मिशन इंडिया (भाग 3) ©संजना इंगळे

 
 
 
 
राशीद एक गूढ व्यक्तिमत्त्व होतं, तो कुठे राहायचा, काय करायचा कुणालाही माहीत नव्हतं. त्यात नीरज ला राशीद ची मुलाखत घ्यायला सांगितली होती. राशीद चा पत्ता मिळवणं खरंच अवघड होतं. काही वर्षांपूर्वी त्याने मिळवलेल्या मेडल चे फोटो नीरज कडे होते. 
 
मोठ्या मुश्किलीने नीरज राशीद ची माहिती काढतो, त्याला समजतं की राशीद एका स्पर्धेनिमित्त पुण्याला जाणार आहे. नीरज तडक बस पकडतो आणि त्या ठिकाणी पोचतो. स्पर्धेला अजून अवधी असतो, आता इतका वेळ काय करायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो. 
प्रेक्षकांच्या खुर्चीत जाऊन तो बसतो, जाम भूक लागलेली असते, पण तिथून हलून चालणार नव्हतं. त्याला माहित होतं की राशीद कोणालाही भेटत नाही, स्पर्धा झाली की तो तडक काढता पाय घेईल. 
 
इतक्यात त्याच्या पुढ्यात समोश्याची प्लेट येते. नीरज कसलाही विचार न करता ती हातात घेतो आणि पहिला घास घेता घेता शेजारी बसलेल्या इसमाला थँक्स म्हणतो. 
 
“मॅच पहायला आलात?”
 
“हो…” तोंडातला घास आवरत नीरज उत्तर देतो…
 
तो इसम नीरज कडे बघतच असतो, नीरज ला थोडं वेगळं वाटतं. खाऊन झाल्यावर नीरज त्याला विचारतो..
 
“आपण?”
 
“मी ….इसम…”
 
“हे नाव आहे?”
 
तो माणूस गूढ हसतो, 
 
नीरज उत्तराची अपेक्षा करत नाही, त्याचं पोट भरतं त्याचंच त्याला समाधान..
 
“नेमबाजीत आवड आहे?” 
 
“नाही…मी पत्रकार नीरज..मिस्टर राशीद ची मुलाखत घ्यायला आलोय..”
 
“मिळेल?”
 
“पकडतो बरोबर त्याला..”
 
“त्यापेक्षा माझी मुलाखत घ्या, मी मोकळाच आहे, मला पकडण्याची गरजही नाही..”
 
नीरज हसतो, असही इतका वेळ काहीतरी टाईमपास हवाच ना.
 
“बरं… तुमचं नाव तर सांगितलं नाही, काय करता आपण?”
 
“आपल्या देशासाठी जे काही करता येईल ते ते सगळं करतो..”
 
“मूळचे कुठले आपण?”
 
“परभणी…. शाळेत असताना खेळाची आवड…घरून विरोध….पण शाळेतल्या गुरुजींनी मार्ग दाखवला…”
 
“मग…आज यशस्वी आहात का?”
 
“निदान लोकं तरी असंच म्हणतात…”
 
तो माणूस गुढरीत्या उत्तरं देत होता..
 
थोड्या वेळात स्पर्धेची घोषणा झाली, आणि तो इसम गायब झाला…
 
राशीद च्या नावाची घोषणा झाली आणि नीरज स्वतःवरच राग काढू लागला,
 
कारण तो शेजारी बसलेला इसमच राशीद होता…त्याने स्वतःचा अवतार एकदम बदलून टाकलेला, फोटोत पाहिलेला राशीद आणि हा इसम अगदी वेगळे दिसत होते…
 
स्पर्धा झाली, राशीद त्याचं गोल्ड मेडल घेऊन केव्हाच पसार झाला…निरज इकडे गर्दीतून वाट काढत तिथे पोहचे पर्यन्त तो तिथून गायब झाला होता…
 
नीरज ला स्वतःवरच संताप झाला…
 
“का ओळखु शकलो नाही मी याला?”
 
इतक्यात नीरज च्या बॉस चा फोन..
 
