मालिका..आणि मला पडलेले प्रश्न 🤔🤔🤔

 मनोरंजनाचा अगदी शेवटचा पर्यायही जेव्हा संपला तेव्हा टाईमपास म्हणून tv सुरू केला, त्यातही मराठी सिरीयल चं चॅनेल. या मालिकांचं एक मात्र खरं, मालिकांमधील लोकांचं आयुष्य कधीच सरळ नसतं. सतत एखादं संकट आ वासत यांच्या मानगुटीवर बसलेलं असतं. आता ती सुभेदारांची…सॉरी सॉरी..आता बनहट्टीची राधिका..इतकी चांगली, इतकी सरळ तरी हिच्या मागे काहीना काही सुरूच..बहुदा मागच्या जन्मी एखाद्या सिरीयल मध्ये खलनायक असणार, त्याशिवाय का इतकी संकटं येणार? तेही जाऊद्या, ती कुलकर्णींची शुभरा.. एकेकाळी घराचा सगळा भार तिच्यावर आलेला, पण कितीही काम पडलं तरी तिने केशसंभार कधी बिघडवला नाही, बायांनो शिका काहीतरी.. आपल्याकडे सकाळी आंघोळीनंतर केसांना जे डांबून ठेवतात ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर सोडतात(निदान मी तरी). बाईसाहेबांना कधीच झाडू मारताना, फरशी पुसताना, फोडणी देताना पाहिलं नाही. तरीही तिचं इतकं कौतुक? आम्ही मेलं इथे भांडी घास घास घसणार आणि तिथे त्या नखरे करणाऱ्या शुभराचं कौतुक आम्ही ऐकणार. जाऊद्या…आपल्याला काय.!!!

मोर्चा दुसऱ्या मालिकांकडे वळवला, तिथे तर गजबच प्रकार..अपघाती लग्न झालं, आणि “तो” कार्यक्रम नको म्हणून चक्क पलंगाच्या दोन्ही बाजूला अंथरुण टाकून दोघेही झोपलेले. अरे तुम्हाला नसेल काही कार्यक्रम करायचा तर नका करू पण म्हणून इतका मोठा पलंग मोकळा सोडून हाल करून घ्यायची कोणती पद्धत? नुसतं एका पलंगावर झोपल्याने यांना पोरबाळं होणार होती काय? काहीही आपलं..जाऊद्या आपल्याला काय..!!!

बरं मालिका आहे, काल्पनिक कथानक आहे इथवर ठीक आहे, पण म्हणून प्रत्येक प्रहरी भडक मेकपमध्ये राहायची गरजच नाही ना, आम्ही लग्नाला जाताना जी रंगरंगोटी करतो ती या मालिकांमधील बायकांच्या सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपेतही असते. थोडं तरी realistic दाखवा. यांच्या जेवणाची ताटं बघण्यासारखी, कधीच मला नुसती भाजी पोळीचं जेवण दिसलं नाही, शाही थाळी प्रमाणे सर्वांना रोज जेवायला मिळतं. नशीब लागतं खरंच..!!! जाऊद्या.. आपल्याला काय 🙄🙄🙄

एकही मालिकेत साधं सरळ लग्न झालं नाही, एकतर आधीचा प्रियकर येतो, नाहीतर सासू काहीतरी राजकारण करते, नवरा नवरीपैकी एकाची इच्छा नसते, मग एकतर लग्न मोडतं नाहीतर अपघाती लग्न होऊन जातं. लग्न हा प्रकार कधीच सरळमार्गी झाला नाही. जाऊद्या, आपल्याला काय…!!!

सर्वात जास्त डोकं तेव्हा फिरतं जेव्हा एकीचंही बाळंतपण सरळमार्गी होत नाही. मूल होऊ शकतं की नाही इथपासून सुरवात होते ती मूल अदलाबदल करण्यापर्यंत स्टोरी संपत नाही. 

माझ्या भोळ्या मनाला कायम प्रश्न पडतो, या बायकांना स्वयंपाकाला वेळ कधी मिळतो? पोळ्या कधी लाटतात या? लादी पुसताना आजवर कुणी दिसलं नाही, मग मोलकरणीला स्क्रीनवर एकदाही दाखवत का नाही? एखादा जेवणावर बहिष्कार टाकतो मग त्याचं उष्ट ताट आणि बाकीचं खरकटं या बायका कुठे टाकतात? माणसांना बायांच्या मनधरणी करण्याव्यतिरिक्त काही कामं नसतात का? या बायका बाथरूमला कधी जातात? इतकी आधुनिक किट उपलब्ध असतांना आणि मासिक धर्म चुकलाय हेही लक्षात न घेता उलट्या झाल्याशिवाय आपण प्रेग्नंट आहोत हे यांना कसं समजत नाही? लॅपटॉप वर काम करताय असं दाखवताना जो तो आपला टायपिंग स्पीड फक्त दाखवत असतो, ही मंडळी माउस कधी वापरतच नाही का? बॅग भरत असताना एकदाचे कपडे कपाटातून काढून कॉट वर ठेऊन मग बॅगेत का ठेवत नाहीत? एकेक चक्कर मारत एकेक कपडा का ठेवतात? 

प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नाही, मग tv बंद करून समोरच्या भिंतीकडे एकटक बघत राहणं मला जास्त सुखद वाटलं. 

जाऊद्या.. आपल्याला काय 🙄🙄🙄

2 thoughts on “मालिका..आणि मला पडलेले प्रश्न 🤔🤔🤔”

Leave a Comment