नशिबवान

 “एकाच घरात राहून कायम तुलना..मला तर असं वाटायला लागलंय की मी काही कामाचाच नाही..useless म्हणतात ना ते तसं..”

ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आपल्या नवीनच जॉईन झालेल्या असिस्टंट सोबत भूषण आपलं मन मोकळं करत होता..

“असं का बोलताय सर?? काही प्रॉब्लेम झालाय का??”

“नेहमीचंच असतं रे आमच्या घरात…ती निशा किती कष्ट करते, किती प्रामाणिक आहे, वक्तशीर आहे हेच मला सांगत असतात आई बाबा..माझी बाजू कधी ऐकतच नाही..”

“प्रत्येक घरात होतंच सर असं.. घरातील 2 व्यक्ती बाहेर कामाला जात असतील तरी दोघांत काहीना काही तुलना होतच असते..आता आमच्याच घरी बघा, माझा चुलतभाऊ माझ्याहून मोठया हुद्द्यावर आहे..माझ्याच वयाचा…मला किती टोमणे ऐकावे लागतात यामुळे..”

“तुमची तरी वयं सारखी होती.. निशा तर माझ्याहून 3 वर्षांनी लहान..मी सिनियर.. पण मी मोठा असलो तरी काहीच ठेवत नाही माझी..”

“अशी तुलना केल्याने न्यूनगंड निर्माण होतो..आत्मविश्वास कमी होतो..आपणच नाही तर कितीतरी विद्यार्थी सुद्धा या तुलनेच्या खेळात भरडली जातात, आपण दुसऱ्याहून वरचढ म्हणून पेलवलं जाणार नाही इतकं आपल्यावर लादतात..याचा फार वाईट परिणाम होतो मुलांवर..”

“आई वडिलांना समजायला हवं ना..घरात अश्या 2 मुलांची तुलना करू नये..”

“तेच तर कळत नाही माझ्या आई वडिलांना.. अरे एवढं सोड, सकाळचा चहा सुद्धा मला बनवायला लावला आता, म्हणे निशाही कामाला जाते, ती स्वतः सगळं करते..अन तुला कशाला आयतं हवं म्हणे… आता काही दिवसांनी मला किचनमध्ये जुंपणार बघच तू..”

“जाऊद्या सर..”

“आई बाबा म्हणतात, तुझ्यावर काही भरवसा नाही आमचा..म्हातारपणी आमची निशाच आमचा सांभाळ करेल..बोल आता..”

“बापरे. इतकं??”

“फार कमनशिबी आहे मी..”

“जाऊद्या.कितीही झालं तरी आई वडिलांना सगळी मुलं सारखीच..”

“कोण मुलं??”

“तुम्ही आणि निशाताई..”

“तिचे आई वडील वेगळे आहेत..”

“काय?? निशा म्हणजे तुमची लहान बहीण..”

“अरे मूर्खा बायको आहे ती माझी..”

असिस्टंट डोळे विस्फारून बघतच राहिला..म्हणजे घरात एवढं सगळं कौतुक मुलाला डावलून सुनेचं होत होतं?? तीही नोकरी करते म्हणून चहा सरांना सांगितला गेलेला?? घरात तिचं कायम कौतुक असायचं?? मुलापेक्षा सुनेवर जास्त विश्वास होता??

“काय रे काय झालं..”

“काही नाही सर..तुम्ही खरंच तुमच्यात बदल करा..जास्त कष्ट घ्या..आणि तुम्ही कमनशिबी नाहीत..खूप नशीबवान आहात ज्यांना असे आई वडील मिळाले..”

Leave a Comment