जवळ महागडा आयफोन होता, पण फोन करण्याव्यतिरिक्त साहेबांना काहीही जमायचं नाही…त्यांनी कधी हे सगळं पहिलंच नाही…आणि सानिकाने नेमकं हेच हेरलं होतं… म्हणून ती म्हणाली होती, 

 

“राजकारण करणार…मीच करणार..पण असं एक राजकारण, जिथे ना प्रचार असेल, ना मोर्चे ना सभा..”

 

मतदानाच्या आदल्या दिवशीचं वातावरण अगदी धावपळीचं होतं… गणपतराव कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते…किती घरात पैसे वाटले, किती लोकांना धमकवल…यावरून मिळणाऱ्या मतांचा आकडा गणपतराव बांधत होते…या खेपेला गणपतरावांचं चित्त ठिकाणावर नव्हतं…आपण जिंकू की नाही यावर त्यांना शंका येत होती… सानिका ने त्यांचा प्रत्येक डाव उधळला होता,

“सर्व मतदारांना धमकावलंय…कुणाची हिम्मत नाहीये माझ्या विरोधात जाण्याची…”
 
गणपतराव स्वतःचीच समजूत घालत खोलीत येरझारा घालत होते…कुणाचा फोन वाजला तरी गणपतरावांना धडकी भरायची…सानिका ने कुठे काही धुमाकूळ तर नसेल ना घातला या भीतीने ते क्षणाक्षणाला भीत होते…
 
तिकडे सानिका तिच्या टीम मेम्बर्स सोबत कामात होती…
 
संध्याकाळ झाली, काही कार्यकर्ते गणपतरावांच्या होर्डिंग जवळ थांबलेले तेही कंटाळले,
 
“सानिका चा पत्ता नाही अजून इथे, कुणी चुकीची माहिती दिली काय माहीत…”
 
ते तिथून निघून गेले…

 

 
 

3 thoughts on “रणधुमाळी (भाग 7)”

Leave a Comment