पुरुषांनो स्वावलंबी व्हा..!!!

 सध्या फेमिनिजम, स्त्री पुरुष समानता यावर ट्रेंडिंग हेडलाईन्स बनत असतात. स्त्रीने स्वावलंबी असावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे, कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नये ही शिकवण दिली जाते. पण स्त्रीप्रमाणेच पुरुषानेही स्वावलंबी असावे ही शिकवण त्यांना दिली जाते का? 

“पुरूष असतातच मुळात स्वावलंबी, त्यांना वेगळं काय करायची गरज आहे?” हा प्रश्न बहुतेकांना पडला असेल..

अर्चित, एक सुशिक्षित आणि प्रामाणिक मुलगा. एकुलता एक असल्याने लाडाकोडात वाढलेला..आई वडील गावाकडे आणि हा शहरात नोकरीला. भरघोस पगार. स्वतःचं घर केलं आणि लागलीच अक्षता डोक्यावर पडल्या, माधुरी त्याची अर्धांगिनी बनून आली. माधुरी कमी शिक्षित, नोकरी न करणारी.. त्यामुळे घराचा सर्व भार तिने उचलला. अर्चितला अगदी हातात सगळं मिळत असे. पाण्याचा ग्लासही कधी उचलायची गरज भासली नाही. एक दिवस अचानक माधुरी अनपेक्षितपणे त्याला सोडून गेली आणि तो एकटा पडला. दुःखात काही दिवस काढले, माणसं सोडून जातात पण मागे राहिलेल्या माणसांना जगणं सोडता येत नाही. घरात कुठली वस्तू कुठे हेही त्याला माहित नसे. जेवणासाठी मरमर सुरू झाली..कुक पाहिले, स्वयंपाकी बाया पहिल्या पण कधी दांडी मारत तर कुणी अर्धवट काम सोडून जात. तो हवे तितके पैसे द्यायला तयार असताना सुद्धा टिकणारं माणूस भेटत नव्हतं. कधी झाडू हातात घेतलेला नव्हता.. कामवालीला तो घरात असतानाच बोलवावं लागे.. ती कधी उशिरा येई, याला घर एकटं सोडून जाता येत नसे..मग ऑफीसला रोज उशीर होई..आलं का नाही परावलंबित्व? झाडू, फरशी, स्वयंपाक यासाठी कायम त्याला दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागे. त्याचे होणारे हाल बघून दुसरं लग्न करण्यासाठी घरच्यांनी घाट घातला..म्हणजे मानसिक गरज म्हणून नाही, तर कुणावर तरी अवलंबून राहण्यासाठी… अर्चित सुद्धा तयार झाला, कारण स्वयंपाक, साफसफाई ही कामं आपली नाहीच आणि कधी करणारही नाही असं परावलंबी त्याला बनवलं गेलं होतं..इथे पुरुषांना का नाही शिकवलं जात स्वावलंबी होणं? 

तुम्ही बाहेर कितीही प्रगती करा पण विसावा घ्यायला शेवटी घरच लागतं, मग त्या घराची मॅनेजमेंट जमणं दोघांना यायला हवं. झाडूने घर कसं स्वच्छ करावं, घरात कुठल्या वस्तू कुठे ठेवाव्या, बेडशीट किती दिवसांनी बदलावं, कपडे कसे वाळत टाकावे, नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, पराठा आणि जेवणाला भाजी,पोळी, भात, वरण कसं शिजवावं या बेसिक गोष्टी जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शिकवल्या गेल्याच पाहिजे…पण इथे आडवा येतो तो पुरुषी अहंकार..

