निखारा -एक थरारक कथा (भाग 7 अंतिम)

शब्बीर चाचा पुढे सांगू लागतात..
“शिवानी…म्हणजेच तुमची शबाना…इकडे एका छोट्याश्या घरात तिचं एक गोंडस कुटुंब होतं… जीवाला जीव लावणारा तिचा नवरा केशव, आणि एक गोंडस लहान मुलगी अमृता…सुखी समाधानी असं कुटुंब…शिवानी एक साधीभोळी गृहिणी…प्रचंड धार्मिक..सर्व उपासतापास करणारी…सुखाचा संसार सुरू होता…
एक दिवस मुलीने हट्ट केला…बाबा बागेत घेऊन चला म्हणून…बाबांनी दोघांची तयारी केली, शिवानी ने खाऊ बांधून दिला आणि दोघे बागेत जायला निघाले…शिवानी घरीच थांबली…मी यांच्याच बिल्डिंग मध्ये राहायचो…माझा मुलगा केतन..तोही या दोघांसोबत बागेत गेला…
काळाने घाला घातला आणि त्याच बागेत अतिरेक्यांनी मोठा बॉम्बस्फोट केला…सर्वजण जागच्या जागी गेले..
शिवानी चं तर कुटुंबच संपलं होतं… माझा मुलगाही सम्पला….तिचं दुःख पाहण्याइतकही माझ्यात धाडस नव्हतं, कारण मीच खचलेलो होतो…
त्या दिवशी तिघांची चिता जळत असताना शिवानी ने हळूच विषाची बाटली काढली आणि तोंडाला लावली…माझं लक्ष जाताच मी धावत गेलो आणि तिला रोखलं..
“का थांबवताय मला…मला जगायचं नाही…मरू द्या मला…कुणासाठी जगू? का जगू? काय राहिलं आता माझं??”
माझ्याकडे उत्तर नव्हतं… सर्व लोकं निघून गेली, चितेजवळ फक्त आम्ही दोघे होतो..
मी खंबीर होऊन शिवानी ला म्हणालो,
“ह्या तीन चिता उद्या विझतील… पण तिथून निघालेला निखारा तुझ्यात कायम धगधगत ठेव….ज्यांनी हे केलं त्यांना संपव…मरायचंच आहे ना? मग त्यांना मारून मग मर..काहीतरी करून मग आयुष्य संपव..तुला मरणाची भीती नाही…मग आता आयुष्य पणाला लाव..”
शिवानी ने डोळे पुसले…चितेच्या धगधगत्या आगीपेक्षा तिच्या डोळ्यातील आग जास्त भयानक होती…
अतिरेक्यांना संपवायचं…हे एकच ध्येय…
आम्ही दोघे मिळून भारत सरकारच्या गुप्तहेर संघटनेला भेटलो…त्यांनी परवानगी दिली…पण योजना मात्र माझीच असेल असा तिचा अट्टहास होता..
आयुष्यात दुसरं काही ध्येयच नव्हतं…आमचं कुटुंब संपलं होतं…मग आम्ही जीव टांगणीला लावून लढायला तयार झालो..
शबाना ला जिहाद टोळीबद्दल समजलं…अब्दुल ची माहिती मिळवली…मी एक मुसलमान…पण माझाही मुलगा मारलाच गेलेला की..आम्ही दोघे पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेलो..शबाना ने मुस्लिम वेष धारण केला..रमजान च्या यात्रेत अब्दुल ला तिने आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याशी लग्न केलं आणि टोळीत जाण्याचा तिचा रस्ता मोकळा झाला..त्याच्या जेवणात रोज थोडथोडं विष कालवून त्याचा खात्मा केला..त्या आधी गुंगी देऊन त्याच्याकडून मृत्युपत्रात शबाना कडे सर्व सूत्र येतील असं लिहून घेतलं..त्याचा मृत्यू अटॅक ने झाला असं सांगितलं गेलं..
मग सर्व सूत्र शबाना ने घेतली….काहींना तिच्यावर संशय यायला सुरुवात झालेली, पण तो संशय दूर करण्यासाठी तिने एक हल्ला यशस्वी करून दाखवला…
तुमच्यासाठी तो एक यशस्वी हल्ला होता, पण सत्य काहीसं वेगळं होतं… पटेल मैदानावर हल्ला होणार हे तिने आधीच भारत सरकारला कळवलं होतं…सरकारने सर्व व्यवस्था करून मैदान पूर्ण मोकळं केलं..एकही व्यक्ती तिथे ठेवली नाही… हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यात आलं, मैदानाच्या मधोमध उभं करून त्यांच्यावर ड्रोन ने बॉम्ब सोडण्यात आला…ती तिघे जागेवरच गेले…आणि मीडिया मध्ये मुद्दाम अशी बातमी देण्यात आली की बॉम्ब हल्ल्यात 50 ठार….म्हणून मृतांची नावं समोर आली नाही..आणि तुम्हाला वाटलं हल्ला यशस्वी झाला…शबाना ने सर्वांचा विश्वास अजून दृढ केला…मी जवळच्याच इलाख्यात राहून तिची मदत करत राहिलो…”
