“वडिलांचा स्वभाव छान आहे…आई मात्र जरा…”
साक्षी ला नुकतेच पाहुणे पाहायला येऊन गेलेले. साक्षीच्या काकांनी त्यांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आणलं होतं. काका आणि वडीलांमधील भावनिक संबंध बघता इतक्या वयानंतरही दोघा भावात कधी वाद झाले नव्हते..कुटुंबाचं हेच प्रेम बघून स्थळाने साक्षीमध्ये रुची दाखवली.
पाहण्याचा कार्यक्रम झाला..नंतर काही कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी झाल्या..मुलाला साक्षी आवडली…दोन्ही घरांकडून होकार आला.
“तुम्ही आमचे मित्र होता, आता नातेवाईक बनला..अभिनंदन..”
काकांच्या घरी त्यांचे मित्र आलेले…दोघेही खुश होते..
“बरं आता तयारीला लागावं लागेल..तुमच्या भावांना बोलावून घ्या..”
“तुला माहितीये ना, माझे भाऊ गेली कित्येक वर्षे माझ्याशी बोलत नाहीये…आता कसे येतील ते..पत्रिका देऊन येईन… यायचं तर येतील..”
“बरं… तुम्हाला मुलगी आणि कुटुंब आवडलं ना? मग झालं तर..”
आत साक्षी काकूसोबत किचन मध्ये होती..सुट्टीचा दिवस म्हणून ती काकू ला भेटायला येतच असे…पण पाहुण्यांना माहीत नव्हतं की साक्षी इथेच आली आहे ते..
काकू आणि साक्षी गमतीने त्यांचं बोलणं ऐकत होत्या…साक्षी मधेच लाजत होती आणि काकू कौतुकाने पाहत होती…
“कुटुंब छान आहे हो… वडिलांचा स्वभाव खूप छान आहे…अगदी बोलके आणि मनमोकळे आहेत..”
आपल्या वडिलांबद्दल ऐकून साक्षीला भरून येत होतं.. इतक्यात होणाऱ्या सासूबाईंचा आवाज आला..
“वडील चांगले आहेत, पण आई जरा कारस्थानी वाटते..”
“नाही हो…आमची वहिनी नाही अशी..”
“अहो बायकांची नजर समोरच्याचा स्वभाव लगेच हेरते…त्या अगदी शांत बसून होत्या, मुलीकडे पाहत होत्या…असं वाटत होतं की नजरेनेच तिचे कान भरताय की काय..”
काकांना काय बोलावं कळत नव्हतं…आतून साक्षीने हे ऐकलं आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली…ती तडक बाहेर आली..तिला पाहून पाहुणे जरा घाबरलेच..
“तुमची चूक नाही…वर्षानुवर्षे हेच चालत आलं आहे…मुलीच्या आईला ‘वाईट’ म्हणूनच गृहीत धरलं जातं..कारण तिने पाहिलेलं असतं, संसाराच्या आत घडणारे हेवेदावे…वडिलांनी फक्त दुनिया पाहिलेली असते…पण आईने दुनियादारी पाहिलेली असते चार भिंतीच्या आत घडणारी…सासू, सासरे, नणंद, दीर यांची वागणूक..आपल्याच घरात मिळणारं परकेपण… हे तिने अनुभवलेलं असतं…म्हणून तिच्या चेहऱ्यावर काळजी असते…वडील माणसांशी बोलत असतात पण आई मौनानेच मनं ओळखत असते…वडील अर्ध्याहून अधिक काळ बाहेर असतात पण आई झुंजत असते घरतल्याच वादळाशी…अपमान, टोमणे, तिरस्कार तिने पाहिलेला असतो…तेही आपल्याच लोकांकडून.. या लोकांचं मन जिंकण्यात तिचं अर्ध आयुष्य निघून जातं… अश्या आईने लेकीला शिदोरीत तेच द्यावं का? आपल्याला जे भोगावं लागलं ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती शांत होऊन जाते…आपल्या बोलण्याचा विपर्यास होऊ नये आणि मुलीच्या संसाराला झळ पोहोचू नये म्हणून ती शांत असते….तिच्या शांत असण्याचा अर्थ तिच्या मनात कपट चालू आहे असा नाही..”
“मुलगी फारच बोलते हो..” होणाऱ्या सासूबाई काकांना म्हणाल्या..
साक्षी आपल्या काकुचा हात धरून तिला बाहेर आणते..
“काकू सांग यांना…जमिनीच्या वादावरून दोन्ही भाऊ किती भिडले होते? तेव्हा तू आणि आई मध्ये पडले..काहीही झालं तरी दोन्ही भावात वितुष्ट नको यायला म्हणून दोघींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि कुटुंब जोडून ठेवलं…आणि तुम्ही तर स्वतःच्या भावांना लग्नात बोलवायला कचरताय…यावरूनच समजतं… कपट कुणाच्या मनात असेल ते..”
काकांचे मित्र आपल्या बायकोकडे तिरक्या नजरेने पाहायला लागले…
काहीही न बोलताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला…
मैत्रीणींनो, तुम्हालाही अनुभव आलाच असेल, मुलीची आई हे फार संवेदनशील नातं आहे, या आईबद्दल समाजात आधीच एक पूर्वग्रह असतो, आईच्या कुठल्याही वागण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो…याउलट मुलाच्या आईचे नको ते नखरे खपवून घेतले जातात…मग प्रश्न पडतो, मुलाला जन्म दिला काय अन मुलीला दिला काय, आई ती आईच असते…मग केवक ‘मुलीची’ आई म्हणून कमीपणा का घ्यावा??
काय वाटतं तुम्हाला, कंमेंट मध्ये नक्की कळवा…
अगदी खर आहे