रणधुमाळी (भाग 4)

सानिका ला आत्ताच आवर घालावा लागेल, या विचाराने 2 गुंड तिच्या ऑफिस मध्ये धाडले गेले…

“मॅडम, बस झालं तुमचं…चुपचाप अर्ज मागे घ्या….”

“आणि नाही घेतला तर?”

“मला वाटतं तुमच्या घरी बरीच मंडळी आहेत..फार जीव आहे तुमचा त्यांच्यावर…”

“बोला कोणाला उचलता? की मी बोलावू एकेकाला??”

या धमकीलाही सानिका जुमानत नाही पाहून गुंड अजून बिथरले…

“जास्त शानपट्टी नाय….गपगुमान अर्ज मागे घ्यायचा… असं म्हणत एकाने बंदूक बाहेर काढली…”

“गोळ्या आहेत???….की फक्त ..”

“आहेत…ठासून भरल्या आहेत…एक जरी बसली ना तरी आरपार…”

“गणपतरावांनी पाठवलंय ना तुम्हाला? लोकांना समजलं तर कोण मत देईल त्यांना?”

“लोकांना समजायचा प्रश्नच नाही…आज एक तर तू अर्ज मागे घेणार, नाहीतर इथेच खल्लास होणार…”

या बरोबरच ऑफिस बाहेरून एका प्रचंड मोठ्या गर्दीचा लोट आला….गणपतराव आणि या गुंडांना शिव्या देत…

गुंड घाबरले, ही गोष्ट लोकांना कशी कळली? केव्हा कळली? सानिका तर समोर आहे…ऑफिस मध्ये दुसरं कुणी नाही…. मग?”

“गर्दीने आत घुसून दोघांना धु धु धुतलं…”

गणपतरावांचे 2 गुंड सानिका ला धमकावत असतानाच बाहेर लोकं जमा होऊ लागली आणि त्यांनी हे 2 गुंड बाहेर येताच त्यांना चांगलंच धुतलं होतं. त्या दोघांना कळेना, लोकांना हे समजलंच कसं… ती दोघे पळून गेले आणि लोकं आत येऊन म्हणाले,

“आम्हाला फेसबुक लाईव्ह वर दिसलं नसतं तर कदाचित तुला धोका असता, तू निवडणुकीत उभी आहेस हे ऐकून आनंद झाला, एक तरी सुशिक्षित उमेदवार आहे म्हणायचं..”

सानिका ला पूर्वकल्पना होतीच, की गणपतराव अर्ज मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणतील म्हणून.. तिने तिच्या ऑफिस मध्ये अशी रचना केली होती की टेबल मागच्या भिंतीवर एक सेलफोन गुप्त पद्धतीने लपवण्यात आला आणि टेबल वरील बटन दाबताच फेसबुक लाईव्ह सुरू होईल…जेणेकरून तिच्या जवळच्या लोकांना लगेच खबर मिळेल आणि तिच्यावरचा धोका टळेल…तिने मुद्दाम गणपतरावांचं नाव घेतलं, जेणेकरून लोकांना त्यांचं खरं रूप समजेल…

लोकांमध्ये सानिका च्या हुषारीची चर्चा होऊ लागली…तिचं नाव पसरू लागलं आणि सोबतच गणपतरावांची लोकप्रियता कमी होऊ लागली…ज्याच्या त्याच्या तोंडावर सानिकाचंच नाव…

सानिका चा प्रचार सुरू झाला होता..

