मॅरेथॉन
मॅरेथॉन म्हणजे अनघासाठी एक सोहळाच जणू. लहानपणापासून तिला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची भारी आवड. पहिला नंबर तिने कधी सोडला नव्हता. राज्यस्तरीय स्पर्धेपर्यन्त तिने मजल मारली होती. शिक्षण झाल्यानंतर मॅरेथॉन सोडणार नाही या एका अटीवर तिने सुहासला हो म्हटलं होतं.
अनघाने सांसारिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या, सासू, सासरे आणि नवरा यांना तक्रारीला जागाच सोडली नाही, 1 वर्ष असंच गेलं..पहिल्या वर्षी मॅरेथॉन मध्ये तिने सहभाग घेतला, चौथे पारितोषिक आणले, यावेळी मात्र काहीही करून पहिलं पारितोषिक आणायचं असं तिने ठरवलं.
त्याच वर्षी तिला दिवस राहिले, मॅरेथॉन राहून गेलं पण पुढील वर्षी ती अजून पेटून उठली.
“अगं अजूनही तू बाळंतीण आहेस, कशाला ओढाताण करून घेतेस..”
तिला बरेच सल्ले मिळाले, पण कुणाचंही तिने ऐकलं नाही. तिसऱ्या वर्षी बाळ जरा मोठं झालेलं, तिने पुन्हा मॅरेथॉन ची तयारी सुरू केली..पण एक अडथळा संपत नाही तोच दुसरा समोर, सासूबाईंना गुडघ्याचं दुखणं लागलं..सासऱ्यांना दम्याचा त्रास सुरू झाला..अनघाने सगळं सांभाळलं, पण तरीही लहान बाळ, घरात 2 पेशन्ट असताना तिची चिडचिड होऊ लागली…हळूहळू तिचं मॅरेथॉन चं खूळ डोक्यातून विरू लागलं, संसाराकडे आता ती जास्त ओढली गेली.
21 डिसेंबर चा दिवस, अनघा बाळाला अंघोळ घालत होती, बाळाला झोपवलं आणि सासूबाईंसाठी तेल गरम करायला गेली अन पाहते तर काय, ओट्यावर सगळा स्वयंपाक तयार, सासूबाईंनी तेल आधीच गरम केलेलं, सगळी भांडी धुवून लख्ख..
“हा काय चमत्कार आहे??”
अनघाला कळेना ..तोच सासूबाई अन सासरे आले .
“चमत्कार नाही सुनबाई..आज तुझी मॅरेथॉन आहे, तुला जायला हवं..”
“पण..”
“पण बिन काही नाही, तुला जायला हवं.. बाळाला आम्ही सांभाळू…अगं फक्त वेगाने धावणारा मॅरेथॉन जिंकत नाही..जो स्वतःवर संयम ठेऊन विवेकबुद्धीने प्रयत्न करत राहतो, शारीरिक मर्यादांना जो सांभाळतो तो जिंकतो…आयुष्याच्या मॅरेथॉन मध्ये तू कधीच जिंकलीस, विवेकबुद्धीने कुणालाही निराश केलं नाहीस, स्वतःवर ताबा ठेवला..लोकं फक्त स्वतःसाठी धावतात, पण तू आम्हा सर्वांसाठी धावलीस…मग आम्ही तुला एकदा स्वतःसाठी धावू देणार नाही??”
अनघाच्या अंगात पुन्हा चैतन्य संचारलं, तिने चटकन ट्रॅक सूट घातला…आपली स्कुटी काढली, मैदानात चटकन आपलं नाव नोंदवलं आणि ती धावली..
पहिलं पारितोषिक मिळाल्याची ट्रॉफी तिने आधी सासू सासऱ्यांसमोर ठेवली…