प्रेमाचं राजकारण असंही

“अगं लाज कशी वाटली नाही तुझ्याहुन 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत प्रेमप्रकरण करतांना? तोंड काळं केलंस आमचं…”
रुपाली वर तिची आई ओरडत होती.
कॉलेज मध्ये असणारी रुपाली तिच्याच कॉलेज मध्ये असलेल्या एका प्रोफेसर साठी लग्नाचा हट्ट करत होती. हा प्रोफेसर म्हणजे, केस पांढरे, अंगाला नुसती चिटकून राहिलेली त्वचा आणि डोळ्यावर भिंगाचा चष्मा…
अपूर्व, तिचा मित्र..त्याला तिने सगळं सांगितलेलं…आणि त्याला काहीच हरकत नव्हती, त्याने कधी तिला थांबवलं ही नाही… अपूर्व आणि रुपाली, एकेमकांना कायम सपोर्ट करत. एकमेकांची मनं जुळायची, अगदी डबा सुद्धा सोबत खात असायची ही दोघे. दोघेही अभ्यासात टॉपर, स्मार्ट..
राजकारण हा त्यांचा आवडता विषय, एखाद्या कडून आपल्याला हवी असलेली गोष्ट कशी करवून घ्यायची याची युक्ती दोघांना चांगलीच माहीत होती. म्हणूनच कॉलेज मध्ये प्रोजेक्ट ची फाईल असो वा सबमिशन… काहीतरी राजकारण करून ही दोघे शिक्षकांना बरोबर गुंडाळायचे…
रुपाली चं घर म्हणजे एक तुरुंग, मुलांशी बोलायचं नाही, बाहेर जास्त वेळ थांबायचं नाही, माणसं असताना समोर जायचं नाही असं कडक शिस्तीचं ते घर. लग्न ठरवतानाही मुलीला कधी विचारलंही जायचं नाही, आई वडिलांनी जो पसंत केला त्यालाच निमूटपणे स्वीकारायचं..
अश्या या घरात रुपाली ने धाडकन तिच्या प्रेमाचा बॉम्ब सोडला, सरळ आई वडिलांना सांगितलं,
“माझं आमच्या एका सरांवर प्रेम आहे, त्यांचं वय 45 आहे पण मी त्यांना सोडून कुणाशीही लग्न करणार नाही…”
रुपाली चा मोबाईल जप्त करणं, तिला खोलीत बंद करणं, समज देणं..सगळे प्रकार करून झाले..वडिलांची तर तळपायाची आग मस्तकात गेलेली…
“एक तर प्रेमविवाह आमच्या घराण्यात कोणी केला नाही, त्यात हिने माझ्या वयाच्या माणसासोबत प्रेम चालवलं… शी ..किळस येतेय विचार करून सुद्धा..”
साम, दाम दंडभेद सगळं केलं पण रुपाली तसुमात्र आपल्या निर्णयापासून ढळली नाही.
आई वडील 2 दिवस भयाण टेन्शन मध्ये, कसं होणार,काय होणार या भीतीने 2 दिवस अत्यन्त वाईट पद्धतीने गेले…
“तुम्ही जर माझं लग्न लावून दिलं नाहीत तर मी जीव देईल…”
या वाक्यानंतर मात्र आई वडील हतबल झाले,
शेवटी त्या प्रोफेसर ला घरी आमंत्रण देण्यात आलं…
प्रोफेसर घरी आला, सोबत अपूर्वही आला..
प्रोफेसर सोफ्यावर बसला..रुपाली चे आई वडील त्याला नखशिखांत न्याहाळत होते, प्रोफेसर ला कळेना हे काय चाललंय…त्यांना चहा दिला गेला, प्रोफेसर ने आपली bp ची गोळी तोंडात टाकली, चहा बशीत ओतला आणि थरथरत्या हातांनी चहा पिऊ लागला…वडिलांनी रुपाली कडे रागाने पाहिलं, रुपाली ने लक्ष दिलं नाही.
आई वडील प्रोफेसर काय म्हणतो याची वाट बघत होते आणि प्रोफेसर आई वडील काय म्हणतात याची…
5 मिनिटं अशीच गेली, शेवटी रुपाली म्हणाली…
“लग्नाची बोलणी करा आता लवकर, तुम्हाला जे काही ठरवायचं लवकर ठरवा, शेवटचं वर्ष बाकी आहे, लवकर लग्न झालं तर अभ्यासाला मदत होईल मला..शेवटी सोबत असली की हुरूप वाढतो…” रुपाली लाजून म्हणाली…
वडील एक आवंढा गिळत म्हणाले,
“बोला काय करायचं…”
रुपाली म्हणाली,
“काही नाही बाबा, माझं या अपूर्व सोबत लग्न करून घ्या…बाकी माझी काही इच्छा नाही..”
आई आणि बाबा एकदम आनंदाने चुर झाले, अपूर्व कडे पाहिलं, अगदी देखणा, तेजस्वी आणि रुपाली ला शोभेल असा तो होता…पण…रुपाली ने असं का सांगितलं?तिचं प्रेम या प्रोफेसर वर आहे असं का सांगितलं??
“अरेवा..अभिनंदन अपूर्व….” प्रोफेसर शेवटी बोलला…
सगळे निघून गेल्यावर रुपाली ला आई वडिलांनी खोलीत नेलं, दार लावून घेतलं आणि आईने रुपाली ला मिठी मारली…
“पोरी, मोठं ओझं हलकं केलंस.. पण असं मतपरिवर्तन कसं झालं तुझं??”
“कसलं मतपरिवर्तन… मी जर तुम्हाला डायरेक्ट अपूर्व बद्दल सांगितलं असतं तर …आपल्या घरात प्रेमविवाह चालत नाही म्हणून तुम्ही आमचं लग्न होऊच दिलं नसतं… कसं आहे…दगडाची ठेच लागली की माणूस आकांडतांडव करतो, पण समोर पर्वत सर करायचा दिसला की दगडाची ठेच काहीच वाटत नाही…”
अपूर्व आणि रुपाली ने राजकारणाच्या अभ्यासाचं हे प्रात्यक्षिक होतं… कसलाही विरोध न पत्करता एकत्र कसं यायचं हे त्यांचं प्लॅंनिंग… त्यांचंच तर प्रेम होतं आधीपासून…
शेवटी दोघांच लग्न निर्विघ्नपणे पार पडलं…
“या दोघांच्यात मला लग्नाची बोलणी करायला का बोलावलं असेल?” अक्षता टाकता टाकता प्रोफेसर विचार करत बसला आणि त्याचं उत्तर शेवटपर्यंत तो शोधत बसला..

Leave a Comment