आपल्या ऑफिस मध्ये 3 लोकांना तिने मदतीला घेतलं होतं..त्या तिघांची काय कामं चालत होती हे त्या गणपतरावांच्या हेराला कळायला मार्ग नव्हता…

रात्रीचे 11 वाजलेले, सानिका झोपायची तयारी करत होती इतक्यात मोबाईल वर एक नोटिफिकेशन आले..ते पाहताच सानिका आपल्या 2 मित्रांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचली…

2 तरुण एका तरुणीची गाडी थांबवत तिची छेड काढत होते…सानिका आणि ते 2 मुलं तिच्याजवळ गेले, तिला अभय दिलं आणि त्या 2 तरुणांना चांगलंच चोपलं…

ती तरुणी घाबरलेली असते, हे तिघे तिला तिच्या घरी पोहोचवतात…तिचे आई वडील या तिघांचे आभार मानतात…या सगळ्याचा व्हिडीओ जवळच्याच एका हॉटेल वर असलेला एक वेटर काढतो..आणि बघता बघता तो व्हिडीओ व्हायरल होतो…

सानिका आणि तिचे 3 साथीदार, ऑफिस मध्ये बसलेले असताना सानिका गुगल मॅप चालू करते…काहीतरी बघते आणि आपल्या साथीदारांना सांगते,

“घरी जा..तयार व्हा…आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे…”

“कुठे?”

“समजेलच..”

सर्वजण तयार होऊन येतात..सानिका व्हाइट कुर्ता आणि ब्लॅक जीन्स घालून, डोळ्यावर शोभेल असा चष्मा चढवून आणि केसांची पोनी बांधून तयार होते…

सानिका गाडी काढते आणि तिच्या साथीदारांना गाडीत बसण्यास सांगते, कुणालाही काहीच कल्पना नसते की कुठे जायचे आहे ते..

सानिका गाडी गणपतरावांच्या सभेबाहेर उभी करते..

भाड्याने गोळा करून आणलेली प्रचंड गर्दी…घोषणाबाजी… आणि पक्षाचे झेंडे झळकत असतात..तिकडे दुर्लक्ष करत सानिका पुढे जात असते…पण तरीही गणपतराव लांबून तिला ओळ्खतात…त्यांचं भाषण चालू असतं..

“….तर..माझ्यासारख्या राजकारणात मुरलेल्या उमेदवाराला मतं दिली तरच तुमचं भविष्य उज्जल असेल..नाहीतर आजकाल शेम्बडं पोरगही राजकारणात उतरतं… ना कसला अनुभव ना कसलं ज्ञान…”

तिचे साथीदार तिच्या मागोमाग जातात…गर्दीतून ती एकेक पाऊल पुढे टाकत असते…गर्दी तिला ओळखते…जायला वाट देते…लोकांत कुजबुज सुरू होते..

“हीच ती सानिका…गणपत रावांना टक्कर देणार..”

“शिकलेली आहे बरं का…खरंच निवडून आली तर विकास होईल आपल्या भागाचा…”

सानिका स्टेजजवळ पोहोचते, तिला पाहून गणपतरावांची धडधड वाढते…त्यांची त त फ फ होते…सानिका एका साथीदाराला इशारा करते, त्याला काय करायचं आहे ते समजतं आणि तो स्टेज मागे निघून जातो….

माईक बंद पडतो…स्टेजवर सर्वांची धावपळ होते आणि त्यात सानिका स्टेजवर चढते…तिला पाहून समोरच्या गर्दीत हलकीशी घोषणा ऐकू येते…”सानिका…सानिका…सानिका..”

हळूहळू तो आवाज वाढतो… आणि “सानिका..सानिका म्हणून तो आवाज प्रचंड घुमु लागतो…”

गणपतराव आणि कार्यकर्ते गोंधळतात…काय करावं काही सुचेना, कुणाकुणाला गप करणार…

सानिका स्टेजवरून फक्त हात वर करून नमस्कार करते… गर्दीवर एक नजर टाकते…आणि परत आपल्या साथीदारांना घेऊन गाडीकडे जाते….ती जात असतानाही गर्दी तिला वाट देत जयघोषात तिला निरोप देत असते…मोठ्या ऐटीत दिमाखाने ती हात जोडत वाट काढते..

गाडीजवळ जाते..तिथे गणपतराव आणि त्यांचे कार्यकर्ते उभे असतात…

सानिका डोळ्यांवरचा चष्मा काढून गणपतरावांना म्हणते,

“मग…कसं वाटलं शक्तिप्रदर्शन??”

