भाकित (भाग 3) ©संजना इंगळे

“केशवा..बरं झालं तुझी सोबत झाली बघ..”

“काळजी करू नका साहेब..सगळं व्यवस्थित होईल..”

“तुला कसं कळलं की सगळं अव्यवस्थित आहे ते??”

“साहेब माणसांचे चेहरे ओळखतो मी..नक्कीच काहीतरी घडलंय अन तुम्ही फार उदास आहात..”

“हो रे..कसं सांगू तुला आता..अगदी जीव द्यायचा विचारही मनात आलेला. पण इकडे आलो अन जगण्याची जरा उर्मी आली बघ..”

“असला विचार आणू नका साहेब मनात, जीवन एकदाच मिळतं..आपल्याला जे करायचं असतं ते अगदी आपल्या समोर असतं, पण धक्का दिल्याशिवाय माणूस हलत नाही बघा..”

“हो पण तेही कधी कधी जड होतं रे..”

“आपल्याहून दुःखी माणसं जगात आहेत, ती जगताय की..”

“सगळेच धीट नसतात, माझ्यासारखी कमजोर माणसंही असतात काही..”

“कमजोर अन तुम्ही? साहेब, तुम्ही, मी अन चराचर विश्वाचा बाप जो आहे ना, तो आत बसलाय आपल्या..आपण त्या बापाची पोरं,  कमजोर नाही आपण..”

“बाप? कोणता??”

“नावापुढे लावतो तो आपला जैविक बाप..पण आपल्याही बापाला, त्याच्या बापाला अन सर्वांच्याच बापाला, समग्र सृष्टीला पोसणारा तो बाप..ईश्वर..”

“मी काही देव बिव मानत नाही बुवा..”

“चांगुलपणा मानता ना??”

“हो मग..”

“मग तोच देव..चांगुलपणा, दुसऱ्याकडे बघण्याची भावदृष्टी, तत्व, मूल्य हाच देव. कुणी तो मूर्तीत बघतो कुणी माणसात बघतो..”

“अरे हा कुठला रस्ता आहे? मला मुंबईला जायचं आहे..”

“हा लांब वळणाचा रस्ता आहे साहेब”

“अरे पण शॉर्ट कट रस्ता घ्यायचा की..”

“शॉर्ट कट रस्त्याने लवकर पोहोचू साहेब, पण रस्ता लय वंगाळ, अंधारात कुणिबी रस्त्यात येईल..लाईटपण नाही तिथे..रस्ता लांबचा असला तरी चालंल..पण कुणाला ईजा नको..”

“बरं बाबा.”

“खऱ्याचा रस्ता अवघड वळणाचाच असतो साहेब, किती लोकांना त्यांच्या स्थानी पोहोचवलं आहे मी..अगदी सुखरूप..”

“मॅप मध्ये बघ, ट्रॅफिक कितीय ते..”

“कशाला बघायला हवं, मला माहितीये की..”

“तुला कसं माहिती??”

“अनुभव आहे साहेब..दिव्य दृष्टी लागते याला..कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं? आपल्याकडे असलेली माहिती अन अनुभव यावरूनच पुढचा अंदाज लावता येतो की”

“तू कधी कधी असं बोलतो ना, काही कळत नाही..”

“माझी भाषा समजायला अवघड आहे, पण एकदा समजली की तो कधीच मागे वळून बघत नाही बघा..मागे असंच एकदा पार्थ नावाचा माणूस आलेला…पार अंग टाकून दिलेलं पोराने..त्याला असा दम दिला की “बघतोच आता एकेकाला” म्हणत तावातावात निघून गेला..”

केशव आणि सारंगच्या गप्पा चांगल्याच रंगल्या..अखेर घर आलं अन सारंग उतरला. त्याने केशवला टीप देऊ केली..केशव हसू लागला..

“पत्रं पुष्पम फुलं तोयम..” असा मंत्र म्हणत हसत हसत त्याने ते स्वीकारलं. जाता जाता एवढंच म्हणाला..

“साहेब..स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्याचा अभ्यास करा..”

काहीही न समजता सारंग फक्त स्मितहास्य करत निघून गेला.

घरी येताच दाराशी त्याचे 3-4 मित्र उभे..

“काय रे कुठे होतास? फोनही उचलत नव्हतास.”

“काय झालं? सगळे अचानक इथे??”

“कुलुप उघड..आत जाऊन बोलू..”

आत गेल्यावर सर्वजण बसले..

“मी आत्ता आलोय, जरा फ्रेश होऊन येतो..”