“मुलाखतीचं काय झालं?”
 
“घेतली.”
 
नीरज ने खोटं बोलून वेळ मारून नेली, पण मुलाखत तर लिहावी लागणार होती…नीरज त्याच्याशी झालेल्या संभाषणातल्या गोष्टी आठवू लागला…आणि त्याच्या आधारे तोडकी मोडकी मुलाखत त्याने लिहिली..आणि पुन्हा एकदा आपली नोकरी वाचवली. 
 
आता उरलेले दोन लोकं म्हणजे आशा चव्हाण आणि दिग्विजय सिंग….आशा चव्हाण राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. आणि दिग्विजय सिंग एक मोठे पोलीस ऑफिसर. या दोघांच्या मुलाखतीला अडचण आली नाही. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता मुलाखत दिली. 
 
निरज ने जवळपास 30-35 लोकांच्या मुलाखती घेतल्या पण ही चार लोकं… सारिका मिराजदार, राशीद, आशा चव्हाण आणि दिग्विजय सिंग… या लोकांच्या मुलाखतीत एक साम्य होतं….”गुरुजी…”
 
प्रत्येकाने आपापल्या मुलाखतीत या “गुरुजींचा” उल्लेख केला होता. असं वाटत होतं की या चौघांचं कुठल्या तरी मिशन साठी connection आहे, आणि त्यांचा केंद्रबिंदू आहे हा “गुरुजी..”.
 
नीरज ला या चौघांव्यतिरिक्त अजून एक व्यक्ती भेटते…जी कुणी मोठी व्यक्ती नव्हती पण तिचं अत्यंत गूढ असं व्यक्तिमत्त्व होतं…
 
नीरज घरी जातो, घराची चावी शेजारी ठेवलेली असते. आणि नेमके शेजारी बाहेर गेलेले असतात. तो वाट पाहतो, थोड्या वेळाने ते येतात. नीरज पहिल्यांदा काकूंच्या मुलाला आणि सुनेला जवळून बघत असतो. एरवी तो मुलगा दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचा…आणि सून दिवसभर घरकाम.
 
काकांनी चावी दिली पण घरात बोलवून चहा साठी आग्रह केला…काकांच्या सुनेने चहा आणून दिला…ती मुलगी इतकी संस्कारी होती की अगदी डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून ती पुढे आलेली..आणि निघताना माझाही पाया पडायला लागली..
 
“अहो वहिनी हे काय करताय..”
 
“काय सांगू तुम्हाला, आमची सुनबाई संपदा इतकी संस्कारी आहे की विचारू नका…आमचं नशीब चांगलं म्हणून अशी सून मिळाली…आमचा एक शब्द टाळत नाही..जगात अशी सून सर्वांना मिळो..”
 
तिचं तोंडभरून कौतुक सासू सासरे करत होते…ते ऐकून निरज चावी घेऊन घराकडे गेला…घरात जाऊन फ्रेश होतो. चहा साठी दूध आणायला जवळच्या दुकानात जातो…दुकान आज नेमकं बंद होतं… मग तो बऱ्याच अंतरावर पुढे जातो…तिथे एका टपरीवर काही माणसं सिगारेट ओढत बसलेली असतात..इतक्यात तिथे एक कॅप घातलेली आणि जॅकेट, जीन्स घातलेली मुलगी येते आणि दुसऱ्याने पकडलेल्या लायटर ने तिच्या तोंडातली सिगारेट पेटवून घेते…
 
“क्या सॅम, आज लेट कर दिया..”
 
“घर मे भुखे लोग आके बैठते है, त्यांना चहा ढोसवला…”
 
ती मुलगी जशी वळते तसा तिचा चेहरा स्पष्ट दिसतो…ही तीच…संपदा…नीरज थरथरू लागतो…एकाच व्यक्तीचे असे दोन टोकाचे व्यक्तिमत्त्व???
 
“ढोसलेला” चहा त्याच्या पोटात गटांगळ्या खाऊ लागला…
 
क्रमशः

 

Leave a Comment