“ए…माजली का जास्त…ही लोकं माझ्यासाठी आली आहेत…माझे मतदार आहेत…”

“तेच तर… राजकारणातला ‘र’ माहीत नाही काय…म्हटलं होतं ना..ना कसला प्रचार, ना कसल्या सभा…तरीही आपला दरारा राहणार…सभा तुमची, गर्दी तुमची… पण हवा माझीच होणार…शत्रूच्या कळपात घुसून वार करते मी…गणपतराव….राजकारणासाठी पैसा नाही…अक्कल लागते…”

गणपतरावांकडे बोलायला काहीही उरत नाही…सानिका निघून जाते, तिच्या आवेशपूर्ण पाठमोऱ्या आकृतीकडे बघत गणपतराव अगदी गळून पडतात…

काही दिवसांनी सानिका च्या घरासमोर एक महागडी गाडी उभी राहते…तिला प्रश्न पडतो. इतकी महागडी गाडी? आपल्या घरापुढे? कोण असेल?

गाडीतून चकचकीत बूट घातलेला, हातात महागडं घड्याळ…आणि महागडे कपडे घातलेला आकाश गाडीतून बाहेर येतो आणि सानिका आनंदाने चुर होते..

आकाश??

ती धावत धावत बाहेर जाते…त्याला मिठी मारते…आकाश ला इतक्या दिवसांनी पाहून तिचा संयम सुटतो…

आकाश च्या या बदललेल्या रूपाकडे ती बघतच असते, मन भूतकाळात जातं..

कॉलेजच्या स्नेहसंमेलनात सानिका सुत्रसंचलन करत असते…समोर आगाऊ मुलं तिच्या प्रत्येक वाक्यची खिल्ली उडवत होते…अशा वेळी एक प्रचंड देखणा, उंचापुरा, लेदर जॅकेट घातलेला मुलगा मागून आला…त्या मुलांसमोर जाऊन त्याने फक्त एक कटाक्ष टाकला…आणि पुढचा पूर्ण वेळ ती मुलं गपगुमान बसून होती…

सानिका ला त्या मुलाबद्दल एक वेगळंच आकर्षक निर्माण झालं होतं, ती कॉलेजला पहिल्याच वर्षाला होती तेव्हा आकाश कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होता…त्याचा एक प्रचंड दरारा असायचा..सानिका ला तो पाहताक्षणी आवडला होता, तिने स्वतःहून त्याच्याशी मैत्री केली…प्रेम फुलत गेलं…आकाश थोडा गुंड प्रवृत्तीचा होता…पण सानिका ला तो तसाच आवडायचा..

आकाश आज अचानक आला आणि तेही डायरेक्ट घरी? सानिका च्या घरी आकाश बद्दल तिने सांगितलं होतंच..त्याला पाहून घरच्यांनाही समजलं, सानिका ची निवड कसली भारी होती ते…

तो आला..त्याचं स्वागत झालं…आकाश ने डायरेक्ट विषयात हात घातला…

“मला सानिकाशी लग्न करायचं आहे, लवकरात लवकर…”

आई वडिलांना धक्का बसला, पण मुलगा चांगला होता, श्रीमंत वाटत होता त्यामुळे नकार द्यायला काही कारणच नव्हतं..

सानिका मोहरून गेली, स्वप्नांत हरवली पण लगेच भानावर आली….तिला काहीतरी वेगळं साध्य करायचं होतं..राजकारणात ती हळूहळू पुढे येत होती..आणि आता मधेच हे..

“आपण बाहेर जाऊया याबाबतीत बोलायला..”

“बोलायचं काय सानिका यात, आकाश चांगला मुलगा आहे, लग्नाचं पक्क करून घेऊ…त्याच्या आई वडिलांना बोलावून घेऊ..”

आईला सानिका च्या लग्नाची काळजी होतीच, इतका चांगला मुलगा हातचा जाऊ द्यायचा नव्हता..

“आई, आलोच आम्ही..”

