मिशन इंडिया (भाग 6)

नीरज ला समजतं की ज्या गुरुजी च्या इशाऱ्यावर ही सगळी मंडळी कामं करत होती ते गुरुजी दुसरे तिसरे कुणी नसून वेशीवर भेटलेला वेडा माणूसच होता.

पण आता खूप साऱ्या गोष्टींची उकल अजूनही बाकीच होती, गुरुजी वेड्या माणसाचं सोंग का घेताय? राशीद इथे काय करतोय? त्या नकली पासपोर्ट छापायच्या गुन्ह्याचा आणि परभणी जिल्ह्यातच हे सगळं करायचा काय संबंध?

नीरज ला आता काहीही करून पुन्हा मागे जायचं होतं, सगळी उकल करायला, पण चालू बस कशी थांबवायची??? त्याला 3 idiots मधला फरहान चा प्रसंग आठवला, त्याने छाती पकडत ओरडायला सुरवात केली..

“बस थांबवा… बस थांबवा…”

कंडक्टर ओरडला…बस थांबली तसे सर्वजण नीरज भोवती जमा झाले, एक माणूस आला…

“मी डॉक्टर आहे, यांना तपासून लगेच एक इंजेक्शन देतो..”.

ते ऐकताच नीरज ने झटापट करत मार्ग काढला आणि तो बॅग उचलत बस मधून बाहेर पळाला…

कंडक्टर ओरडला…

“ओए…वेडा आहेस का??”

“हो…हो…हो..मी वेडा… मी वेडा..”.

नीरज असा ओरडला आणि सर्वांनी त्याला चार शिव्या हासडल्या, बस त्याला सोडून पुढे निघून गेली…

नीरज थांबला असला तरी मुख्य गावापासून बराच पुढे आला होता…आता रात्र होत आलेली, तो फिरत फिरत एका पडक्या झोपडीपाशी आला…तिथल्या एका म्हाताऱ्या जोडप्याने त्याची चौकशी केली, त्याला जेवण दिले आणि रहायची सोय केली…नीरज जेवून पडला तेवढ्यात आजोबा गाडी काढून बाहेर निघून गेले…

“या वेळेस आजोबा कुठे चाललेत??”

नीरज ने आजीला प्रश्न विचारला..

“त्यांना नवीन काम मिळालं आहे, सरकारी कागदपत्रे एका ठिकाणी पोचवायची…फार जोखमीचं काम आहे …यासाठी प्रामाणिक माणूस पाहिजे ज्याच्यावर शंका यायला नको, म्हणजे…असं ते साहेब बोलत होते..म्हणून आमच्या यांना निवडलं…”

आजी लाजत सांगू लागली..

नीरज ला शंका येऊ लागली…”हे तेच पासपोर्ट पोचवयचं काम तर करत नसतील ना? पण पोलिसांनी त्यावर छापा टाकला आहे…मग तरीही??”

नीरज आजीकडून अजून माहिती घेऊ लागतो…

“कसली कागदपत्र आजी?”

“त्यावर नाही का ते अशोकचक्र असतं ते…जाड काळं कव्हर असतं..”

नीरज ला खात्री पटली की हे तेच काम बाबांसारख्या निरागस माणसाकडून करून घेताय…नीरज तातडीने अंथरुणातून उठतो आणि बाबांच्या मागे चालू लागतो…

“ए बाबा…कुठे चाललास? आणि हे कुणाला सांगू नको हा..बाबांनी कुणालाही सांगायला लावलेलं नाही…”

नीरज एक सायकल उचलतो आणि बाबांचा पाठलाग करतो….बाबा एका पडक्या घराबाहेर थांबतात, एक माणूस आत येऊन बॅग घेऊन जातो…आणि बाबांच्या हातात 2000 ची नोट ठेवतो….

नीरज तिथून पसार होतो…राशीद च्या गावात परत जातो…यावेळी तो वेडा माणूस म्हणजेच गुरुजी जागेवर नव्हते. त्याने चौकशी केली पण ते कुठेही सापडले नाही, नीरज ला समजतं की राशीद सुद्धा मुंबईला परत गेलाय..

नीरज मुंबईला परत येतो आणि पुन्हा या चौघांचा पाठपुरावा करतो, त्याला यश येत नाही..मग अचानक त्याच्या डोक्यात येतं की त्याच्या शेजारची स्त्री, संपदा सुद्धा या टीम मध्ये सामील आहे, मग एक दिवस तो त्यांना भेटायला जातो…

“या या पत्रकार साहेब…आज कसकाय येणं केलंत?”

“काही नाही, सहजच…”

“संपदा…बाळ चहा आण बरं…. आमची सुनबाई मैत्रिणीसोबत जातेय छान दुबई फिरायला..”