अहमद आणि यासिन डोळे विस्फारून सर्व ऐकत होते…
तिकडे शबानाने सर्व जिहादींना एकत्र आणलं, जवळपास 10 हजाराहून अधिक जिहादी एकत्र आले…कार्यक्रमाची सर्व तयारी झाली…
शबाना आपल्या खोलीत होती…डोळे बंद करून एक समाधानाचा सुस्कारा टाकला…कपाटातून हळूच एक फोटो अल्बम काढला…केशव आणि अमृता चे फोटो, तिघांनी एकत्र काढलेले सहलीचे फोटो, सणवार साजरे केलेले फोटो…मन भरून पाहू लागली…डोळ्यातील अश्रूंच्या धारांनी एकेक फोटो न्हाहून निघत होता..
मग तिने गीता उघडली, एका अध्यायाचं पारायण केलं…
“आज सर्वांचा खात्मा निश्चित…” असा प्रण करून ती उठली..
..उठून मागे वळून पाहिलं तर ….
तर अबिदाजान तिच्याकडे बघत होती…गेली कितीतरी वेळ ती तिथेच उभी होती…शबानासाठी पाण्याचा ग्लास आणला होता तो तिथेच गळून पडला…
शबाना गोंधळली…अबिदाजान ला सगळं समजलं होतं… आता तिने सर्वांना सतर्क केलं तर? आणि अबिदाजान ची तरी काय चूक होती? तिला मारणं योग्य नव्हतं…
“शबाना??”
शिवानी ने मौन बाळगलं..
अबिदाजान शिवानी च्या जवळ आली…
“जा…खात्मा कर…”
“अबिदाजान? हे तुम्ही बोलताय?”
“हो..मीच बोलतेय..या जिहाद च्या नावाखाली कित्येक आयुष्य पणाला लागलेत..कित्येक आयांनी आपली मुलं गमावली..कित्येक पत्नीनी आपला सुहाग गमावला…नको तो जिहाद आणि नको तो रक्तपात…”
शबाना आणि अबिदाजान एकमेकींच्या गळ्यात पडून रडतात…दोघींचेही दुःख एकच होतं…
शबाना डोळे पुसते..
“अबिदाजान…तुम्ही इथून निघून जा…”
“तुला सोडून नाही जाणार मी..”
“ऐका माझं…आता माझं काम संपत आलं… आता मी माझी गती प्राप्त करणार आहे…तुम्ही निघा…”
शबाना ने बळजबरी अबिदाजान ला तिथून सुरक्षित ठिकाणी जायला भाग पाडलं…बाहेर आलेल्या जिहादींसमोर माईक वर घोषणा केली…
“आता मी जे काही सांगणार ते नीट ऐका…सर्वात आधी आपापले मोबाईल बंद करून ठेवा…”
इकडे नासिर अहमद ला सांगतो…
“मी म्हणत होतो ना शबाना हिंदू आहे ते? कुणीच ऐकलं नाही माझं..”
“हो पण आता पुढे काय? शबाना ने सर्व जिहादींना एकत्र आणलंय… म्हणजे…”
“म्हणजे?”
“म्हणजे? सर्व जिहादी? सर्वांचा खात्मा??”
“फोन लाव..पटकन..”
शब्बीर चाचा हसून त्यांच्याकडे बघत असतात…
“यासिन चा फोन बंद आहे..”
“अहमद ला लाव….”
“बंद येतोय… सर्वांचा बंद येतोय..”
“काहीही उपयोग होणार नाही…आता तुम्हीही संपणार…”
शब्बीर चाचा बंदूक काढतात…एकेक गोळी दोघांच्या डोक्याच्या आरपार जाते…आणि दोघे तिथेच कोसळतात…
शबाना माईकसमोर जाते… सर्व गर्दीकडे बघते…डोळ्यात एक निखारा धगधगत असतो…केशव, अमृता आणि केतन तिच्या डोळ्यासमोर येतात…
“भारत माता की जय…जय हिंद…”
शबाना चा आवाज मैदानात घुमतो…गर्दी अवाक होऊन बघते…सुसाट्याचा वारा सुटतो…धुळीने पूर्ण मैदान अंधुक होते…वाऱ्याचा गूढ आवाज मैदानात घुमतो….गर्दीला काही समजायच्या आत शबाना कमरेजवळील बटन दाबते..
अबिदाजान बरंच अंतर पुढे गेलेल्या असतात..त्यांना शबाना चे शब्द आठवतात…
“आता मी माझी गती प्राप्त करणार…”
अबिदाजान चे पाय तिथेच थबकतात..हातातलं सामान सोडून त्या परत शबाना कडे जाण्यासाठी जीव तोडून पळत सुटतात..
पण परत आल्यावर पाहिलं तर…मैदानात आगीचे लोळ धुमसत होते…धुराने सर्व मैदान अस्पष्ट झालेलं…जिहादींचे शरीरं जळून खाक झालेले…शबाना स्टेजवर अर्ध्या भाजलेल्या अवस्थेत दिसते…त्या तिच्या जवळ जातात…शबाना चा श्वास थांबलेला असतो…अबिदाजान एकच आक्रोश करतात..तिचा हात हातात घेऊ पाहतात…पण तिच्या हातातला केशव चा फोटो तिने श्वास सोडल्यानंतरही तिने सोडला नव्हता…समाप्त


2 thoughts on “निखारा -एक थरारक कथा (भाग 7 अंतिम)”

Leave a Comment