भाजीतला केस..!!!

 “नवस फेडायला जातेय कोल्हापूरला, दोन दिवस अरविंदकडे राहून येते म्हटलं…3 वर्षांपासून ते इकडे आले नाहीत आणि आपणही गेलो नाही..”

“कसं जाणार आपण तरी, lockdown मुळे सगळेच अडकले, त्यात आपल्या मुलीचं बाळंतपण… आता जातेय ना, चांगली आठ दिवस राहून ये..”

“नको बुवा, सूनबाईला आवडतं नाही आवडत काय सांगता येतं..”

“प्रेमळ आहे गं ती, का नाही म्हणेल तुला?”

“नुसतं प्रेमळ असून चालतं का? फोन करावा तेव्हा कायम हॉस्पिटलमध्ये.. आज सर्दी, उद्या ताप, आज हे दुखतंय उद्या ते दुखतंय… काय या आजकालच्या मुली, थोडा भार अंगावर आला की यांचं लागलं लगेच दुखायला..बरं मी बोलत काय बसले, चला निघुया, मला स्टॉप पर्यंत सोडा लवकर..”

विमलबाईंनी आपल्या मुलीचं बाळंतपण सुखरूप व्हावं म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नवस केला होता, खूप वर्षांनी अथक प्रयत्नाने मुलीची कूस उजवली होती..जवळच त्यांचा मोठा मुलगा अरविंद एका फ्लॅट मध्ये रहात होता. दोन्ही कामं होतील म्हणून त्या अरविंदकडे आधी गेल्या.

सासूबाईंना दारात बघताच अनघा खुश झाली, तब्बल तीन वर्षांनी त्या घरी आल्या होत्या..आल्या आल्या त्यांनी घराकडे नजर फिरवली, बरंच अस्ताव्यस्त होतं.. सूनबाईचा अवतारसुध्दा विचित्रच होता..फॅशनच्या नावाखाली केसांचा अजबच केशसंभार बनवला होता..नाक मुरडत त्या आत गेल्या. जुजबी गप्पा झाल्या, सासूबाईंनी बोलता बोलता मध्ये बरेच टोमणे ऐकवले पण अनघाने दुर्लक्ष केलं.

संध्याकाळी अरविंद आला, आल्या आल्या आईला न भेटता अनघाकडे गेला आणि तिच्या हातात औषध टेकवली, संध्याकाळी चेकपला जायचं आहे परत असं सांगितलं आणि नंतर आईजवळ येऊन बसला.. आईच्या पोटात खड्डा पडला, काय अवस्था केलीये आपल्या मुलाची म्हणून सुनेवर त्यांनी डूख धरला..

संध्याकाळी सासूबाई अंघोळीला गेल्या, मनसोक्त अंघोळ केली, केस धुतले आणि मोकळे केस घेऊन घरभर हिंडु लागल्या..किचनमध्ये येऊन चार वस्तूंना हात लावत, कणकेत बोट दाबून पाहत, भाजीपाला उचकून पाहत… अनघा काही बोलायची नाही..

अनघाने सर्वांना जेवायला वाढलं..अरविंद बाहेरून काहीतरी आणू म्हणाला होता तेव्हा आई त्याच्यावर खेकसली, एका पाहुण्याचं जेवण बनवायला सुद्धा जड जातं तुम्हाला? असं म्हणत बळजबरीने अनघाला स्वयंपाक करायला लावला..ती करत असताना अरविंद सारखा आत जाऊन तिला मदत करे त्यामुळे सुनेबद्दल अजूनच चीड येऊ लागली..

अनघाने सर्वांना जेवायला वाढलं, वरणभात, उसळ, बटाटा भाजी, पापड, कोशिंबीर.. सगळं साग्रसंगीत केलं होतं. सासूबाई जेवणात रमल्या, बाकी काही असो, सूनबाई स्वयंपाक छान करते असं मनातल्या मनात म्हणू लागल्या..