आकाश आणि सानिका जवळच्या एका रेस्टॉरंट मध्ये जातात…

“सानिका… आता मी सेटल आहे, तुझ्याही घरी मान्य आहे…लवकर लग्न करून टाकू आपण…मला आता राहवत नाही तुझ्याशिवाय..”

“हे बघ आकाश, माझं तुझ्यावर प्रेम आहेच…पण सध्या मी कुठल्या परिस्थितीतुन जातेय याची तुला कल्पना नाही…राजकारणात उतरलेय मी..”

सानिका त्याला सगळी कहाणी सांगते…

“सानिका? हे काय ऐकतोय मी? राजकारण आणि तू? अगं वेडी झालीस का….हा आपला प्रांत नाही…”

“मान्य…पण परिस्थिती अशी होती की..मला स्वतःला सिद्ध करणं भाग होतं..”

बराच वाद झाल्यावर अखेर आकाश जाहीर करतो..

“सानिका..ऐक माझं, यात पडू नकोस…अर्ज मागे घे..आपण लग्न करू…आणि US मध्ये सेटल होऊ…या दलदलीत पडू नकोस..तुला आता 2 पर्याय आहेत..एक तर माझ्याशी लग्न, नाहीतर राजकारण… तू ठरव..”

हे बोलत असताना आकाश ला एक फोन येतो… खिशातून फोन काढत तो बाहेर निघून जातो…

सानिका पूढे मोठा पेच उभा राहतो….एकीकडे आयुष्याचा प्रश्न आणि दुसरीकडे राजकारणातील आपली सिद्धता प्राप्त करण्याचा…

ती आकाशला नखशिखांत न्याहाळते…आकाश परत येताच त्याला सांगते…

“अर्ज मागे घेऊ…”

“काय? खरंच?”

“हो..”

आकाश प्रचंड खुश होतो…

“चल, लगेच चल….”

“लगेच?”

“चांगल्या कामाला उशीर नको..”

सानिका ड्रायव्हर सीट वर बसते, गाडी चालू करते…आकाश शेजारी बसलेला असतो..आपल्या लॅपटॉप ची बॅग मांडीवर घेतो…

सानिका गाडीतून उतरते,

“काय गं काय झालं?”

“तू चालव गाडी..”

“बरं मॅडम..”

“सानिका त्याचा लॅपटॉप ची बॅग हातात घेते…इतका महागडा लॅपटॉप सानिका च्या हातात द्यायला तो कचरतो, पण सानिका बळजबरी तिच्या हातात घेते…”

आकाश गाडी चालवत असतो…ऑफिस जवळ गाडी थांबवतो…

दोघेही त्या अधिकाऱ्याकडे जातात…

आकाश म्हणतो,

“साहेब हिला अर्ज मागे घ्यायचा आहे..”

“नाव?”

“सानिका जाधव…”

“चिन्ह?”

“पुस्तक…”…

अधिकारी document पुढे करतो,

“सही करा यावर…”

सानिका कागद हातात घेते..

आणि टराटर कागद फाडुन टाकते..

“सानिका??? काय केलंस?डोकं फिरलं का तुझं??”

सानिका काहीही न बोलता गाडीत बसते..आकाश तिच्या मागोमाग येऊन शेजारी बसते..

“सानिका अशी काय वागतेस??”

सानिका भरधाव गाडी घेते, आकाश ला कळत नाही हे काय चाललंय..

सानिका एका सुनसान ठिकाणी गाडी नेते..

गाडी थांबवून आकाश ला म्हणते,

“उतर खाली…”

“का? काय झालं..”

“मी म्हटलं उतर..”

आकाश खाली उतरतो, सानिका तावातावाने उतरून त्याचा समोर येते.. त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि म्हणते,

“गणपतरावांनी किती पैसे दिले मग….??”

“काय…क क काय? ब ब बोलतेस?”

“नाटकं करू नकोस…सांग…”

आकाश गप असतो..

