नियतीचा खेळ

 मिथिला आणि नकुल च्या आयुष्याने असं काही वळण घेतलं होतं की नियतीने हा खेळ त्या दोघांसोबतच का खेळावा हा प्रश्न सतत दोघांना सतावत होता…भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातली दरी मिटवायला दोघांचं एकत्र येणं जरुरी होतं… पण भूतकाळात जे दोघे एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले होते, तेच आज एकमेकाला नाकारत होते…

 

<body> साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट, मिथिला आणि नकुल यांचं प्रेमप्रकरण आता लग्नाच्या निर्णयापर्यंत आलं होतं.. मिथिला च्या घरी फक्त आईला ही माहिती होती, मुलगा चांगला असल्याने तिची काहीही हरकत नव्हती. तिकडे नकुल च्या घरीही मिथिला पसंत होती…

आता फक्त मिथिला च्या वडिलांना सांगायचं बाकी होतं. नकुल आणि त्याचं कुटुंब घरी येणार होतं… पण काळाने नेमक्या अश्या क्षणी घाला घालावा…मिथिला च्या वडिलांना हृदयाचा झटका आला…ICU मध्ये असताना मिथिला चा हात हातात घेऊन त्यांनी आपली ईच्छा व्यक्त केली..

“पोरी…तुला सुखाने संसार करताना पाहायचं होतं… आता वेळ नाही…माझ्या मित्राच्या, गोविंदच्या मुलासोबत लग्न कर…फार कधीची ईच्छा होती तुला सांगायची…पण..”

एवढं बोलून वडिलांनी प्राण सोडला..

मिथिला वर आभाळ कोसळलं…लग्न बाजूलाच राहिलं पण वडिलांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली.

यातून सावरायला बरेच महिने गेले, नकुलशी संपर्कही मिथिला ने कमी केला होता. तिला सावरायला वेळ द्यावा म्हणून तोही लांब राहत होता.

अश्यातच मिथिला च्या आईने मिथिला च्या लग्नासाठी गोविंद यांच्या घरी बोलणी केली…

“आई? तुला माहीत आहे ना..”

“हे बघ…ते सगळं विसरून जा…वडिलांची शेवटची ईच्छा होती ती…” असं म्हणत आईला बांध फुटला..

अश्या नाजूक परिस्थितीत मिथिला कडे पर्याय नव्हता…नकुल ला जेव्हा समजलं तेव्हा तो पूर्णपणे आतून तुटला होता…त्याचा आईनेही त्याला सावरायला लावलं आणि नवीन आयुष्याला सुरवात करायला सांगितली..

नकुल चं लग्न झालं आणि इकडे मिथिलाही आयुष सोबत संसाराला लागली…मन दुसरीकडे होतं… संसारात लक्ष घालायला जड जात होतं…पण आयुष? वडिलांनी अत्यंत योग्य मुलगा निवडला होता…त्याचा प्रेमाने ती हळूहळू बदलली…त्याच्यावर प्रेम करू लागली…आयुष ने मिथिला ला जीवापाड जपलं…त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक कळी उमलली…एक सुंदर मुलगी जन्माला आली…सई…मिथिला आता तिचा भूतकाळ पूर्णपणे विसरून गेलेली…

तिकडे नकुललाही एक मुलगा झाला..अवनिष नावाचा…आयुषही संसारात आता पूर्ण रमला होता…

पण नियतीचा खेळ किती कठोर… दुर्धर आजाराने नकुल च्या बायकोवर घाला घातला आणि इकडे आयुष चा एका अपघातात मृत्यू झाला…

दोघेही एकाकी पडले…नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा घाट घातला…

एक दिवशी मिथिला च्या मामाने अचानक मिथिला च्या आईला नकुल चं स्थळ आणलं..मामा ला भूतकाळ माहीत नव्हता..त्याच्या दृष्टीने ती दोघे अनोळखी होती…

नकुल आणि मिथिला ला कुठलं स्थळ आलंय याबाबत माहिती नव्हती.. मुळात दोघेही दुसऱ्या लग्नाला तयार नव्हतीच… पण मामाने अचानक नकुल चा फोटो मिथिला च्या आईला दाखवला आणि…मिथिला आणि नकुल ला एकमेकांसमोर आणण्यात आलं..

दोघेही समोरासमोर आले…एकमेकांना पाहून दोघेही कितीतरी वेळ निःशब्द होते…तब्बल दहा वर्षांनी ते समोर आले…खरं तर ही गोष्ट 10 वर्षांपूर्वी व्हायला हवी होती..तेव्हा दोघांचं प्रेम होतं…पण आज? एकेमकावर जीव ओतून टाकणारे आज एकमेकाला नाकारत होते..आपल्या पूर्व जोडीदाराला विसरणं त्यांना अशक्य होतं…. मधल्या काळात नियतीने त्यांचा पदरात असं काही आयुष्य टाकलेलं की त्यातून बाहेर येणं त्यांना अशक्य होतं…

मामा आणि आई दोघांना एकटे टाकून बाहेर गेलेले..

“पुन्हा एकत्र यायचं? तुला आहे शक्य?”

“नाही…आयुष ला विसरणं अशक्य…”

“मीही राधिका ला नाही विसरु शकत..”

“एकत्र यायचंच होतं… मग तेव्हाच का नाही? आज संसाराच्या मोहपाशात गुरफटून पदरात पडलेलं दुःखं सावरत एकत्र यायचं??? कशासाठी?”

दोघेही नियतीच्या खेळाकडे निरागसपणे बघत होते…प्रश्नही अनुउत्तरीत होते आणि उत्तर सापडत नव्हती…का? कशासाठी? कुणासाठी? ही उत्तरं मिळणं कठीण होतं…

आई आणि मामा आत आले…

निर्णय झाला तुमचा?

दोघेही निःशब्द…

इतक्यात दारातून सई आणि अवनिष हातात हात घेऊन आत आले..

“बाबा…सई ताईने मला खूप साऱ्या खेळण्या दिल्या…मला ताई खूप आवडली…आजी म्हणे आता ताईसोबतच एका घरात आपण राहणार…किती मज्जा ना बाबा??”

मिथिला ने अवनिष ला कडेवर घेतलं, त्याचा डोळ्यात हरवलेलं आईचं प्रेम तिला दिसलं आणि तिचेही डोळे पाणावले..अवनिष मिथिलच्या स्पर्शात आईला शोधत होता आणि अवनिष सई मध्ये बहीण बघत होता..

नकुल आणि मिथिला ला पुन्हा एकदा कुटुंब पूर्ण झाल्याचा भास झाला…आणि मुलांच्या आनंदासाठी दोघेही एकत्र आले…

दोघांना एक व्हायचं होतं…अखेर दोघेही एक तर झाले…पण आता काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती…नियतीचा अजब असा खेळ दिसला…एकमेकांशिवाय दुसऱ्याचा विचारही न करणारे मात्र आज एकमेकांसाठी अनोळखी बनले होते…एकत्र आले ते वेगळ्याच कारणासाठी… मनावर दगड ठेऊन…

पुन्हा एक नवीन आयुष्य सुरू झालं…तडजोडीने का असेना…पण दोघेही एकत्र आले…!!!!

 

1 thought on “नियतीचा खेळ”

Leave a Comment