भाकित (भाग 6) ©संजना इंगळे

इशानीच्या घरी सर्वजण गेले, छोट्या अविरला अनघाकडे सोपवलं तशी ती त्याला घेऊन बाहेर गेली. ईशानी ने एकच हंबरडा फोडला. अचानक वडिलांच्या अश्या जाण्याने ती पुरती कोसळली होती. सारंग तिला सावरत होता. सगळे सोपस्कार होईपर्यंत सारंगला तिथे राहणं भाग होतं.

काही वेळाने अनघाने सारंगला एकट्यात गाठून ईशानी अन सारंगमध्ये चालू असलेल्या वादाबद्दल कुणालाही न सांगण्याचा सल्ला दिला. अश्या प्रसंगी मौन राखणंच योग्य होतं.

वडिलांचं दहावं केलं, सारंग आता पुन्हा घरी परतणार होता. तो तयारी करत असतानाच आबासाहेबांच्या ऑफिसमधील काही लोकं आणि वकील सारंगला भेटायला आले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सारंगला धक्काच बसला, आबासाहेबांनी त्यांच्या नंतर 50 टक्के प्रॉपर्टी ईशानीच्या अन सारंगच्या नावे केलेली. पण दोघे एकत्र असले तरच ही प्रॉपर्टी दोघांना मिळणार होती. सारंगला प्रॉपर्टी मध्ये काहीही आवड नव्हती, पण आबासाहेबांनी कदाचित आमच्यात असलेला वाद हेरला असावा आणि म्हणूनच कदाचित हा निर्णय…वकिलांनी आबासाहेबांची एक डायरीही सारंगच्या स्वाधीन केली.

सारंग सर्वांचा निरोप घेऊन त्याच्या फ्लॅटवर परतला अन कामाला पुन्हा सुरवात केली. त्याच्या अनुपस्थित बऱ्यापैकी काम झालं होतं. मंगेश आणि नरेंद्र एका स्क्रीनकडे एकटक बघत होते, त्यांना पाहून सारंग म्हणाला….

“काय दिसतंय??”

“अरे सारंग, अल्गोरिथम काम करायला लागलाय आता..आपण टाकलेल्या डायऱ्यातील माहिती याने वाचली, अभ्यासली आणि काही भाकितं या स्क्रीनवर दिसू लागलीय..”

“कुठली भाकितं??”

“काही माणसांनी लिहिलेली दिनचर्या आणि त्यांचं निधन..या सगळ्यात या सॉफ्टवेअर ने ताळमेळ बसवला.. कुणी काय खाल्लं, काय केलं याचा अभ्यास करून पूर्वी अश्याच दिनचर्येची जी माणसं ज्या विशिष्ट दिवशी मरण पावली आहेत त्यावरून आता टाकत असलेल्या माहितीवर तो मरणाची तारीखही डिक्लेयर करतोय..”

सारंग ते नीट बघतो, त्याच्या लक्षात येतं. ज्यांना लहानपणापासून पौष्टिक आहार मिळाला, ज्यांच्या नियमित व्यायाम होत गेला ते जास्त जगले होते. विठ्ठल नामक एका माणसाच्या घरी खानावळ असल्याने रोजच त्याचं तेलकट खाणं होई, पुढे त्याला बैठे काम मिळालं, त्याच्या डायरीवरून तो आळशी असल्याचं समजलं..या सर्वांमुळे हृदयविकाराने तो लवकर गेला..आणि याच माहितीच्या आधारे अजून अशी माणसं असतील तर त्यांची शेवटची तारीखही सॉफ्टवेअर दाखवू लागलेलं…

सारंगने ताबडतोब डेटा एन्ट्री च्या मुलाला आज ओव्हरटाईम साठी बसवलं आणि बाबासाहेबांच्या डायरीतील पूर्ण मजकूर भरायला लावला. त्या मुलाने रात्रभर जागून ते काम केलं, सारंगलाही कुठे झोप येत होती..त्या मुलाला घरी पाठवलं आणि सारंग स्क्रीनवर प्रोग्रॅम रन करू लागला..आबासाहेबांच्या दिनचर्येच्या अभ्यासातून सॉफ्टवेअरने त्यांची अंतिम तारीख तंतोतंत सांगितली होती. मंगेश, नरेंद्र, तुषार आणि चेतनला जेव्हा हे सांगितलं गेलं तेव्हा ते आनंदाने वेडे झाले, सॉफ्टवेअर ची पहिली पातळी यशस्वी झालेली..

सारंगला मात्र यावर हसावं की रडावं समजत नव्हतं.. ही डायरी जर लवकर हाती लागली असती तर…कदाचित आबासाहेबांना वाचवता आलं असतं..या सर्व प्रकरणातुन सारंग अन टीमच्या हे लक्षात आलं की माणसाच्या आहार अन दिनचर्येवरून व्यक्तीच्या मृत्यूचं भाकित करणं शक्य होणार होतं.

“सारंग, मला वाटतं हे सॉफ्टवेअर आता आपण डिप्लोय करूयात..मेडिकल फिल्ड्स मध्ये हे खूप महागात विकलं जाईल.. हॉस्पिटल करोडो मध्ये याला विकत घ्यायला बघतील..आपल्याला जबरदस्त नफा होईल..”

“नाही, अजून आपलं काम पूर्ण झालेलं नाहीये..”

“अजून कसलं भाकित बाकीय??”

“माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी का घडल्या..कशामुळे..”

बोलता बोलता सारंग अचानक थांबला..

“बोल ना..पुढे??”

“एक काम करू, हे काम मीच करायला घेतो..थोडं कठीण आहे, तोवर तुम्ही सॉफ्टवेअर डिप्लोयमेंटच्या फॉर्मलिटीज पूर्ण करा..थोड्याच दिवसात आपण मार्केटमध्ये हे लाँच करूयात..”

सारंगच्या मनात वेगळंच गणित सुरू होतं.. माणसाच्या आरोग्याचं भाकित जरी दाखवत असलं तरी कर्मानुसार प्रत्येकाला काय फळ मिळेल याचं भाकित आता तो शोधणार होता..

भाकित (अंतिम)

1 thought on “भाकित (भाग 6) ©संजना इंगळे”

Leave a Comment