“राजकारण किती खालच्या थराला जाऊ शकतं याचा अंदाज मला आधीपासूनच होता…माझ्या बाबतीत होणाऱ्या प्रत्येक घटनेचा खोलवर विचार करणं मला भाग होतं… कॉलेजमधल्या तू आणि आताचा तू, जमीन अस्मान चा फरक दिसला मला…महागडी गाडी, कपडे, मोबाईल पाहूनच मला समजलं…मी जितकी तुला ओळखते, तुला इतक्या लवकर मोठ्या पगाराची नोकरी मिळणं अशक्य, आणि कॉलेज सोडून 1 वर्ष झालं आणि इतक्या लवकर मोठा पगार मिळणं शक्य नाही हेही मी जाणलं… तुझं ऐन निवडणुकीच्या वेळी येणं… अचानक लग्नाची मागणी घालणं… अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती करणं…विनाकारण नव्हतं…आणि मला खात्री तेव्हा झाली जेव्हा अर्ज मागे घेण्यासाठी त्या ऑफिसचा रस्ता तुला न सांगता समजला आणि तू गाडी तशी वळवली….इथे पहिल्यांदा आलास आणि सगळं माहीत झालं तुला? अरे…गणपतरावांसोबत राहून, सगळा गृहपाठ करूनच तू आला असशील हे समजलं मला…राजकारण काय असतं, हे मला शिकवायचं नाही…तुही नाही आणि त्या गणपत रावांनी सुदधा नाही..तुमच्या एक पाऊल पुढे असेल मी नेहमी..”

“हरामी…मला वाटलं नव्हतं इतकी स्मार्ट असशील, माझ्यासाठी पैसा हेच सगळं काही आहे…गणपत रावांनी एक कोटी मोजलेत…आणि 2 पर्याय ठेवलेत माझ्यासमोर… अर्ज मागे घ्यायला सांग…नाहीतर…”

“नाहीतर काय??”

“तुला इथेच खल्लास कर…”

सानिका च्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत नाही…

आकाश खिशातून पिस्तुल काढतो आणि तिच्यावर रोखतो…

आकाश ने सानिका वर बंदूक रोखलेली असते..

सानिका त्याच्या डोळ्यात पाहते, “हाच का तो? ज्यावर आपण प्रेम केलं? ज्याच्यासाठी आपण झुरलो आणि आयुष्य सोबत काढण्याची स्वप्न पाहिली?……”

आकाश बंदूक रोखून उभा असतो, सानिका म्हणते…

“आकाश? पैशासाठी तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकतोस?”

“हो..पैशासाठी मी काहीही करेन..आणि आता इमोशनल होऊ नकोस, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं…टाईमपास होता तो..टाईमपास… आता तू खल्लास…”

असं म्हणत आकाश आपला दुसरा हात बंदुकीला लावतो, जोरात घोडा ओढतो…आणि….

.

सानिका ची साधी पापणीही मिटत नाही…ती हसतच असते…बंदुकीतल्या गोळ्या गायब होत्या..फक्त आवाज झालेला…

सानिका आपली मूठ समोर करते, आणि हळूच आपला हात उघडते..

“इथे आहेत गोळ्या…”

“तुझ्याकडे कश्या आल्या??”

“म्हटलं होतं ना? तुमच्या पेक्षा एक पाऊल नेहमी पुढे असेल मी…”

सानिका गाडीत बसते आणि आकाश ला एकटं टाकून निघायला लागते..जाताना आकाश ला म्हणते,

“एकेकाळी प्रेम केलेलं तुझ्यावर, म्हणून सोडतेय…पुन्हा माझ्या वाटेला आलास तर….तुझं शरीरही सापडणार नाही अश्या ठिकाणी बुजवेन तुला..”

आकाश कपाळावरचा घाम पुसतो…पुन्हा हिच्या वाटेला न जाणंच योग्य राहील असा विचार करत तो पायपीट करत गावाबाहेर पडतो..

सानिका गाडीतून परत येतांना तिच्या डोळ्यात पाणी येत असतं.. आकाश सोबत घालवलेला काळ, त्याचसोबत घालवलेले क्षण, प्रेमाच्या आणाभाका, आणि नंतर पैशासाठी मलाच मारायला निघालेला आकाश…सगळं तिला अगदी असह्य होत होतं….