असाच आईवर कायम अवलंबून असलेला मिलिंद शिकायला बाहेरगावी गेला. 2 मुलांसोबत राहू लागला. करू सगळं बरोबर असं म्हणत अति आत्मविश्वासाने त्याने सगळं करायला घेतलं..सकाळी चहा बनवला, तो पितांना अगदी विचित्र चव लागली..मग लक्षात आलं की दूध परवाचं आहे…तसाच फेकून दिला…नाश्त्याला आमलेट केलं..ते बऱ्यापैकी जमलं..मग कॉलेजला जायला कालचा धुतलेला युनिफॉर्म दोरीवरून काढला. तो अजूनही ओलाच होता.. कारण जाईल की वाळून असं म्हणत मिलिंदने तो फक्त पाण्यातून काढून टांगून दिलेला..पुन्हा डब्याला काय न्यावं? कणिक ऐवजी येसूरचं पीठ मळून ठेवलं..भाजी करपून गेली. वैतागत सगळं तसंच ठेऊन तो कॉलेजला गेला..आल्यावर बघतो तर अगदी विचित्र वास घरात येत होता. सकाळी केलेल्या आमलेट आणि बाकीच्या प्रयोगांनंतर ओटा पुसणं, भांडी घासून ठेवणं हेही कामं असतात हे त्याला कळलंच नाही…

“हे बायकांचं काम आहे, पुरुषांचं नाही..” असं म्हणत ही माणसं अहंकाराची ढाल पुढे करतात..पण वेळ आली की स्वतःच्या हातच्या करपलेल्या भाकऱ्या भाजून खातात. 

30 वर्षाच्या संसारानंतर मालती ताई नानांना सोडून गेल्या, दोन महिने दुःखं केलं..भरपूर रडून झालं..पण नंतर शारीरिक त्रास मानसिक त्रासावर वरचढ होऊ लागले. मालती ताईंनी नानांना कधी पाण्याचा ग्लास उचलू दिला नव्हता..

“मी आहे ना..तुम्ही कशाला ही कामं करता..” असं म्हणत मालती ताईंनी नानांचा पुरुषी अहंकार 30 वर्ष पोसला..मग एका आजाराने त्या जेव्हा सोडून गेल्या तेव्हा मात्र नाना सैरभैर झाले..मालती आपल्याबरोबर कायम असेल हेच गृहीत धरलं होतं त्यांनी.. आणि आपण सुद्धा शंभर वर्षे जगू असं मालती ताईचा समज…नानांचे प्रचंड हाल झाले..परावलंबित्व पोसल्यावर दुसरं काय होणार?

आधी बायका माहेरी गेल्या की शेजारची लोकं माणसांना जेवायला बोलवायची, बायको परत येईपर्यंत… भातुकलीच्या खेळात मुली चुलीचा ताबा घ्यायच्या आणि मुलं गोट्या खेळत बसायचे..पंगतीत माणसांना आधी बसवलं जायचं आणि बायका मागाहून बसून झाकपाक करायच्या…मुलगी मोठी झाली की चल मला स्वयंपाकात मदत कर म्हणून बजावलं जायचं, आणि मुलांना फक्त तुला काय आवडतं ते बनवतो हे विचारलं जायचं..माणूस पाण्याचा ग्लास ठेवायला आत जायला लागला की बायका अपमानित व्हायच्या…त्यांना अपराधी वाटायचं…कोण पोसतं हे पुरुषांचं परावलंबित्व? कोण खतपाणी घालतं त्याला? आजही पुरुषांनी ही कामं केली की बायकांना भलतं अपमानित व्हायला होतं…

“अगं उठ तुझ्या नवऱ्याच्या हातातला रिकामा ग्लास घे..आता काय तो उठेल का ठेवायला?”

आज प्रत्येकाने…प्रत्येक महिलेने आपल्या पुरुषाला स्वावलंबी बनवलं पाहिजे..आईने मुलाला, बायकोने नवऱ्याला, बहिणीने भावाला…मी असली अन नसली तरी तुझी कामं अडायला नको असं पुरुषांना घडवलं गेलं पाहिजे..घरातली मुख्य कामं काय असतात, ती कशी केली गेली पाहिजे, दोन वेळचं पौष्टिक घरचं जेवण कसं बनवलं गेलं पाहीजे आणि ते झाल्यानंतरही सगळं कसं स्वच्छ करून आवरलं गेलं पाहिजे याची शिकवण जेव्हा पुरुषांना दिली जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता रुजली गेली असं म्हणता येईल..

स्त्रियांनीच का व्हावं स्वावलंबी? पुरुषांनो, तुम्हीही बना स्वावलंबी…

©संजना सरोजकुमार इंगळे

4 thoughts on “पुरुषांनो स्वावलंबी व्हा..!!!”

Leave a Comment