एवढ्यात तोंडात घास चावताना विचित्र वाटू लागलं आणि पटकन बाजूला जाऊन त्यांनी घासातून तोंडात गेलेला केस बाहेर काढला..उरलासुरला सर्व राग बाहेर पडला…

“काय हे सूनबाई? जेवणात केस? जरा बघून स्वयंपाक करत जा ना…मी होते म्हणून ठीक होतं, कुणी बाहेरचा पाहुणा असता तर काय वाटलं असतं त्याला? केस बांधले नव्हते का स्वयंपाक करतांना? माझंच चुकलं…तुला माझ्याकडेच ठेऊन घ्यायला हवं होतं.. माझ्या हाताखाली असतीस तर चार गोष्टी शिकली असतीस…घे हे जेवण, नकोय मला..”

असं म्हणत सासूबाई रागारागाने ताट सोडून उठल्या आणि हात धुवून खोलीत गेल्या. अरविंद खूप चिडला, तो आईला बोलायला जाणार तोच अनघाने त्याला थांबवलं..अनघा स्वतः खोलीत गेली..

“सासूबाई..”

“मी काही जेवणार नाहीये..मला नको उठवू..”

सासूबाई रागारागाने तिच्याकडे बघत होत्या, अनघाने हळूच डोक्यावरचा विग काढला…सासूबाई एकदम उठून उभ्या राहिल्या..

“हे काय, टक्कल केलंय तू?? ही कसली फॅशन?”

अरविंद मागून आला आणि म्हणाला..

“फॅशन नाहीये आई ही, कॅन्सरचं निदान झालंय तिला 3 वर्षांपासून… ट्रीटमेंट सुरू आहे तिची..”

सासूबाई एकदम खजील झाल्या..काय बोलावं त्यांना कळेना..

“कॅन्सर? कधी? मला का नाही सांगितलं?”

“अनघाने मला ताकीद दिलेली की आपल्या अडचणीची झळ आपल्या घरच्यांना नको म्हणून.. अत्यंत कठीण आणि त्रासदायक परिस्थितीतुन ती जातेय.. तिच्या डोक्यावर एक केस नाहीये, तरी तू तिला बोलतेय की तिचेच केस अन्नात गेले म्हणून? अगं तूच केस मोकळे सोडून घरभर फिरतेय..”

“अरविंद त्यांची काही चूक नाहीये, आई..काळजी करू नका..या ट्रीटमेंट नंतर मी पूर्ण बरी होईल..हा कॅन्सर जीवघेण्या प्रकारातला नाहीये..आणि हो, एकदा मी बरी झाले की सगळं घर अगदी छान ठेवेन, अगदी तुम्हाला हवं तसं..”

सासूबाईंना स्वतःच्या वागण्यावर राग येऊ लागला..आपला मुलगा आणि सून कोणत्या दिव्यातून जात होते आणि आपण मात्र…

दुसऱ्या दिवशी सासूबाई नवस फेडायला गेल्या, पण जाताना दोन ओट्या घेतल्या..

“आई, या दोन ओट्या कशासाठी?”

“मुलीचा नवस फेडण्यासाठी आणि तू लवकर बरी व्हावी म्हणून दुसरा नवस करण्यासाठी..”

अनघाच्याही डोळ्यात पाणी तरळलं…सासूबाईंचा नवस फळाला येवो म्हणून तिने डोळे मिटून हात जोडले..

★★★★★★

अश्याच उत्तमोत्तम कथा, कविता, रेसिपी, आरोग्यविषयक तसेच लहान मुलांसाठी उत्कृष्ट साहित्य असलेले मासिक ईरा दिवाळी अंक 2021…आजच बुक करा, अंक घरपोच पाठवण्यात येईल…खालील फॉर्म भरून आपण अंक मागवू शकता

https://forms.gle/ka3vMa5Mv17KryvW9

Leave a Comment