ती घरी येते आणि खोलीचं दार लावून बसते..

संतापाने एकेक वस्तू फेकायला लागते…

आईला आवाज जातो..

“सानिका…अगं काय झालं?”

सानिका बराच वेळ दार उघडत नाही…

आईला लक्षात येतं की काहीतरी भयंकर घडलेलं आहे…

सानिका थोड्या वेळाने दार उघडते…

समोर आईला पाहुन आईच्या गळ्यात पडून रडू लागते..

“आई…खूप वाईट आहे गं राजकारण…सत्ता, पैसा यापुढे नात्यांना काहीही किंमत नाही गं… कटपुटल्यांप्रमाणे इथे माणसं वापरली जाताय..”

सानिका ने घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली…

“बाळ तुला काही झालं नाही ना?”

“तिचं अंग चाचपुन आई घाबरत घाबरत विचारते..”

सानिका आपले डोळे पुसते…

“मला काही करू शकेल असा माणूस आजवर जन्माला नाही आला आई…”

डोळे पुसत पुन्हा गेलेला आवेश धारण करत सानिका आपल्या ऑफिस मध्ये जाते…

गणपतराव आकाश च्या फोन ची वाट बघत असतात, पण अखेरपर्यंत आकाश चा काहीही पत्ता लागत नाही…

सानिका ऑफिस मध्ये आपल्या तीनही टीम मेम्बर्स ला ती बोलावते…रामू काका खोली साफ करायला येतात…हे चौघे खुर्चीवर बसून घेतात…एकीकडे रामू काका आपलं काम करत असतात आणि दुसरीकडे सानिका आपला पुढचा बनाव रचते…

“निवडणूक लढायची म्हणजे प्रचार हवाच…दरवर्षी गणपतराव जयकर मैदानावर सभा घेतात…अमुक एका समाजाचे लोक तिथे जास्त आहेत..त्यांना एकटवतात… धर्माचं राजकारण करून त्यांची मत मिळवतात…आपल्याला त्यांचा आधी तिथे जाऊन सभेची तयारी करायची आहे… त्यांची सभा संध्याकाळी असेल, आपण सकाळीच घ्यायची…म्हणजे दिवसभर सभेला बसून थकलेली माणसं संध्याकाळी गणपत रावांच्या सभेला बसणार नाहीत…”

“Ok मॅम, भारी आयडिया आहे…ग्रेट..”

सगळे एकमेकाकडे पाहून हसतात…

तिकडे गणपतरावांना ही माहिती हेराकडून समजते, आणि ते खवळतात….इतकी चलाख झाली का ही? इतका विचार करू शकते? पण तिला माहीत नाही…गणपतराव काय चीज आहे ते…आपण पूर्ण दिवस सभा घेऊ… आदल्या दिवशी रात्री सगळी तयारी करा…मी स्टेजवरच मुक्काम ठोकेन…काहीही रिस्क नको यावेळी… आणि हो, माईक जवळ आपलं माणूस ठेवा..नाहीतर मागच्या वेळ सारखं..”

कार्यकर्ते मान खाली घालतात..त्यांची पंचाईत होते, एक तासाची सभा, आणि आदल्या रात्री जायचं, तिथेच मुक्काम..आणि आणखी दिवसभर गणपतरावांची हाजी हाजी…कार्यकर्ते वैतागले…

गणपतराव जेवण आटोपून आणि सगळी तयारी करून रात्री गाडीत बसतात…सोबत 5 कार्यकर्ते घेतात..गाडी आधी जोतिनगर भागात जाते….गाडीतले दोन कार्यकर्ते जोतिनगर ला उतरतात आणि उरलेल्या 3 कार्यकर्त्यांसोबत गणपतराव सभेच्या ठिकाणी पोहोचतात…ठरल्याप्रमाणे गणपतराव आदल्या दिवशी रात्री पोचतात… पांढरा सूट घालून…त्याच अवतारात स्टेजची पाहणी करतात, सगळीकडे एक कटाक्ष टाकतात आणि हळूच बबन ला घाबरत घाबरत विचारतात..

