मस्ती की पाठशाला – भाग 6

 विद्या मॅडम कुठल्या काळजीत आहेत हे ती मुलं शोधण्याचा प्रयत्न करतात..

“नकुल…तू मॅम ला फोन आला की पटकन मागे जा आणि गपचूप ऐक…”

नकुल सांगितल्याप्रमाणे जातो आणि ऐकतो..

“एक किलो भेंडी आणि कोथिंबीर जुडी? अजून काही? बघेल…जमलं तर आणते येताना..”

नकुल ते ऐकून परत येतो..

“मॅडम कडे पैसे नाहीत, म्हणून काळजीत आहे..”

“कसेकाय? काय बोलल्या मॅडम??”

“त्यांना भेंडी आणि कोथिंबीर आणायला सांगितली होती..त्या म्हणाल्या की जमलं तर आणते, याचा अर्थ त्यांच्याकडे पैसे नाहीत..”

“असं आहे तर..चला रे, सर्वांनी कॉन्ट्री काढा…ब्रेक मध्ये तेवढं घेऊन येऊ आपण..”

मुलं ते काम करतात…आणि कॉलेज सुटल्यावर मॅम ला द्यायचं ठरवतात…

विद्या चा तास सम्पतो…तो शेवटचा तास असतो..मॅम चा मूड आजही नसतो..मॅम नेमका वर्गात टेबल वर फोन विसरतात…आणि निघून जातात..

“ए शंतनू…हे बघ…चल मॅम ला देऊन येऊ..”

इतक्यात तिच्या फोनवर एक कॉल येतो..

मुलं एकमेकांकडे पाहतात…

“ए काय करायचं? उचलायचा??”

“ए असं दुसऱ्याचा फोन उचलायचा नसतो ..”

“अरे उचल…आपल्याला कळेल ना अजून काय प्रॉब्लेम आहे मॅम ला..”

हो नाही करत मुलं फोन उचलतात…सर्व वर्ग थांबलेला असतो….शंतनू फोन स्पीकर वर टाकतो…

“विद्या…निघालीस की नाही अजून? अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज…मुलगा श्रीमंत आहे, शिकलेला नाही म्हणून काय झालं? पैसा तर आहे ना? आणि राजीनामा दिलास का कॉलेज वर?..बरं मला सामान आणायचं आहे मी ठेवतो फोन..आशिष आणि पाटील मंडळी येतीलच आता”

असं म्हणत फोन कट होतो…

“अच्छा…असं आहे तर …”.

“कुठेय तो शंतनु?? धरा रे त्याला.. भेंडी अन कोथिंबीर म्हणे…”

“ते जाऊदे… यात आपण काय करायचं? तो मुलगा शिकलेला नाही आणि मॅम ला नोकरी करू देणार नाही…म्हणून कदाचित मॅम ला लग्न करायचं नसेल त्याच्याशी….”

“मलाही तेच वाटतंय…”

“आपण काय करायचं??”

“तो मुलगा कोण आहे ते शोधू..”

“कसा शोधणार?”

“एक मिनिट, त्यांनी नाव काय सांगितलं?”

“आशिष आणि पाटील मंडळी…म्हणजे मुलाचं नाव आशिष पाटील..”

“फेसबुकवर शोधा…”

“फेसबुक वर कितीतरी आशिष पाटील आहेत..”

“आयडिया.. मॅम कॉलेजच्या लायब्ररी मध्ये इंटरनेट वापरतात…त्या तिथूनच फेसबुक चालू करतात…आपण त्याच्या ब्राऊजर च्या हिस्टरी मध्ये ते नाव शोधू..”

“चला..”

सर्वजण लायब्ररी मध्ये जातात…

लायब्ररीयन इतक्या सगळ्या मुलांना आत जाताना पाहतो अन ओरडतो..

“ए..ए ..ए…कुठे? कॉलेज सुटलं आता..”

आकाश म्हणाला…

“सर..आम्हाला सर्वांना एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे…लायब्ररीतली सर्व पुस्तकं चाळली पण उत्तरच सापडेना….अखेर आम्ही इंटरनेट वर शोधायचं ठरवलं…सर प्लिज नाही म्हणू नका…उत्तर सापडलं नाही तर आम्हाला रात्री झोप येणार नाही हो…”

लायब्ररीयन खाली पडायचाच बाकी असतो..त्याच्या डोळ्यात पाणी येतं…

“पोरांनो किती ती जिज्ञासा…किती ते प्रेम ज्ञानार्जनाचं… शिका…खूप मोठे व्हा…जा, आज तुमच्यासाठी लायब्ररी चालू ठेवतो हवी तेवढा वेळ…”

पोरं पटापट आत घुसतात…अखेर त्यांना जे हवं होतं ते सापडतं…

तो मुलगा त्यांना फेसबुकवर सापडतो…त्याची प्रोफाइल चेक करतात…टुकार मुलासारखे फोटो टाकलेले असतात…

“ए शी…कसला माणूस आहे…”

“आणि हा आपल्या मॅम सोबत?? अजिबात नाही…”

“एक मिनिट..फोटो बघू…अरे हा तर आमचा शेजारी…”

“काय सांगतेस..”

“होय…एकदम नालायक माणूस आहे..”

“बरं आपण काय करायचं? त्या मुलाला नकार मिळेल असं काहीतरी करायला हवं…मॅम चे वडील ज्या पद्धतीने बोलत होते ते ऐकून वाटलं की ते खूप कडक स्वभावाचे आहेत आणि मॅम चं त्यांच्यापुढे काहीएक चालत नाहीये…म्हणूनच मॅम काळजीत आहेत काही दिवसांपासून…”

“आता घरी जाऊ, विचार करू…आणि उद्या बघू काय करायचं ते..”

जातांना लायब्ररीयन विचारतो..

“का रे पोरांनो…सापडलं का उत्तर??”

“हो सर…तुमच्यामुळे… तुमचे उपकार आम्ही कसे फेडू सर? आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही…हा पण एक गोष्ट आहे…शंतनू…त्या पिशव्या आण…”

“हे घ्या सर…गोड मानून घ्या…”

पोरं निघून जातात…लायब्ररीयन ला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं… तो पिशवी उघडून पाहतो तर काय…भेंडी अन कोथिंबीर????

Leave a Comment