मालकी हक्क

 वडील मुलीच्या घरी पाहुण्यासारखे बसले होते. मुलगी चहा पाणी आणून देत होती आणि वडील मुलीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होते.सर्वजण कपिलची यायचीच वाट बघत होते. मुलीचं भरलं घर, घरातली श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती बघून वडील मनोमन खुश होत होते. लेकीचा निर्णय काही चुकला नाही, हट्ट करून कपिल सोबतच लग्न करेन असं म्हणत होती. भरपूर विरोध झाला, रडारड, गोंधळ..अखेर मुलीच्या मनासारखं केलं आणि जबाबदारी सम्पली.

वडिलांना जास्त वेळ बसणं योग्य वाटत नव्हतं, पण नाईलाज होता. कपिल कडे मुलीला माहेरी न्यायची परवानगी मागायची होती. सासू सासऱ्यांचे काही म्हणणे नव्हते पण कपिलला विचारल्या शिवाय नेणं योग्य वाटत नव्हतं.

शेवटी कपिल आला आणि सासरेबुवांना बघून त्याला आनंद झाला. बऱ्याच गप्पा झाल्यानंतर वडिलांनी डोळ्यात आर्जव आणून विचारलं..

“जावईबापू, मीनाक्षीला काही दिवस नेऊ का माहेरी? घरी सर्वांना फार आठवण येतेय तिची..”

“अहो बाबा त्यात विचारताय काय..न्या की..”

वडिलांना आनंद झाला. जावाईबापू परवानगी देतील की नाही याचीच त्यांना भीती होती. कारण सासरी सर्वकाही मीनाक्षी बघत होती, आणि ती गेल्यावर सासरी सर्वांची आबाळ होईल म्हणून कपिल तिला पाठवणार नाही अशी त्यांना शंका होती. पण कपिलने होकार दिला अन त्यांना बरं वाटलं.

मीनाक्षीने आनंदून पटकन बॅग भरली, सासू सासऱ्यांचा आशिर्वाद घेतला आणि वडिलांपाठोपाठ निघाली.कपिलही त्यांना सोडायला मागोमाग गेला. जात असताना त्याला सारखं हसू यायचं..वडिलांनी न राहवून विचारलं..

“का हसताय?”

“काही नाही, चार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. लग्नापूर्वी मी मिनाक्षीला फिरायला घेऊन जाण्यासाठी परवानगी मागायचो तेव्हा किती आढेवेढे घ्यायचे तुम्ही..मी ताटकळत बसायचो, किती विनवण्या करायचो तेव्हा तयार व्हायचे तुम्ही..आणि आता परवानगी मागताय.”

वडिलांनाही हसू आवरलं नाही..

“त्याचा बदला घेतला नाही ते एक बरं केलं..काळ कसा बदलतो ना…कालपर्यंत तुम्ही मीनाक्षीसाठी आर्जव करत होतात आणि आज मी करतोय..”

“खरंच.. वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं.. स्त्रीवर दाखवला जाणारा मालकी हक्क… .दोन दिवसाचे सोहळे आणि काही तासांचे धार्मिक विधी स्त्रीचा मालकी हक्कच बदलून देतात…बाबा, यापुढे  तुमच्याच मुलीला नेताना परवानगी मागू नका..”

गाडीतून परतत असतांना एका निर्णयाने लेकीच्या आयुष्याचं झालेलं सोनं एक बाप वळून वळून बघत होता…

Leave a Comment