पेच

 घराच्या गेटजवळ उभी असतानाच दुरून माझ्या एका विद्यार्थिनीची आई जवळ येताना दिसली, लांबूनच त्यांनी मला पाहिलं, आणि पाहताक्षणी झपाझप पावलं टाकत माझ्याजवळ येऊ लागल्या, त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं माझ्या लक्षात आलं..

त्या जवळ येताच त्यांना मी खुशहाली विचारली, त्यांनी बाकीचं काहीही न बोलता सरळ माझा हात हातात घेतला अन रडू लागल्या..

त्यांचं एकंदरीत अवसान बघून काय अडचण असावी ते माझ्या लक्षात आलं…त्यांची मुलगी, स्नेहा. लग्नाच्या वयाची, शिक्षण संपवून बाहेरगावी नोकरीला. बाहेरगावी जायला तिने फार मुश्किलीने परवानगी काढली होती. घरच्यांनी शिक्षण झाल्या झाल्या लग्नाचा घाट घातलेला, तिने कसंबसं समजावून नोकरीसाठी परवानगी काढली होती.

“मॅडम तुमच्या भाषेत समजवा तिला..लग्न करायला नाही म्हणतेय, तिकडेच मुंबईला एक मुलगा पाहिलाय तिने, त्याच्याशीच लग्न करायचा हट्ट करतेय..”

एका दमात त्यांनी सगळं सांगितलं…मी त्यांना धीर देत घरात नेलं, पाणी दिलं..

“तुम्ही रडू नका, मला सविस्तर सांगा..”

“काय सांगू आता, या मुलींना दुसरीकडे पाठवूच नये असं वाटतं…तिच्याच ऑफिस मध्ये एक मुलगा आहे, दुसऱ्या जातीचा..किती दिवस त्यांचं प्रकरण चालू होतं, पण जेव्हा हिच्या लग्नासाठी बघायचा कार्यक्रम ठरला तेव्हा हिने सांगितलं..”

“ती ठाम आहे का तिच्या या निर्णयाबद्दल??”

“तिने आम्हाला सांगितलं, की तुम्हाला हवं त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे, पण मी कधीच खुश राहणार नाही हेही लक्षात ठेवा..आता तुम्हीच समजवा तिला..आई वडिलांशी अशी प्रतारणा करून काय मिळेल??”

या परिस्थितीत माझ्यापुढे सर्वात मोठा पेच पडला होता, एकीकडे माझ्या विद्यार्थिनीची बाजू खरी वाटायची… तिने तिच्या योग्यतेचा सुशिक्षित आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा शोधला होता. ती दिसायला नाकी डोळस नीट पण सावळी होती, मुलं बघायला आल्यावर तिच्या रंगामुळे तिला हमखास नकार देत…अश्यातच तिच्या रूपावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करणारा देखणा मुलगा तिला मिळाला होता..जो अरेंज मॅरेज ने कदाचित मिळालाही नसता..केवळ जात दुसरी असल्याने घरच्यांनी नकार दिला होता..

दुसरीकडे तिची आई, केविलवाणी होऊन माझ्याकडे विनवण्या करत होती. त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी शहरात येऊन शून्यातून संसार उभा केला होता, वडिलांची समाजात आत्यंतिक प्रतिष्ठा होती, सर्वजण त्यांना मानत. अश्यातच जर त्यांचा मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं तर सगळं धुळीस मिळणार होतं. कितीही म्हटलं तरी त्यांना समाजात वावरायचं होतं..नातेवाईकांना तोंड द्यायचं होतं.. इतकी वर्षे मिळवलेला सन्मान मुलीच्या निर्णयामुळे त्यांना घालवायचा नव्हता.

अश्या वेळी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन मुलीच्या आनंदाचा विचार करायला हवा, समाजाचा विचार न करता मुलीच्या भविष्याचा विचार करायला हवा..हे सगळं बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षात करणं कठीण.

दुसरा मुद्दा, या मुलीने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केलंच तर भविष्यात त्यांच्यात काही वाद होणार नाही याची शाश्वती काय? आणि याला सोडून आई वडील म्हणतील त्या मुलाशी लग्न करून जर पुढे काही अडचण आली तर काय? शाश्वती कसलीही नाही, लग्न कुणाशीही झाले तरी माशी कुठेतरी शिंकतेच…मग त्या क्षणिक वादाला न मिटवता मूळ निर्णयच कसा अयोग्य होता, आणि दुसरा निर्णय स्वीकारला असता तर…आमचं ऐकलं असतं तर…अश्या जर तर च्या भोवऱ्यात सर्वजण अडकतात..

तिसरा मुद्दा, मुलीला शिक्षणाला बाहेरगावी पाठवलं म्हणजे ती नक्की प्रेमप्रकरण करणार या धाकाने कित्येक आई वडील मुलींना दूर पाठवायला कचरतात..मुळात शिक्षण व नोकरी म्हणजे मुलीला भावनिक आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्याची धडपड असते..प्रेम करणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती ठरवून अथवा जाणूनबुजून केली जात नाही. त्याबद्दल अपराधी वाटण्याचं अथवा वाटू देण्याचं काहीच कारण नाही. मुलीला शिक्षण देऊन आकाशात उंच भरारी साठी तयार करायचं, मात्र भरारी घेत असताना तिच्या गवसणीची दोरी मात्र आपल्या हातात असावी असं समाजाला वाटतं. नोकरी कर, पण अमुक एक वेळात घरीच हवं, शिक्षण घे, पण दुसरीकडे पाठवणार नाही, मित्र मैत्रिणी बनव, पण मैत्रीच्या पुढे जाऊ नकोस…शिक्षण आलं की व्यक्तीला भावनिक स्वातंत्र्य येतं, विचारांचं स्वातंत्र्य मिळतं.. मग अश्यावेळी एखादा मोठा निर्णय तिने घेतला तर त्याची अशी काही पायमल्ली होते की तिचं स्वातंत्र्य सपशेल हिरावून घेतलं जातं. मुलीला शिकवावं सुद्धा आणि तिच्यावर अगदी 30 वर्षांपूर्वीचे बंधनही लादावे, हा कुठला न्याय? एक तर तिला घरीच बसवून स्वातंत्र्याशी ओळख न होऊ देता बंधनात ठेऊन तुम्हाला हवं तसं तिला वागवा, पण भरारीची स्वप्न दाखवून पंख छाटू नका…

वर्षानुवर्षे कित्येक पालक या प्रसंगाला तोंड देत आहेत, अश्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य अनुभवांचे चटके सोसलेल्या पालकांमध्ये नसतं…

या परिस्थितीत कुणाला समजवावं हा मोठा पेच माझ्यापुढे पडला. तुमच्याकडे आहे याचं उत्तर?

1 thought on “पेच”

  1. असा पेच नेहमीच असतो पण आता मुलीसुद्धा जाणकार झालेल्या असतात त्याना त्यांच बर वाईट कळत असत. त्यामुळे निर्णय मुलींवरच सोपवावा. म्हणजे पुढची जबाबदारी घ्यायला त्याही खंबीर होतील. आणि आईवडिल नेहमीच आपल्या मुलांच्या पाठीशी असतातच.

    Reply

Leave a Comment