मोरपंखी साडी

 मंजिरीची लग्नानंतरची पहिलीच भाऊबीज होती. त्यांच्याकडे भाऊ बहिणीकडे शिदोरी घेऊन जात असे. लग्नाआधी भांड भांड भांडणाऱ्या भावाची किंमत तिला आज कळू लागली, भावाची ती आतुरतेने वाट पाहू लागली. 

मंजिरीच्या सासरी सगळं कसं छान होतं. मंजिरीची सगळी हौसमौज, कोडकौतुक केलं जात असे. पण कितीही असलं तरी माहेरची ओढ कधी संपत नाही. 

दिवाळी झाली, भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या दिमाखात भाऊ 2-4 पिशव्या भरून आत आला. सासरच्यांनी त्याचं मनापासून स्वागत केलं.वहिनीला दिवस असल्याने ती काही येऊ शकली नाही पण दादाने ती कमी भासू दिली नाही. 

मंजिरीने भावाला ओवाळले, तिचं लक्ष त्या मोठ्याश्या पिशवीकडेच होतं. काय आणलं असेल दादा ने? काय असेल त्यात? तिचं कुतूहल तिला काही शांत बसू देईना. ओवाळणी झाली तशी दादाने ती पिशवी मंजिरीच्या हाती दिली. 

“अरे दादा हे कशाला..” असं म्हणत जोरात ती पिशवी ओढून घेतली. सर्वजण तिला हसू लागले. नवरा म्हणाला..

“अगं केव्हाचं लक्ष आहे तुझं त्या पिशवीकडे..घेऊन टाक एकदाची, नाहक औपचारिकता कशाला दाखवते..”

पुन्हा एकदा सर्वजण हसले. भावाला चहा देऊन ती पटकन पिशवी उचलून  आत गेली अन उघडून पाहिलं. आत तिच्या आवडीची, मोरपंखी रंगाची साडी होती. तिने त्याला हात लावून पाहिला अन तिला आठवलं..

“लग्ना आधी मोठ्याश्या शहरातील लाजरी नावाच्या दुकानात आई अन वहिनी सोबत जायचे, त्यावेळी ही साडी खूप आवडलेली मला..सारखं तिला हात लावून बघायची मी, पण तेव्हा इतकी परिस्थिती नव्हती की विकत घेऊ शकेल..पण दादाला बरोबर लक्षात राहिलं..”

विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं..

“बरं मंजिरी, येऊ का मी आता??”

“दादा लगेच चाललास? थांबून घे की आज..”

“नाही गं.. घराकडे किती कामं आहेत.. मला जायला हवं. “

“दादा, तुझ्या लक्षात राहिलं की मला ही साडी खूप आवडायची, पण अडचणीमुळे आपल्याला काही घेता यायची नाही..पण आज परिस्थिती सुधरल्यावर तू लगेच आणून दिलीस..किती विचार केलास तू माझा..तुझ्या अजून पर्यंत कसं लक्षात राहिलं की लाजरी दुकानात मी ती साडी कायम न्याहाळायची म्हणून??”

“अगं भाऊ आहे मी तुझा..आणि हुशारही आहे बरं का..माझी स्मरणशक्ती एकदम तल्लख आहे..”

“नशीबवान आहेस बाई, असा भाऊ मिळाला..” सासूबाई म्हणाल्या..

भाऊ गेला तसं तिचा नवरा तिच्या जवळ येऊन विचारू लागला..

“आज स्वारी फार खुश दिसतेय, काय होतं मग पिशवीत??”

“अहो पिशवीत की नाही…जाऊद्या, मी सांगत नाही, नेसुनच दाखवते..”

असं म्हणत मंजिरी आत पळाली. नवरा हसू लागला..

“नेसून दाखवते म्हण.. म्हणजे आत साडीच आहे की..म्हणे सांगणार नाही काय आहे आत..कसं ओळखलं बरोबर..”

