निखारा – एक थरारक कथा (भाग 5)

अबिदाजान ला शबाना च्या या अतर्क्य वागण्याची कधी शंका आली नव्हती, पण आज हिंदू कॅलेंडर मध्ये दाखवलेले सण आणि शबाना च्या उपासाच्या तारखा मिळत्या जुळत्या होत्या..ते पाहून अबिदाजान च्या मनात शंकेला जागा निर्माण झाली…
तिकडे नासिर आणि अहमद एकमेकांशी हात मिळवतात, आणि अहमद शबाना चं खरं रूप शोधण्यासाठी नासिर ला मदत करायचं वचन देतो…
नासिर अहमद ला विचारतो..
“तुझा भाऊ अब्दुल…त्याने शबाना शी ओळख कुठे केली?”
“रमजान यात्रेत नमाज नंतर दोघांची नजरानजर झाली..आणि अब्दुल भाईने तिला लग्नासाठी मागणी घातली…”
“पण शबाना चं कुटुंब??”
“ती अनाथ आहे असं ती म्हणाली..कुण्या शब्बीरचाचा कडे ती वाढली…”
“ते कुठे असतात काही खबर?”
“नाही.फक्त नाव ऐकलं होतं…कधी भेटण्याचा प्रसंग नाही आला…”
“त्यांना एकदा भेटावं लागेल…”
“कुठे सापडणार?”
“शबाना कडूनच माहिती मिळव…एका घरात राहता तुम्ही…”
“प्रयत्न करतो…”
अहमद संध्याकाळी जेवायच्या वेळेस शबाना ला विचारतो.
“भाभीजान…शब्बीर चाचा कधी आलेच नाही इकडे..”
त्यांचं नाव काढताच शबाना ला ठसका लागतो…एक घोट पाणी पीत ती विचारते…
“आज कशी आठवण आली शब्बीर चाचा ची?”
“सहजच…”
शांतता पसरते..
काही वेळाने अहमद पुन्हा विचारतो..
“कुठे राहतात ते?”
शबाना काहीही बोलत नाही..
“भाभीजान??”
“सध्या आपला फोकस कशावर आहे? आपलं ध्येय काय आहे ते सोडून हे भलतंच सुचलं कसं तुला? उद्यासाठी जिहादी संघटनांच्या प्रमुखांना बोलवायचं आहे…तसं आमंत्रण दिलंस का? ..”
“नाही..”
“मग? ते कोण करणार?”
शबाना सरळसरळ तिचा भूतकाळ लपवतेय हे दिसत होतं…अबिदाजान च्या सुद्धा ते लक्षात आलं…
अहमद चा डाव शबाना च्या लक्षात आला…तिने शब्बीर चाचा ला फोन लावून तडक भारतात निघून जाण्याचं सांगितलं….
तिने जसा फोन ठेवला तशी तिला गुंगी आली… अहमद ने तिच्या जेवणात गुपचूप गुंगीचं औषध मिसळलं होतं…
अहमद ने नासिर ला फोन करुन बोलावून घेतलं…
नासिर आणि अहमद शबाना च्या खोलीत येतात आणि खोली तपासू लागतात…तिचा फोन घेतात, पण फोन ला लॉक असल्याने त्यांना काही करता आलं नाही…नासिर ने मग तिचं सिम आपल्या फोनमध्ये टाकलं आणि शब्बीर चाचा चा नंबर मिळवला…
दोघेही तिथून पसार झाले..
दुसऱ्या दिवशी नासिर ने शब्बीर चाचा ला फोन लावला…पण तिकडून कुणी उचलत नव्हतं…. बऱ्याचदा प्रयत्न करूनही उपयोग नाही…
अखेर त्यांनी त्या नंबर वरून शब्बीर चाचा चं लोकेशन मिळवायचा प्रयत्न केला…
आणि लोकेशन मिळालं…
भारत पाक सीमेजवळ ते होतं.. त्यांनी शब्बीर चाचा ला पकडायचं ठरवलं आणि ते दोघेही निघाले..
शबाना ला जेव्हा जाग आली तेव्हा तिला समजलं की तिच्यासोबत काय झालेलं…
तिने तडक पुढचं पाऊल उचलायला सुरवात केली…
अहमद तिथे नव्हता, मग यासिन ला तिने सर्व जिहाद संघटनांना एकत्र येण्याचं आमंत्रण द्यायला लावलं..येत्या रविवारी सर्व संघटना एका मोठ्या आवारात एकत्र येतील…2 लाखाहून अधिक जिहादी एकत्र येऊन प्रतिज्ञा करतील असं नियोजन तिने करायला लावलं…

शबानाचा जिहादी जगतात नुकत्याच यशस्वी केलेल्या हल्यामुळे चांगलाच दबदबा होता….सर्व संघटनांनी मंजुरी दिली आणि रविवारी एक प्रचंड जमाव एकत्र येणार होता…


Leave a Comment