मॅच्युरिटी

रोहन ऑफिस मधून लवकर घरी आलेला, मिताली ला दवाखान्यात न्यायचं होतं. घरी येऊन बघितलं तर मिताली नुकताच बाहेरून आणलेला पिझ्झा फस्त करण्यात दंग होती.
“अगं तुला बरं नाही, त्यात हे असलं खाल्लं तर तब्येत अजून बिघडेल…”
“काही नाही होत रे, तोंडाला चव नाही माझ्या..”
तिने एकटीने तो फस्त केला, आणि रोहन ला म्हणाली चल आता जाऊया.
“काय त्रास होतोय तुला?”
“माझं ना पोट दुखतंय जरा…”

“हे असलं काही खाल्लं की दुखणार नाही तर काय होणार..” सासूबाई ओरडल्या..
मिताली ने तोंड वाकडं केलं, आणि म्हणाली,
“जातांना त्या ज्वेलर कडेही जाऊ, मला एक डायमंड हार करायचा आहे…”
“आत्ता मागच्या आठवड्यात तर एक दागिना केलेलास…”
“मग काय, स्वतः कमावते मी…दुसऱ्याकडून नाही मागत…”
“अगं हो, पण बचत करावी जरा…पुढे मागे कामात येतात…”
“होका सासूबाई? माझा अर्धा पगार मी तुम्हाला देते, मागे माझ्या खर्चासाठी थोडी मदत मागितली तुमच्याकडे तर म्हणे पैसे संपले…तुम्ही तरी करता का बचत..?”
“तुझं कामच आहे ते पैसे देण्याचं..उपकार केल्यासारखं काय वागतेस..”
रोहन ला सवय झालेली या कटकटीची, तो तिला घेऊन लगबगीने बाहेर गेला.
घरात सासुबाईंची बडबड चालू, माझा गुडघा कधीचा दुखतोय, तेव्हा नाही येणार धावत पळत घरी…आणि बायकोचं साधं पोट काय दुखलं तर लगेच…
मिताली, रोहन, सासूबाई आणि सासरे असा छोटा परिवार, घरात पैशाची कमतरता नाही, सर्व कामांना नोकर. पण मानसिक शांतता नाही..मिताली आणि तिच्या सासुबाईंचे छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायचे.
सकाळी सर्वजण आवरून बसले, सासूबाई पुस्तक वाचत होत्या, मिताली मोबाईल वर फोटो अपलोड करत होती, रोहन ला सुट्टी होती तो पेपर वाचत बसलेला आणि सासरे tv बघण्यात व्यस्त. इतक्यात झाडू फारशी करणारी सासू सुनांची जोडी काम करायला आली. सून वरची खोली साफ करायला गेली, सासूने फक्त आजीला पाहिलं आणि त्यांना चहा करून दिला.
आजीने चहा घेतला, बाहेर जाऊन भांड्यातील एक कप घेतला, त्यात अर्धा चहा ओतला आणि सुनेला आवाज दिला…
“घे बाय..अंग नरम गरम हाय तुझं…कामं राहू दे, मी करून घिल…हा च्या घे”

“नाय आत्या, बरं हाय मला…तुम्हातर व्हनार नाय…”
त्या दोघी बाहेर बसलेल्या इतक्यात सासूबाईंनी मागच्या महिन्याचा पगार सुनेच्या हातात दिला,
सुनेने लागलीच तिच्या सासुकडे दिला…
मिताली पण हे सगळं बघत होती,
“काय गम्मत वाटते काय माहीत हे असं करायला, उद्या गरजेला सासुकडे मागितलं तर एक पैसा देणार नाही ती आजी…” मिताली मनातल्या मनात म्हणाली…
इतक्यात बाहेरून गाडीचा आवाज आला, मोलकरीण आजीचा मुलगा बाहेर आलेला…एक निरोप द्यायला..
“थांब राक्या, हिला दवापानी करून आन..ऐकतच नाय…सरकारी मधी नको नेऊ, हे घे पाचशे रुपये, चांगला डाकटर बघ..”
राकेश बायकोला घेऊन गेला, आजी घरातलं आवरू लागली…
मिताली आणि तिची सासू बघत होत्या…
दुसऱ्या दिवशी सून ठणठणीत बरी होऊन हजर, तिच्या गळ्यात सोन्याची चैन चमकत होती…
“इतके पैसे कुठून आणले?” मिताली कसलाही विचार न करता बोलली..
“सासूबाई दर सहा महिन्याला पैसे साठवून माझ्यासाठी दागिना बनवून घेतात…पुढे मागे काही प्रसंग आला की कामी येईल म्हणत्यात…”


आजीचं सुनेच्या हातातून पगार आपल्या हातात घेणं..सुनेने सासूच्या काळजीने आजाराची पर्वा न करणं.. मुलाला त्याच्या बायकोची काळजी घ्यायला सांगणं….सुनेच्या हौसेचा आणि भविष्याचा विचार करून आजीने पैशांची तजवीज करून ठेवणं….हे आत्यंतिक मॅच्युरिटी असलेल्या कुटुंबाचं दर्शन होतं. मिताली आणि त्यांचं कुटुंब भरपूर पैसा असूनही त्यांच्यासमोर हरलं होतं…


2 thoughts on “मॅच्युरिटी”

  1. सुंदर कथा👌
    बरेचदा कमी शिकलेल्या लोकांकडून पण छान संदेश मिळतो…पण तो घेणं न घेणं हे मात्र आपल्या हातात असत.

    Reply

Leave a Comment