“आहे का रे ती?”

“हो, ती काय स्टेज खाली??”

“क क काय?? अरे… काय बो बो ब बोलतोयस??”

“हो…बाटली ना?…”

“बाटली??…बाटली…बाटली…हो हो तीच…”

गणपतरावांना आता सानिका च्या खेळीचा चांगलाच अनुभव आल्याने प्रत्येक पावलाला ते सानिका ला घाबरत असतात…आताही त्यांना सानिकाचीच भीती वाटत होती…

“साहेब..आज रात्री काम फत्ते होऊन जाईल…”

“फिल्डिंग लावलीये ना सगळी??”

“हो साहेब…”

दुसऱ्या दिवशी गणपतराव आणि कार्यकर्ते सगळी तयारी करून बसतात, सोबत हत्यारंही ठेवलेली असतात….काय ती भीती एकट्या सानिका ची…

सकाळ होऊन जाते, दुपार होते, संध्याकाळ होते…सानिका चा पत्ताच नसतो…

आपल्या हेराला गणपतराव पकडतात..

“खबर पक्की होती ना? कुणीच कसं आलं नाही अजून..?”

“हो साहेब, खबर अगदी पक्की होती…पण आलं कसं नाही अजून कुणी??”

“जाऊदे, घाबरली असेल आपल्याला….आपण आपली सभा चालू करू..”

गणपतराव पैशाची थैली पुढे करतात,

“जा..एकेकाला वाटून घेऊन ये घरातल्या प्रत्येकाला….”

कार्यकर्ते बॅग घेऊन निघतात..इकडे गणपतराव सुटकेचा निश्वास टाकतात…

“चला…एक बला टाळली…आजची सभा गाजवून टाकणार मी…इथपर्यंत… नाही..इथपर्यंत गर्दी असणार…लोक माझा जयघोष करणार…”

हात फैलावून गणपतराव मैदानात गर्दीची कल्पना करतात…त्यांनी फैलावलेल्या हातांच्या कोनातून गेलेली मूठभर कार्यकर्ते परत येताना दिसतात…

“ए काय रे बबन्या…???”

“साहेब….अहो घरात एकही जण नाहीये…गावातल्या प्रत्येक घराला कुलूप लावलंय….कुणाला बोलावू आणि कुठे शोधू एकेकाला??”

“गणपतराव हातात येईल ती वस्तू मारून फेकतात, स्टेजवरील सर्व सामान अस्ताव्यस्त करतात…त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसतं….”

“हरामखोर…मा****, पुन्हा वेड्यात काढलंस??? मला??? या गणपतरावाला??? थांब…आता मी काय करतो ते बघच…”

जोतिनगर चे सर्व लोकं सानिका च्या सभेला गेलेले असतात…अगदी आपणहून….सानिका साठी…सभा तिने गाजवली, तिच्या नावाचा जयघोष घुमु लागला…मैदानात मावत नव्हती इतकी गर्दी सभेला हजर होती…अगदी न बोलावता…

सानिका घरी आली…

रामू काकांनी तिला पाणी दिलं… रामू काका टेबल वरची धूळ साफ करू लागले…

“काका…धूळ साफ करताय का?”

“हो ना..”

“काल धूळ चारली तेवढी कमी नाही??”

रामू काकांना घाम फुटतो…

“मी निवडणुकीचा अर्ज भरला…2 दिवसांनी आमची आधीची कामवाली अचानक गायब काय होते…तुम्ही नेमके त्याच दिवशी कसे उगवता… अगदी निम्म्या पगारावर काम करायला काय तयार होता…इथली प्रत्येक खबर गणपतरावांना कशी पोचते…आमची सभा कुठे आणि केव्हा, याची इथंभूत माहिती तिकडे समजते…काहीतरी शिजतंय.. असं नाही वाटत?

रणधुमाळी (भाग 5)

2 thoughts on “रणधुमाळी (भाग 4)”

Leave a Comment