मृत्यूनंतर काय होते? मरणाला स्पर्श करून परत अलेल्यांचे अनुभव

“मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही” अशी आपल्याकडे म्हण आहे, त्याचा आपण जरी शब्दशः अर्थ घेतला नाही तरी त्याचा शब्दशः अर्थ खरा आहे.

जगात काही लोकं अशी आहेत की ज्यांना मेडिकली डेड घोषित करण्यात आलं मात्र काही सेकंदांनी त्यांच्यात पुन्हा प्राण संचारला. याला निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही, पण यांच्या कहाण्या खरंच आपल्याला वेगळ्या विषयावर विचार करायला भाग पाडतात. मेल्यानंतर काय होतं हे सांगायला मृत व्यक्ती अस्तित्वात राहत नाही, पण मृत्यूला स्पर्श करून परत फिरलेली माणसं नक्कीच हे विस्ताराने सांगू शकले.

Near death experience असलेल्या या व्यक्तींमध्ये एक गोष्ट सारखी दिसून आली, ती म्हणजे प्रत्येकाला मृत्यू नंतर एक विलक्षण अनुभूती मिळाली होती, ना कुठलं दुःख, ना वेदना, ना कसलं जडत्व…केवळ एक जाणीव…कमालीच्या शांततेची.

काहींना आपण जमिनीत अगदी आत ओढल्या सारखी जणीव झाली, काहींना वर आकाशात खेचल्यासारखी. परंतु या प्रत्येकाला मृत्यूनंतर एक प्रचंड तेजस्वी प्रकाश दिसू लागलेला, एक दिव्यत्व अनुभवास आलं.

आपल्यात ऋणानुबंध ची जी संकल्पना आहे ती काही अंशी खरी दिसून येते, कारण मृत्यू समयी अनेकांना आपले पूर्वज दिसू लागले होते. आपले आजोबा, पणजोबा, आजी अश्या निधन झालेल्या पूर्वजांना मृत्यूसमयी पाहिलेले अनेक व्यक्तींनी पाहिले आहे.

माझे आजोबा जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा ते शेवटच्या दिवशी सतत म्हणायचे, “तुझी आजी आलीये, पूर्ण घर पाहुन घेतेय ती, माझी आता वेळ झाली, ती मला बोलावतेय…”

आजीला जाऊन 2 वर्ष झालेली, आजोबांना हे असलं बोलताना आम्ही कधीच पाहिलं नव्हतं.

पॅरॅलीसिसने माझ्या आजीचं निधन झालं होतं, तेव्हा सुद्धा अंतिम समयी आजी म्हणायची की तिला तिची आजी दिसतेय…

ही ऋणानुबंधाची गुंतागुंत खरंच अद्भुत आहे.

मृत्यूला स्पर्शून परत आलेल्या एका व्यक्तीने तिचा अनुभव सांगितला… हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं तेव्हा तिला आसपास होणाऱ्या सर्व गोष्टींची जाणीव होत होती…एकाच वेळी ती हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गोष्टी आणि घरात घडणाऱ्या गोष्टी एका वेळी पाहू शकत होती. ती स्वतःला “omnipresent” म्हणजेच एकाच वेळी अनेक ठिकाणी असल्याचे जाणवत होती. इतकं असून आप्तांचे रडणे आणि त्यांची व्यथा पाहून तिला काहीच भावना जागृत नव्हती, एक विलक्षण अनुभूती तिला मिळत होती.

अश्याच एका व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर तिला एक आवाज ऐकू आला की तुझं या जगातील काम अजून बाकी आहे, असं म्हणत तिला एक वेगळाच धक्का लागल्याची जाणीव झाली आणि ती पुन्हा भौतिक जगात परत आली.

आपण जर अध्यात्माचा थोडा खोलवर आणि शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की ही “दिव्यत्वाची अनुभूती” हेच खरं सत्य आहे. ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी अध्यात्मात आत्मिक शिक्षण देण्यात आलं आहे, विज्ञानही ज्याची उकल करू शकला नाही अश्या दैवी आणि नैसर्गिक घटनांची उत्तरं शास्त्र पुराणात दिली आहेत.

वर सांगितलेले बहुतांश अनुभव हे आपल्या पुराणात मांडलेले आहेत. प्रकाश दिसणं, तेजस्विता अनुभवयास मिळणं, स्थितप्रज्ञ अवस्था, गती प्राप्त होणं, दिव्यत्वात विलीन होणं…. या सर्व अवस्था वेद पुराणात मांडल्या गेल्या आहेत. पण आज अध्यात्माला जे स्वरूप देण्यात आलंय त्यामुळे अध्यात्माची मूळ संकल्पना बाजूला सारली गेलीय.

हे आहेत मृत्यू समयी अनुभवास बआलेले आणि मृत्यूहून परतलेल्या व्यक्तींचे अनुभव. तुमच्याही जवळच्या लोकांबाबत कुणाकडून असा अनुभव ऐकला आहे का?नक्की कळवा कंमेंट मधून.

Leave a Comment