“हो? कधी?”

“25 मे ला.”

नीरज ला एक क्लु मिळतो, तो आशा चव्हाणचा पाठपुरावा करतो..त्यांचाही दुबई दौरा नेमका त्याच दिवशी असतो…

नीरज सारिका मिराजदार च्या ऑफिस मध्ये फोन लावतो..

“हॅलो, सारिका मॅम आहेत का?”

“तुम्ही तेच का? मागच्या वेळी माझं डोकं खाल्लं होतं ते?”

“होय..”

“यावेळी मी नाही सांगणार त्या कुठे आहेत…25 तारखेला सकाळी 11 वाजता दुबई ला जाणार आहेत, त्यांची तयारी चालीये तेव्हा त्यांना त्रास देऊ नका…”

नीरज ला राशीद ला फोन करत बसत नाही…तो स्वतः 25 मे ची दुबई ची 11 ची फ्लाईट बुक करतो…

25 मे ला सर्वजण फ्लाईट मध्ये जातात, हे चौघे लांब लांब बसलेले असतात पण त्यांच्यात चालू असलेले इशारे नीरज च्या लक्षात येतात. विमान उड्डाण करतं आणि काही वेळाने 5 लोकं मध्यभागी येऊन आपले पिस्तुल बाहेर काढतात..

“प्लेन हायजॅक… प्लेन हायजॅक…”

पायलट आकांताने ओरडला आणि कंट्रोल रूम मध्ये त्याचा सिग्नल अचानक तुटला..भारत सरकारला माहिती देण्यात आली..सर्वांना 1999 च्या प्लेन हायजॅक आठवण झाली, 155 प्रवाशांना ओलीस धरण्यात आलं होतं. विमानात 5 अतिरेक्यांनी सर्वांवर बंदुका रोखून धरल्या होत्या…प्रवाशी घाबरून गेले, काहींना bp चा त्रास, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, काहीजण रडायला लागले, काही क्षणापूर्वी नॉर्मल वातावरण असताना आता अचानक मृत्यू समोर दिसू लागला….

नीरजच्या मनात मात्र भीती नव्हती, त्याला मृत्यूचं भय नव्हतं…शिखा, सारिका, विशाल आणि राशीद चं गूढ उकलायला तो इथवर आलेला…ही चौघे सुद्धा याच विमानात होती….

राशीद धिटाईने उभा राहून दहशतवादयांना विचारतो,

“काय हवंय तुम्हाला??”

“काश्मीर….”

असं म्हणताच राशीद, सारिका आणि संपदा मोठमोठ्याने हसायला लागतात….प्रवाशी घाबरतात…दहशतवादी अजून चिडतात..

“काश्मीर??? अरे मग तुम्ही रस्ता विसरलात….काश्मीर आभाळात नाही, खाली जमिनीवर आहे..”

दहशतवादी आशा चव्हाण कडे रागाने बघतात, आशा चव्हाण आपल्याला काहीच माहीत नाही असा इशारा दहशतवाद्यांना करते…

हे तिघे अगदी आरामात आपलं सीट सोडून दहशतवाद्या जवळ येतात…संपदा पायलट रूम मध्ये असलेल्या दहशतवादी कडे जाते…जाताच त्याच्या डोक्यात एक टपली मारते…

“काही समजतंय का की उगाच आपली मशीन ची बटणं बघतोय….”

ते पाहून पायलट घाबरतात…

“मॅडम तुम्ही बाहेर जा…बाहेर जा…”

“बाहेर तर हा जाईल हो…” असं म्हणत त्याच्या पोटात ती जोरात ठोसा मारते….

दहशतवादी चिडतो, बंदूक संपदा वर रोखतो..

“जास्त माज चढलाय का…हे प्लेन हायजॅक झालंय समजतंय का??”

“हो हो…पण तुम्ही आम्हाला नाही…आम्ही तुम्हाला हायजॅक केलंय..”

“म्हणजे??”

“जमिनीवर सापडले नसते तुम्ही…म्हणून वर आणलंय, आता इथूनच तुम्हाला अजून वर पाठवणार…”

दहशतवादी बंदूक रोखून गोळी झाडतो…

“कच्च…”

बंदूक फुस्स….गोळ्याच नसतात…

इकडे बाहेरही एकच हशा पिकतो…दहशतवादी बंदुकांचे नुसते पुच पुच आवाज करत असतात आणि प्रवाशांना समजतं की बंदुकांमध्ये गोळ्याच नाहीयेत…

एक दहशतवादी चिडून आशा चव्हाण कडे बघतो…

“ये खेल खेला हमसे??”

क्रमशः

1 thought on “मिशन इंडिया (भाग 6)”

Leave a Comment