भातुकली-3

“अहो पण मला सगळं शिकावं लागत होतं, तिला सगळं शिकवणारं मिळालं होतं ना?”

“तोच एक मोठा फरक आहे, अनुभवातून आलेलं ज्ञान हे शिकवून सांगितलेल्या ज्ञानापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असतं.. ती चुकली असती, अडखळली असती पण शिकलीच असती शेवटी. तिच्या अधिकाराच्या जागेत आनंदी राहिली असती. आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, काहींना स्वैपाक करून ओटा आवरायला आवडतो तर काहींना स्वैपाकाच्या आधीच आवरलेला लागतो..काहींना काचेच्या बरण्या आवडतात तर काहींना धातूच्या..यात तू तिची आवड कधी जपलीच नाहीस..मग मला सांग, जिच्याकडे निर्णयाचा काही अधिकारच नाही ती तरी किती दिवस दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आनंदी राहील? असं दुसऱ्याने सांगितलेली कामं करण्यात कुणाला धन्यता वाटते? मी नोकरी करायचो, वाटायचं सोडून द्यावी..नको कुणाची गुलामी. पण तुझा व्यवसाय बघून हेवा वाटायचा मला, तू एकटीच मालक होतीस..मी नोकरी सोडली अन सुटलो, पण सूनबाईची सुटका कधी?”

सासूबाईंना एकेक गोष्टी आठवू लागल्या, समजू लागल्या,

सूनबाईचं स्वैपाकघरात तोंड पाडून काम करणं,

वस्तू जागेवर ठेवण्यात स्वारस्य नसणं,

नवीन पदार्थ बनवायची ईच्छा नसणं,

कामाचं ओझं वाटणं,

सगळ्याचं कारण समजलं,

तेवढ्यात नात म्हणाली,

“आजी हे घे, तुझ्यासाठी भाकर आणि भाजी”

एका छोट्या डिशमध्ये मातीचा चपटा गोळा आणि दोन तीन हिरवी पानं तिने वाढलेली,

पण स्वतःच्या हट्टाने केलेला स्वैपाक करतांना आणि वाढतांना तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसत होतं,

सासूबाईंनी दुसऱ्या दिवशी सूनबाईला बोलावलं,

“सुनबाई, आजपासून किचन तुझ्या ताब्यात, मी थकले आता..तुला हवं तसं ठेव आणि हवे ते पदार्थ कर..मी लुडबुड करणार नाही..”

सूनबाईला कळेना, हे बोलणं मनापासून होतं की टोमणा होता?

सासूबाईंना तिचे भाव लक्षात आले,

“अशी काय बघतेस? सासू म्हातारी झाली तुझी, किती दिवस सांभाळणार सगळं?”

सूनबाईच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खळखळून हसू दिसून आलं, घरात एक वेगळीच रोषणाई त्याक्षणी भासली,

सूनबाईने सगळी सूत्र हातात घेतली, त्या दिवसापासून ती खूप उत्साही दिसू लागली, आनंदी दिसू लागली..सासुबाई फक्त वाळवण बघायच्या, तिने तेही शिकून घेतलं..

एके दिवशी सासुबाई आजारी पडल्या, उठता येईना..

नागलीच्या पापडांचं पीठ आणून ठेवलेलं, आज ते काम करून उद्या ऑर्डर पोचती करायची होती, सासूबाईंना चिंता वाटू लागली,

सूनबाईने पदर खोचला, मी करते म्हणाली,

“बिघडलं तर एवढ्या दिवसांचं नाव खराब होईल, एक तर ऑर्डर मोठी आहे..”

सूनबाईने ते शिवधनुष्य पेललं, ऑर्डर पोचती झाली..

तिसऱ्या दिवशी ते ग्राहक दारात आले,

सासुबाई घाबरल्या,

पापडांची तक्रार तर घेऊन नाही ना आले?

“अजून पाच किलो मिळतील का? यावेळीच्या पापडांची चवच वेगळी आहे, नेहमीपेक्षा छान..”

ते असं म्हणाले अन सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं,

बाईच्या जातीला नुसता तो एक हक्काचा अधिकार मिळाला अन सगळं गणितच बदललं..त्यांनी सासऱ्यांचे मनोमन आभार मानले.

****

स्वैपाकघर एक उदाहरण झालं,

जर तिच्याकडून कुठलाही अधिकार हिरावला नाही,

तर तिला कुठल्याही कर्तव्याची जाणीव करून द्यायची गरज पडणार नाही..

समाप्त

25 thoughts on “भातुकली-3”

  1. Well said….असं वाटत होत की तुम्ही माझ्याच घरातील मुद्दा कसा बरोबर मांडला…. तस अजून माझ्या सासूला सांगण्यासारखे नाहीत सासरे…,,देऊ का हिच कथा वाचायला???😂🤣😛😛 (कस सुचतं हो संजना मॅम असं दुसऱ्याच्या मनात शिरून त्याच्या भावना मांडायला)))..thnks..

    Reply
  2. कथा छान आहे आवडली प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात जे घडत असत नेमके तेच मांडण्याचा प्रयत्न खूप छान होता

    Reply
  3. स्वैपाकघर एक उदाहरण झालं,
    जर तिच्याकडून कुठलाही अधिकार हिरावला नाही,
    तर तिला कुठल्याही कर्तव्याची जाणीव करून द्यायची गरज पडणार नाही…..हे वाक्य खरं आहे.

    Reply

Leave a Comment