मांडणी

 अत्यंत साध्या आणि टिपिकल राहण्याऱ्या आणि सर्वात कमी शिक्षण असणाऱ्या शीतलला बढती कशी मिळाली हेच ऑफिसमध्ये कुणाला कळत नव्हतं. वरच्या पोस्टवर जाण्यासाठी बऱ्याच मंडळींची रांग लागलेली, प्रचंड चढाओढ त्या पदासाठी चालू होती, ऑफिसमध्ये महिनाभर चर्चा सुरू होती, काहींनी तर पैजही लावली होती. शीतल कडे कुणी पाहातही नव्हतं, ती बिचारी एका कोपऱ्यात बसुन शांततेत तिचं काम करी. ती तरी काय करणार दुसरं, ती जॉब एन्जॉय करायला आलीच नव्हती.. तिच्या कुटुंबाला हातभार लावायला ती काम करत होती.

छोट्याश्या गावात वाढलेल्या शीतलचं शिक्षण जेमतेम झालं होतं. नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असा विचारही मनाला शिवला नव्हता..लग्न करून संसार नीट चालवायचा हेच फक्त डोक्यात. त्यामुळे घरात आणि विशेषतः स्वयंपाकघरात तिने दिवसातला अर्धाअधिक वेळ घालवला होता. वस्तूंची नीट मांडणी, पटकन एखादी वस्तू सापडेल असं व्यवस्थापन, कुठली गोष्ट संपत आलीय, कुठली गोष्ट खराब होत चाललीय याचा सगळा अचूक हिशोब डोक्यात. लग्न करून ती दुसऱ्या गावात गेली, पण नवऱ्याची नोकरी या lockdown मध्ये गेली ती गेलीच.  काम मिळेना, गावातल्या कुणीतरी सुचवलं की मुंबईत जाऊन काम बघा. नवऱ्याचं शिक्षणही बऱ्यापैकी होतं, एका ठिकाणी त्याला डेस्क जॉब मिळाला आणि नोकरीचा प्रश्न सुटला. पगार तोडकाच, घरखर्च पुरेना..मग त्यानेच पुढाकार घेऊन बायकोला नोकरिबद्दल विचारलं, गावातही कधी बाहेर न फिरणारी शीतल नोकरीच्या प्रश्नाला घाबरली. बाहेरच्या जगात वावरायला ती खूप घाबरत होती. नवऱ्याने कसंबसं तिला तयार केलं, तिनेही संसार सुरळीत होण्यासाठी तेवढी हिम्मत उसनी आणली. चाळीतच एका ओळखीतल्या मुलीकडून शीतलला कॉम्प्युटर लॅपटॉप कसा वापरायचा हे शिकून घेतलं. शीतलला जरा हिम्मत आली. 

गावी ती आणि तिची आई ज्या शेतकऱ्याकडे मजुरीला जायचे त्याच्याच मुलाची एक कंपनी इथे आहे असं त्यांना समजलं, मग एक शब्द टाकुन पाहिला..शीतलचा interview झाला, त्यात ती जेमतेमच बोलली, पण तिच्या आईच्या मानाखातर 6 महिन्याची नोकरी तिला कबूल झाली, या सहा महिन्यात काम चांगलं असेल तर कायम करण्यात येणार होतं, त्यामुळे शीतलला कामात तसूभरही चूक चालणार नव्हती. 

कंपनीला आलेले मेल्स सोर्ट करायचे, चौकशी साठी आलेले फोन घ्यायचे, कुरियर मधून आलेले लेटर्स चेक करायचे हे काम शीतल कडे होतं.

एकेदिवशी बॉसला अचानक एक मेल आला..

“अभिनंदन.. उत्कृष्ट ग्राहक सेवेबद्दल आपल्या कंपनीला या वर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे..”

बॉसला खूप आनंद झाला, एरवी ताटकळत असणारे ग्राहक आणि मेल ला उत्तर देत नाही म्हणून शिव्या घालणारे कलाइन्ट्स यांनी चक्क कंपनीच्या नावाची शिफारस केली? बॉस आनंदाची बातमी द्यायला बाहेर आले, सर्वजण कॅन्टीनमध्ये गेले होते. शीतलचा लॅपटॉप सुरूच होता, कसलं तरी dowanlod सूरु होतं. बॉस ने सहज तिचा लॅपटॉप चेक केला.. डेस्कटॉप वर पद्धतशीर काही फोल्डर्स बनवली होती. फोल्डर ला तारखांची नावं होती. 1मार्च ते 8 मार्च..8 मार्च ते 16 मार्च..बॉस ने ते फोल्डर उघडले, त्यात अजून 2 फोल्डर्स होती..कस्टमर enquiry,  clients enquiry. त्यात अजून एकेक फोल्डर, answered queries, unanswered queries, queries about to expire. दुसऱ्या काही फोल्डर्स मध्ये कुरियर मधून आलेल्या लेटर्स ची scanned print होती, आणि तिसऱ्या फोल्डर मध्ये आलेल्या कॉल्स चे डिटेल्स होते. 

शितलने कंपनीला येत असणाऱ्या queries चं उत्तम व्यवस्थापन केलं होतं. ज्या मेल्स ला उत्तर देत नसायचो त्यासाठी शीतल वारंवार येऊन आठवण करून द्यायची हेही बॉस ला लक्षात आलं.  शीतल आल्यापासून सर्व ग्राहकांचे आणि कलाइन्ट्स चे प्रश्न ताबडतोब सुटत होते, आणि हे सगळं शीतलच्या उत्कृष्ट व्यवस्थापन मुळे झालं होतं हे बॉस च्या नजरेतून सुटलं नाही. 

शीतलच्या बढती मिळाली, पगारही वाढला. संसार सुखाचा होऊ लागला. ऑफिसमध्ये तिची टिंगल करणारे आता तिला मान देऊ लागले, शीतलनेही स्वतःमध्ये काही बदल केले, राहणीमान सुधारलं.. आत्मविश्वास कमावला..

एके दिवशी बॉस सहज तिच्या घरी आले, हॉल मधूनच स्वयंपाकघर दिसत होतं,बॉस चं सगळं लक्ष तिथेच..तो काहीतरी न्याहाळत होता. नवरा म्हणाला..

“साहेब, छोटच घर आहे आमचं..”

“घराचं नाही, स्वयंपाक घरातली मांडणी बघतोय, लॅपटॉप मध्ये एकात एक असलेल्या फोल्डर्सच्या सुयोग्य मांडणीची प्रेरणा जिथून मिळाली तेच न्याहाळतोय..”

1 thought on “मांडणी”

Leave a Comment