धुरा (भाग 6) ©संजना इंगळे

(20 दिवसांनी)

“तेजु मॅडम..या…ही तुमची खुर्ची…नाईक साहेबांनंतर आता तुम्हीच याला न्याय द्याल याची खात्री आहे मला…”

तेजु बहुमताने विजयी होऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान होते…

खुर्चीवर बसताच तिच्या अंगात जबाबदारीची एक वीज शहारून जाते, असं वाटतं जणू बाबाच आता तिच्यात संचारले आहेत..

इतक्यात श्री. महाजन केबिन मध्ये येतात..

“नमस्कार मॅडम, मी तुमचा PA..तुमचं सर्व वेळापत्रक, कार्यक्रम, दौरे मी सांभाळतो. आता पुढील पाच वर्षांचं वेळापत्रक तयार आहे..”

“नमस्कार…काय कार्यक्रम आहेत मग पुढील पाच वर्षे?”

“पुढील महिन्यात नागपूर मध्ये नवीन कॉलेज चं उदघाटन, नंतर कर्नाटक दौरा, एक विदेश दौरा, नव्या शासकीय इमारतीचं उदघाटन…”

“रद्द करा सगळं..”

“काय??”

“मला सांगा, ही सगळी उदघाटनं आणि दौरे मिळून किती दिवस होतात??”

“साधारण 500-550 दिवस..”

“म्हणजे दोन वर्ष फक्त ही उदघाटनं करत राहायची…मग जनतेसाठी कामं करायला खाक वेळ उरतो…मुख्यमंत्र्याला लोकांनी एक ब्रँड ambassador बनवून ठेवलं आहे…मुख्यमंत्री झाला की त्याला आपल्या बिझनेस च्या उदघाटनाला बोलवायचं, म्हणजे स्वतःचीच लाल करून घ्यायची….”

श्री. महाजन कपाळावरच्या घाम पुसतात..

“ठिके मॅडम, सगळं रद्द करतो..”

“आणि हो…मला माझा पूर्ण वेळ जनतेच्या कामांसाठी द्यायचा आहे…त्यामुळे मध्ये ही असली थेरं आणायची नाही..”

“हो…”

“अजून एक…उद्याच्या उद्या महाराष्ट्र शिक्षणसमिती चे मेम्बर्स आणि शिक्षण व्यवस्थेतील तज्ञ मंडळी यांना तातडीने बोलवा…”

“उद्याच??”

“हो…का? समुद्रापार राहतात का ते..”

“बोलावतो..”

दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भवन मधील कॉन्फरन्स मध्ये सर्व तज्ञ मंडळी आणि मेम्बर्स बसलेले असतात..

तेजु येताच सर्वजण उभे राहतात..

“बसा..तर जास्त वेळ न दवडता आपण मुद्द्यावर येऊ…माझं असं मत आहे की आजची शिक्षणव्यवस्था ही फक्त घोकंपट्टी पुरती उरली आहे..प्रात्यक्षिक असं काही उरलंच नाहीये…यात बदल व्हायला हवा..”

“नक्कीच…” सर्व मंडळी म्हणतात…

“आता एकेकाने पुढे येऊन या बोर्ड वर तुम्हाला ज्या काही कल्पना मांडता येतील त्या मांडा..”

एक आघाडीचे शिक्षणतज्ञ पुढे येतात…

“आपल्या राज्याचा शिक्षणाचा आलेख हा मागील वर्षी 65.6 % होता..आता यात वाढ झाली आहे…शासनाचे नियम, जागतिक प्रश्न आणि सामाजिक उलथापालथ यामुळे शिक्षणाचा IH score हा 6 टाक्यांनी घसरला आहे…IH score म्हणजे…”

“तुम्ही बसा….नेक्स्ट…”

तेजु त्या तज्ञाला थांबवून बसून घ्यायला सांगते..

दुसरा उठतो..

“तर…आपली शिक्षणव्यवस्था ही युरोपियन देशांशी तुलनात्मक रीत्या काही अंशाने चांगली आहे…जर आर्थिक निकषानुसार वर्गीकरण केलं तर…”

“बसा तुम्ही..नेक्स्ट..”

एकेक करून तज्ञ मंडळी अपमानित होत होती… अखेर तेजु कंटाळून सर्वांना म्हणाली…

“तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ आहात… पण म्हणून काही तुमचं ज्ञान किती प्रगाढ आहे हे दाखवायला इथे येऊ नका…आधी काय झालं, आता काय होतंय, कसला किती टक्का याच्याशी काहीएक घेणं नाहीये मला…मला फक्त solution हवंय…आहे का कुणाकडे ठाम सोल्युशन??”

एक जण उभा राहिला..

“मॅम, खरं सांगायचं तर…यावर काहीच सोल्युशन नाही..”

“का?”

“कारण एक गोष्ट बदलायची म्हणून बाकीच्या 100 गोष्टी बदलाव्या लागतात…शिक्षणाशी संबंधित असलेल्या व्यवसायांचा विचार करावा लागतो…त्यांना किती तोटा होऊ शकतो हे पाहावं लागतं….”

“थोडक्यात शिक्षणाचा बाजार बनवून ठेवलाय तुम्ही…”

सर्वजण मान खाली नेतात..

“निघा तुम्ही..महाजन….हे सगळे गेले की तुम्ही केबिन मध्ये या..”

महाजन केबिन मध्ये जातात..

“येस मॅम..”

“दुसरी एक बैठक घ्यायची आहे…शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांची..”

“पण ही तर सगळी तज्ञ होती..”

“नाही…ही फक्त ज्ञान सांभाळून बसलेली लोकं आहेत…त्याचा वापर त्यांनी स्वतःच्या डोक्याबाहेर केलाच नाहीये…”

“मग कुणाला बोलवू??”

“खेड्यात जा…तिथे बदली करून मुलांना कळकळीने शिकवणारे शिक्षक असतील त्यांना बोलवा…आदिवासी भागात शाळा उभी करून शिकवणाऱ्या शिक्षकांना आमंत्रण द्या…”

क्रमशः

धुरा (भाग 7) ©संजना इंगळे

2 thoughts on “धुरा (भाग 6) ©संजना इंगळे”

Leave a Comment