नात्यातला विरोधाभास

 आई अगं वाहिनीसोबत का असं वागतेस? तीही माझ्यातकीच शिकलेली आहे, मला तू किती सपोर्ट करतेस आणि तिला मात्र घरकामात अडकवून ठेवलस.

“हे बघ, मला शिकवू नकोस, मी सासू आहे तिची, आणि आपल्या घरात हेच चालतं.. तू तुझ्या घरी तुला हवं ते कर…आणि सून ती सूनच असते, मुलीची सर तिला येत नाही”
त्या क्षणी पूनम ला आपण परके झाल्याचा भास झाला. आईला आधी कितीही बोललं तरी आई ऐकायची, मात्र सासू झाल्यावर एक शब्दही ऐकायला तयार नाही.
पूनम आणि सीमा एकाच वयाच्या, दोघींचं शिक्षण सारखं, स्वभाव सारखे म्हणून नणंद भावजयीचं खूप पटायचं. पूनम चं लग्न झालं तशी ती दुसऱ्या राज्यात गेली. तिथे काही वर्षे घालवल्यानंतर नवऱ्याची बदली तिच्या माहेरच्या गावी झाली. त्यांनी माहेरच्या घराजवळच त्यांचं घर घेतलं. तेव्हापासून तिचं येणं जाणं वाढलं.
घरात तिने पाहिलं की जी आई आपल्याला नोकरीवर जाताना सगळं हातात द्यायची, नोकरी करावी म्हणून तगादा लावायची तीच आज वहिनीला मात्र घरातच राबवतेय. तिला काही हे पटलं नाही. पण आईही बदलली, बरं सीमा समोर आईला काही बोललं तर आईचा स्वाभिमान दुखावला जायचा..
एक दिवस पूनम ने आईजवळ एक मागणी केली,

“आई, ऑफिस टाकायचं म्हणतेय…मी तर फ्लॅट मध्ये राहते, जागा नाहीये तिथे, पण इकडे वरच्या खोलीत जर सुरू केलं तर? अशीही खोली रिकामीच आहे…”

“असं म्हणतेस? कर की सुरू, मी आहे सोबत…काय काय करायचं सांग..मी मस्त साफसफाई करून ठेवते, तुझ्या बाबांना सांगून मस्त खुर्ची टेबल आणू..अजून काय करायचं सांग…”

मुलीने हा प्रस्ताव मांडला तसं आईला काय करू अन काय नको असं झालं.
एक महिन्यात सर्व सेटअप झाला. आई मोठ्या कौतुकाने मुलीच्या ऑफिस कडे बघायची. शेजारी पाजारी आणि नातेवाईकात कौतुकाने मुलीबद्दल सांगायची.

“चला, काम झालं..आज संध्याकाळी आपणच माझ्या ऑफिस चं उदघाटन करू…सगळ्यांनी यायचं बरं का…”
सगळे अगदी खुशीत होते..सीमा चा नवरा बहिणीसाठी सुट्ट्या टाकून ऑफिस च्या setup साठी झटत होता. सासरे आर्थिक सर्व व्यवस्था करत होते.

संध्याकाळी सगळे जमले, सीमा हातात पुजेचं ताट घेऊन उभी. तिला फार अभिमान वाटला, मला नाही करता आलं पण पूनम ला संधी मिळतेय याचंच तिला समाधान वाटलं. तिने तयारीत काहीही कसर सोडली नव्हती.
सीमा ने कधीच पूनम चा हेवा केला नाही, आपली बहीण समजून ती सर्व करत होती आणि तिला अभिमान होता पूनम च्या या निर्णयाचा.
पूनम ऑफिस मध्ये सर्वांना नेते..
“फायनली ऑफिस तयार झालं…आता इथल्या बॉस ने खर्चीवर विराजमान व्हायची वेळ झालीये…”

“अगं मग बस की…वाट कसली पाहतेय…” आई म्हणाली.

पूनम ने सीमा च्या हातातलं पुजेचं ताट बाजूला ठेवलं आणि सीमा ला तिने ओढून खुर्चीवर बसवलं..

सर्वांना कळेना हा काय प्रकार आहे.

“हे काय?”

सीमा अवाक होऊन बघत होती, हे काय चाललंय?

“आई, हे सगळं करायचं मी म्हटलं, पण कुणासाठी हे मी सांगितलंच नाही…तू हे माझं आहे म्हणून किती उत्साहाने सर्व केलंस, आणि आता तुला समजलं की हे वहिनीचं आहे तर लगेच तुझं मन बदललं? का असं? स्त्री आपल्या मुलीला जी वागणूक देते तीच सुनेला का देत नाही? आणि मग म्हणते, की सून ती सूनच असते..ती मुलगी नाही होत…सुनेला अशी वागणूक दिली तर कशी होईल ती मुलगी?”
आईला उपरती झाली, तिने पुजेचं ताट हातात घेतलं…आणि भरल्या डोळ्यांनी सुनेची पूजा करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(नात्यातला हा विरोधाभास जेव्हा कमी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने नात्यांना न्याय दिला जाईल. आपली सून हीसुद्धा कुणाची तरी मुलगी असते, तिलाही स्वप्न असतात, तिच्या स्वप्नांचा आदर केला, तिच्या विकासाला प्रोत्साहन दिले आणि पोटच्या पोराप्रमाणे वागणूक दिली तर ती स्वतःच्या आईवडिलांहून जास्त सासरच्यांसाठी करेल यावर दुमत नाही)

Leave a Comment