मनातली वादळं -2

आईला वाटे लेकीला सोडवून आणावं या जंजाळातून..

पण आईवरही नवऱ्याचा वचक,

लेक माहेरी आली तर तिचा बाप सहन करणार नाही हे आईला माहीत होतं..खंबीर झाली असती तर बापाने हाकलून लावलं असतं..

लेकीला माहेर टिकावं म्हणून आई चार गोष्टी समजावून तिला परत पाठवी..

दोन्ही जावांचे नखरे, दिरांचे टोमणे यात ती दबून गेलेली..

नणंदा हौस पुरवायला सारख्या चकरा मारायच्या..

सासूची जबाबदारी नको म्हणून जावा वेगळ्या निघाल्या, सुटल्या त्या..

पण जयदीपने काही निर्णय घेतला नाही..

आपण बाहेर गेलो तर आईचं कोण करणार?

तसं पाहिलं तर जयदीप जगला किंवा मेला तरी काहीही अडणार नव्हतं, आईचं सगळं करणारी तीच एक होती..

एकदा नणंद बाईचं डोहाळजेवण होतं, सकाळपासून तयारी चालली होती..

ती सकाळी लवकर उठली,

डोकं खूप दुखत होतं तिचं,

तशीच कामाला लागली..

चहा गॅसवर ठेवता ठेवता तिला चक्कर आली आणि ती कोसळली..

घरात गडबड उडाली,

पटकन जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं..

डॉक्टर म्हणाले ऍडमिट करा मोठ्या दवाखान्यात, इथे उपचार होणार नाहीत..

सर्वांची धावपळ उडाली..

हिला काही झालं तर? जयदीपचं आयुष्य उजाड होणार होतं… त्याची सगळंच तिच्यावर भिस्त होती..त्या वेळेस जयदीपची भीतीने गाळण उडाली..

हिला काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं..

ना कधी कसला आजार, ना आजारी पडणं..

मग हे अचानक कसं?

पहिला दिवस असाच गेला..

तिला शुद्ध आली नव्हती,

डॉक्टर म्हणाले सिरीयस कंडिशन आहे,

आपल्याला वाट पाहावी लागेल,

मेंदूची नस तुटली आहे, कधी शुद्ध येईल माहीत नाही..

दुसरा दिवसही तसाच..

जयदीप तहान भूक विसरला होता..बायकोला कधी शुद्ध येईल याचीच वाट बघत होता..

तिची आई गावावरून धावपळ करत आली..

त्यांना पाहून जयदीप म्हणाला,

“मामी हे काय होऊन बसलं?”

तिची आई काही बोलली नाही, तडक लेकीला पाहायला गेली..

डोळे भरून तिला पाहिलं..

तिसऱ्या दिवशी निरोप आला..

नातेवाईकांना बोलावून घ्या, पेशंटला वाचवू शकलो नाही..

सगळे तिथेच उभे राहिले..जयदीप बोलू लागला..

*****

भाग 3

मनातली वादळं -3 अंतिम

1 thought on “मनातली वादळं -2”

Leave a Comment