मंजिरी साडी नेसून आली, मोरपंखी रंग तिच्या अंगावर खुलून दिसत होता. नवरोबांनी स्तुती करताच ती अजून मोहरली. घरात सगळीकडे मिरवून झाल्यावर साडीची छानशी घडी करून तिने ठेऊन दिली. 

“बरं तुझी भाऊबीज तर झाली, आता मला जायचं आहे रश्मीकडे उद्या..आज ती कामानिमित्त बाहेरगावी होती, म्हणून उद्या जातोय…काय देऊ तिला यावेळी??”

“मला जशी साडी घेतली तशीच घ्या की..खूप खुश होतील त्या..”

“बरं.. काय किंमत असेल हिची??”

“4-5 हजार असेल..”

“अरे बापरे..इतकी महाग कशाला?? तुझ्या भावाने तुला दिली म्हणून मीही माझ्या बहिणीला महागडी वस्तू देऊ का? नाही नाही..तिच्याकडे काही कमी नाही पैशांची, स्वतः कमावते ती..काय गरज आहे तिला..”

मंजिरीला खरं तर रागच आला..बहीण कितीही श्रीमंत असली तरी भावाकडून प्रेमाने मिळालेली वस्तू तिला लाखमोलाची असते हे यांना कधी कळणार? माझा भाऊ नाही बुवा तसा..किती प्रेमाने इतकी महागडी साडी आणून दिली मला, आणि तेही माझी आवड आठवून.. ते काही नाही, नणंदबाईंही खुश झाल्या पाहिजे..

संध्याकाळी गपचूप ती लाजरी दुकानात गेली, तश्याच साडीची मागणी करू लागली..

“ती मोरपंखी रंगाची..मऊ सुत… चमक असलेली साडी दाखवा..”

दुकानदाराला नेमकी अशी साडी काही सापडेना..त्याने दुसऱ्या बऱ्याच साड्या दाखवल्या..मंजिरी अखेर वैतागून गेली..

“अहो आत्ताच माझा भाऊ मोरपंखी रंगाची साडी घेऊन गेलेला इथून..तुम्हाला आठवत नाहीये का??”

“एक मिनिट..लग्नाआधी तुम्ही ज्या साडीकडे बघायच्या…तीच का??”

“हो हो हो.. तीच तीच..”

दुकानदाराने चटकन ती साडी काढून दिली अन मंजिरी खुश झाली. 

“हीच हवी होती..किती वेळ लावलात तुम्ही..”

“अहो तुम्ही आधी सांगितलं असतं तर..”

“पण तुम्हाला कसं कळलं की मी या साडीकडे नेहमी बघायची ते??”

“अहो तुमचा भाऊ नाही…वहिनी आली होती साडी घ्यायला….वहिनीला दिवस गेलेत ना??”

“हो बरोबर..”

“मग त्यांनी ही साडी घेताना त्यामागची गोष्ट सांगितली..मला ऐकून भरून आलं खरंच.. त्यांचा नवरा इतकी महागडी साडी घेणार नाही म्हणून गपचूप आलेल्या बहिणीला घेऊन..”

मंजिरी चमकली..

“म्हणजे हे सगळं वहिनीचं काम आहे तर..अन दादा उगाच फुशारक्या मारत होता.. काय तर म्हणे मी हुशार आहे, स्मरणशक्ती तल्लख आहे वगैरे..”

“बरं ताई, ही साडी तुमच्याकडे आहे म्हणता, मग परत कुणासाठी घेताय??”

“माझ्या नणंदसाठी…मिस्टर इतकी महागडी साडी घेणार नाही म्हणून आले गपचूप..”

दुकानदार हसू लागला..

“वहिनी नावाचं नातं असंच असतं, सगळं स्वतःच करतं पण नाव मात्र नवऱ्याचं मोठं होतं.. नवऱ्याच्या भगिनीप्रेमामागे वहिनीने लावलेला जोर असतो बस्स..एवढंच खरं..”

©संजना इंगळे

1 thought on “मोरपंखी साडी”

Leave a Comment