मालती

 छकुली लहान होती, मोठया भावाच्या लग्नाची तिला भारी हौस. दादा मला एक वहिनी आन गाणं गुणगुणायला तिला फार आवडे. अखेर सुयश साठी एक स्थळ बघितलं आणि दादा चं लग्न ठरलं. छकुली जाम खुश झाली, लग्नात नवीन कपडे, नवीन कानातले, बांगड्या मिळणार होत्या तिला. निरागस मन ते… तिला काय कळणार, घरी वहिनी आणायची म्हणजे मोठ्यांच्या डोक्यात काय किडे वळवळणार.

सुयशचं घर म्हणजे अगदी जुनाट विचारांचा पगडा असलेलं. कौटुंबिक कलहात मोठं झालेलं. घरात कधीही शांतता नांदली नाही, कारण सुयश च्या आईचा कुरकुर करण्याचा स्वभाव. सतत दुसऱ्यावर शंका घेणं आणि दुसऱ्याला दोष देणं यापलीकडे तिला काहीही येत नसे. एक छकुली तेवढी होती जिच्यामुळे घरात जरा आनंदी वातावरण असे. आईची ती अत्यंत लाडाची. सुयश आणि तिच्यात वयाचं बरंच अंतर होतं.

सुयश चं लग्न ठरलं आणि आईची कुरकुर सुरु झाली..मुद्दाम एका खेडेगावातली गरीब मुलगी पाहिली..

“सुयश, मुलगी कायम अशी आणावी जी आपल्यापुढे मान खाली घालून गपगुमान सगळं ऐकेल..नाहीतर डोक्यावर चढतात मुली…आणि अश्या मुलींना काही झालं तरी त्यांच्या माहेरचे लोकं समाजाच्या भीतीने कायम मुलीच्या संसारासाठी आपल्यापुढे गुलाम बनून राहतात…”

सुयश वर असेच संस्कार झालेले..

बायकोला कायम गुलामीत ठेवायचं, सतत तिला त्रास द्यायचा, वाईट साईट बोलत राहायचं, डोक्यावर बसू नाही द्यायचं.. वेळप्रसंगी हात उचलायलाही मागेपूढे पाहायचं नाही.

देण्याघेण्यावरून आईची कुरकुर सुरू झाली ती गृहप्रवेश होईपर्यंत तिचं तोंड काही गप नव्हतं.. मालतीच्या आई वडिलांनाही मुलीला उजवायचं होतं, मग मुलाकडचे जे म्हणतील तसं त्यांनी कर्ज काढून काढून सगळं केलं आणि स्वतःची सुटका करून घेतली…

मालती छकुलीला जीव लावायची, कारण ती एकच अशी या घरात होती जी वहिनीला माणूस म्हणून बघत असे, नाहीतर दिवसभर सासूची कुरकुर आणि सुयशचे बोल ऐकून मालती पिचून गेलेली..

एकदा असंच सुयश च्या आईने स्वयंपाकावरून मालती ला बोल सुनावले, मालतीला असह्य झालं..तिने सुयश जवळ मन मोकळं केलं पण त्याने तिच्यावर हात उगारला..छकुलीला रडू यायचं वहिनीची अवस्था पाहून, पण घरातल्या वातावरणाला पाहून ती घाबरून जायची..

मालती वैतागून आपल्या माहेरी गेली, माहेरच्या लोकांनी “कशाला ही परत आली” म्हणून डोक्याला हात लावला..तिलाच बोल लावून नांदायला परत पाठवून दिलं…

मालती आता जिवंतपणी मरण अनुभवत होती..जाणार तरी कुठे?? तिच्या माहेरची लोकं सुयशला पाठीशी घालत असल्याने त्याला अजून चेव चढलेला..काही झालं की तो त्यांनाच बोले, म्हणजे ती लोकं मालतीला अजून घालूनपडून बोलतील…

वर्ष सरली, काहीही बदललं नाही, छकुली मात्र आता लग्नाची झाली. तिच्या लग्नाचा विचार करून आईला झोप लागायची नाही, जीवापाड जपलेली आपला जीव की प्राण आपल्याला आता सोडून जाणार म्हणून आईचा जीव वरखाली होई. आईचं वय झालेलं, आजारपण मागे लागलं, नेहमी कुरकुर करणारा स्वभाव आता शांत झालेला, कारण कितीही वाटलं तरी आवाज करायची ताकद नव्हती आता.

“सुयश आता छकुली साठी चांगलं स्थळ बघ रे बाबा..”

“जे स्थळ आलं तिथे लग्न करून टाकू, किती दिवस ठेवणार तिला..”

“अरे असं कसं बोलतो तू, चांगलं स्थळ बघूनच करू..”

“मुलगी उजवनं महत्वाचं… चल मी झोपतो..”

स्थळ बघून छकुलीचं लग्न झालं, मुलाकडची जरा हेकेखोर वाटत होती, पण आईत आता ताकद नव्हती हस्तक्षेप करायची…सगळं सुयशच्या हातात होतं..

काही महिन्यांनी छकुली दारात आली, हातात बॅग होती..अंगावर जखमा, डोक्याला मार, त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं… आपल्या लाडक्या लेकीचे असे हाल बघून आईने एकच हंबरडा फोडला..

“आता काहीही झालं तरी मी तुला तिकडे पाठवणार नाही..”

“माहेरी आलेल्या मुलीला काय किंमत असते?? लोकं विचारतील, नातेवाईक विचारतील…छकुली, तुला परत जावं लागेल..ती लोकं जशी असतील तशी..सहन कर..बाईच्या जातीने मर्यादेत राहावं..मान खाली घालून ऐकून घ्यायचं..”

आईच्या काळजात धस्स झालं, तिच्या हातात आता काहीही नव्हतं… मुलगा जे सांगेल ते करणं तिला भह होतं…

निसर्गाचा नियम आहे, आपण जे करू ते फिरून आपल्यापर्यंत येणारच… मुलाला मालती विषयी जे जे सांगितलं, मालती वर जो अत्याचार केला गेला तोच आता आईच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत घडला…आईला जाणीव झाली, कदाचित मुलाचे त्याच्या बायकोबद्दल कान भरले नसते..मालतीला चांगली वागणूक दिली असती तर… आज ही वेळ आली नसती…

1 thought on “मालती”

  1. बरोबर आहे. सर्वांना समान वागणूक द्यायला काय प्रॉब्लेम असतो ह्या लोकांना.

    Reply

Leave a Comment