सर्वजण सारंगची वाट बघत हॉल मध्ये बसले.सारंग विचार करत होता, हे अचानक का आले असावेत? काय झालं असेल?

सारंग आवरून त्यांच्यासमोर बसतो.

“बोला…कसं येणं केलंत??”

“कंपनीने आम्हा तिघांना नोकरीवरून काढून टाकलं रे…”

“अचानक??”

“होय..काहीही कारण नसताना कंपनीचा लॉस होतोय हे कारण देऊन आम्हाला quit करायला सांगितलंय..”

“म्हणजे मलाही..”

“नाही..तुला काढणं शक्य नाही, अमन वर्मा आलेला..त्याला नवीन टीम सेट करायची आहे, करोडो रुपये देणार आहे तो..”

“अमन वर्मा मला काही चांगला माणूस वाटत नाहीये, स्वतःच्या स्वार्थासाठी तो माणसांना विकत घेऊ पाहतोय..”

“म्हणजे??”

“मला त्याने ऑफर दिलेली, करोडो रुपये देऊन मला विकत घेऊ पाहत होता..त्याने एक नवीन फॅक्टरी सुरू केलेली, त्यासाठी डिजिटल automation चं contract सारंगच्या कंपनीला दिलेलं. पण दुसऱ्याला हे देण्यापेक्षा आपल्याच ऑफिस मध्ये सॉफ्टवेअर टीम सेट करून आपणच सगळं चालवावं असं त्याला वाटत होतं, त्यामुळे तो मला ऑफर देत होता..मी नाही म्हणालो म्हटल्यावर कंपनीला त्याने गळ घातली..”

“अरे मग चांगली ऑफर आहे की..”

“नाही..माझ्या तत्वांना ते पटत नाहीये, आणि सध्यातरी मी खूप वाईट काळातून जातोय, माझ्याकडून आता नोकरी होईल असं वाटत नाही, पुढील काही वर्षे पोट भरेन इतकं कमावून ठेवलं आहे मी..”

“म्हणजे तू??”

“होय..राजीनामा देणार..”

“अरे पण..”

“मला समजवू नका प्लिज..माझा निर्णय पक्का आहे..”

मित्र उठले, एकजण जाता जाता म्हणाला..

“माणसाचं भाकित करणारं सॉफ्टवेअर असतं तर किती बरं झालं असतं ना? माणूस आधीच तयार झाला असता..”

सारंगला अचानक केशवची वाक्य आठवू लागतात..

“आपल्याला जे करायचं असतं ते अगदी आपल्या समोर असतं, पण धक्का दिल्याशिवाय माणूस हलत नाही बघा..आपण त्या बापाची पोरं,  कमजोर नाही आपण..खऱ्याचा रस्ता अवघड वळणाचाच असतो साहेब…”तेवढ्यात मोबाईल वर पुन्हा ती दोर ची ऍड चमकू लागली. हे सगळं घडत असताना सारंगच्या डोक्यात वेगाने चक्र फिरू लागली, केशवचं बोलणं कानात घुमू लागलं, मोबाईल वरची ऍड डोळ्यासमोर फिरू लागली…त्या साधूचे शब्द पुन्हा आठवले.. तू भविष्याचं भाकित करशील…एक नवीन ऊर्जा जणू त्याच्यात संचारली गेली.शॉपिंग साईट आपल्याला काय हवं हे तंतोतंत दाखवतात, OTT प्लॅटफॉर्म आपली आवड काय आहे हे बरोबर ओळखतात, videos मध्ये recommendation मध्ये आपल्याला हवं तेच दिसतं…तंत्रज्ञान आपल्याला काय हवं याचं भाकित करू शकतो तर आयुष्यात पुढे काय होईल याचं prediction ही करूच शकेल ना?? तो धावत पळत पार्किंग मध्ये गेला अन मित्रांना पुन्हा आत बोलावलं..

“माझ्याकडे एक कल्पना आहे, पुन्हा कंपनीत न जाता आपण आपलीच एक टीम बनवून माझ्याच घरी एक प्रोजेक्ट बनवायला घेऊ..आपण स्वतःची एक टीम बनवू अन काम करू.. Artificial intelligence आणि machine learning चा वापर माणसांच्या आयुष्यावर करू”

“सारंग तू leadership करणार असशील तर आम्ही तू म्हणशील तसं करायला तयार आहोत..बोल, कसलं सॉफ्टवेअर बनवायचं??”

“भविष्याचं भाकित करणारं..”

क्रमशः

भाकित (भाग 4) ©संजना इंगळे

3 thoughts on “भाकित (भाग 3) ©संजना इंगळे”

Leave a Comment