रणधुमाळी (भाग 2)

“मला राजकारणात अजिबात रस नाही…आणि ..”

“हा….आता आली ना आपल्या लायकीवर…एक तर स्वतःमध्ये धमक नाही आणि चालली दुसऱ्याला शिकवायला…राजकारणाला नाव ठेवायचं आणि स्वतः उतरायला लावलं तर फाटते लोकांची…”

“हे बघा…”

“काय? बोल, अजून अर्ज द्यायला एक दिवस बाकी आहे…राहा गं उभी…मतं कोण देईल असं वाटतंय ना? चल..मी स्वतः मत देतो तुला…उभी राहा, जिंकून दाखव…मग येशील माझ्या लेव्हल ला…आपल्याच लेव्हल च्या माणसाशी भांडायला आवडतं आपल्याला…”

सानिका कडे उत्तर नव्हतं…गणपतराव सरळ सरळ सानिका ला निवडणुकीत उतरायचं आव्हान देत होते..

“हा हा हा..झाली ना बोलती बंद..चला रे…आली मोठी मला शिकवायला…”

गणपतराव युद्ध जिंकल्याच्या आवेशात ऐटीने बाहेर पडत होते.. त्याचे 2 साथीदार छद्मी हसत त्यांचा मागे जायला निघाले…

“थांबा…कुठे भरायचा आहे अर्ज?”

“काय??”

“मी विचारलं… अर्ज कुठे भरायचा आहे..”

गणपतराव एकदम शांत होतात…सानिका ने काय विचारलं? आपण काय ऐकलं? खरंच हिने मनावर घेतलं की काय?

“ते…आपलं..का का काय….तू..तू उभी राहणार…? हे हे हे..बघा रे…ससा कासवाची शर्यत…माझा वेग काय हिचा वेग काय…”

“गणपतराव… शाळेत अभ्यास कमी पडला वाटतं तुमचा…शर्यत कासव जिंकतो…विसरलात?”

गणपतरावांचा पुन्हा अपमान होतो…

“ए ए ए…फार बोलतेस…आता अर्ज भरच तू…मी येतो सोबत…उद्या 10 वाजता तयार रहा…”

गणपतराव निघून जातात…

आई सानिकाजवळ येते आणि एक कानाखाली वाजवायला हात पुढे करते…वडील येऊन हात पकडतात..आई त्यांच्याकडून हात झटकून घेते..

“अगं तुझ्या जिभेला काही हाड? आपण कुठे, ही माणसं कुठे…आणि काय? निवडणुकीला उभी राहणार? यासाठी शिकवलं तुला? कोण मत देणारे तुला? आणि काय इज्जत राहील आपली?”

“रुक्मिणी तिला काही बोलू नकोस…मला वाटतं तिने योग्यच केलं…समाजातली अशी कीड आपणच पोसतो…ही कीड मुळापासून नष्ट करायची असेल तर सिस्टीम मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे..”

“अहो काय बोलताय तुम्ही? राजकारण आहे हे..आपल्या खानदानात कुणी केलंय का राजकारण?”

असं म्हणत आई मटकन खाली बसते आणि तोंडावर हात ठेवून रडायला लागते…

सानिका आईजवळ जाते, आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते…

“आई…तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? अगं तुझी मुलगी आहे मी…असल्या पोकळ धमक्यांना घाबरत तर नाहीच, पण आलेलं चॅलेंज हिमतीने स्वीकारणारी..”

आई तिथून निघून जाते…पाणी भरायची वेळ झालेली असते…आई नळ चालू करते, आजही पाणी नाही…गेले 4 दिवस पाण्याचा पत्ता नाही. .गणपतरावांकडे काहींनी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरं त्यांनी दिली होती…

आई बाहेर येते…विचार करते…किती दिवस ह्या असल्या अडचणी सहन करणार? सानिका ने बरोबर तर केलं…

“उद्या अर्ज भरायला जायचंय ना? चला जेवण करा आणि झोपा लवकर..”

आईचं असं मतपरिवर्तन झालेलं पाहून सानिका तिला मिठीच मारते…

तिकडे गणपतरावांना एक अनामिक भीती निर्माण झाली..रात्री त्यांना झोप लागेना…

“ही काय खरंच निवडणुकीला उभी राहणार की काय? छे छे… इतकी हिम्मत थोडीच असेल तिच्यात….आणि खरंच उभी राहिली तर? आपल्या धमक्यांना घाबरून चांगल्या चांगल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं आपण… पण ही? ऐकेल? नाही नाही…मीपण ना…अरे 3 वर्ष निवडून आलोय सलग…मला कसली भीती..”

असं करत करत गणपतरावांना उशिराने झोप लागते… त्यांना स्वप्न पडतं…

लोकांच्या प्रचंड अश्या गराड्यातुन एक गाडी जात असते…सर्व लोकं त्या गाडीला अभिवादन करत असतात..कार्यकर्ते झेंडे फडकवत असतात…जयघोष चाललेला असतो..गुलाल उधळत असतो…गणपतराव खुश होतात…विजयाचा जल्लोष असतो तो…अचानक गाडीकडे लक्ष जातं आणि…गाडीत सानिका उभी राहून हसत सर्वांना अभिवादन करत असते…

हे असलं भयानक स्वप्न बघून गणपतराव ताडकन उठून बसतात…अंग घामेघुम झालेलं असतं… हृदयाची धडधड वाढलेली असते…ते घड्याळाकडे बघतात…सकाळचे 5 वाजलेले असतात…इतक्यात त्यांची बायको जागी होते.

“अहो काय झालं? स्वप्न पाहिलं का? काय पाहिलं? पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे…”

क्रमशः

रणधुमाळी (भाग 3)

1 thought on “रणधुमाळी (भाग 2)”

Leave a Comment