टाळ्यांचा कडकडाटाने तेजु भानावर येते…आपण हे काय बोलून गेलो? हे ठरवून बोललेलं नाहीये…हे सगळं आतून आलं…कसं बोललो आपण हे सगळं? नाही….हे मी नाही…माझ्या मधून बाबाच बोलून गेले…
तेजु समोर आता खूप मोठं आव्हान होतं, ज्या गोष्टीचा तिला नेहमी तिटकारा वाटत होता आज त्यालाच ती जाऊन भिडली होती.. पण राजकारण म्हणजे इतकं सोपं नव्हतंच तिच्यासाठी..दररोज एक नवीन आव्हान, दररोज एक नवीन प्रश्न….
नाईकांच्या पक्षातच अनेक मतभेद होते, जो उमेदवार नाईकांनंतर मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार होता त्याला हे सर्व घडल्याने प्रचंड मनस्ताप झालेला…तेजु यात उतरणार नाही याची त्यांना खात्री होती आणि पुढचं सगळं नियोजन त्यांचं झालं होतं… पण तेजु ने हा निर्णय काय घेतला, त्याच्या सर्व मनसुब्यांवर पाणी पडलं…
“तेजु…मला माहितीये तू सभेत जे बोलली तो तुझा आतला आवाज होता…. पण राजकारण इतकं सोपं नाही मुली, इथे खूप खस्ता खाव्या लागतात, खूप शत्रू निर्माण होतात, प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो..”
“आई…मला हे सगळं जरी माहीत नसलं तरी बाबांसाठी मला हे सगळं करायचं आहे…जोवर महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर ठेवत नाही तोवर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही…बाबांचा जीव या जनतेत अडकला आहे…आणि त्यांची धुरा पेलणं हे माझं कर्तव्य आहे..”
“खूप लहान वयात फार मोठी समज आलीये मुली तुला..”
“बरं आता पुढे काय?”
“निवडणूकीची तयारी…प्रचारासाठी तुला फिरावं लागेल..”
“त्याची खरंच गरज आहे?”
“आपला विजय निश्चित आहे…पण तरीही..”
“आई कसलीही शंका घेऊ नकोस…आपण यावेळी प्रचारात वेळ घालवायचा नाही…”
“मग काय करायचं?”
“माझ्यावर विश्वास आहे?”
“हो..”
“मग मी सांगते तसं करा…पुढचे काही दिवस कसलीही हालचाल करू नका…मला बाबांच्या खोलीत राहू द्या…मला अभ्यास करायचा आहे…”
“कसला?”
“आजवर महाराष्ट्रात जे राजकारण झालं त्याचा…महाराष्ट्रात कुठले प्रोजेक्ट्स झाले, त्याची किती प्रगती झालीये, सद्य प्रश्न कोणते आहे, त्यावर उपाय काय करता येतील या सगळ्याचा अभ्यास..”
“पण..”
“काय झालं?”
“हे सगळं निवडून आल्यावर ना? आधीच हे सगळं करायचं म्हणजे…”
“माझ्यावर विश्वास ठेव..”
आई बाबांच्या फोटोकडे एकदा पाहते.. आणि तेजु ला होकार देते..
तेजु बाबांच्या खोलीत अन ऑफिस मध्ये तासनतास घालवते…घरातल्या नोकरांना बजावून सांगितलं होतं की तेजु साठी सगळं जागेवर नेऊन द्यायचं…तेजु ने बाबांच्या सर्व फाईल्स बघितल्या, त्यांची डायरी बघितली. आजवरच्या राजकारणात काय घडामोडी झाल्या, त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला…
अशातच तिच्या हातात एक फाईल लागली..त्याचा अभ्यास केल्यावर तिच्या लक्षात आलं की रस्ताबांधणी निधी मध्ये बराच घोटाळा करण्यात आलेला…लाखो रुपये खिशात घालण्यात आले होते… तिला धक्काच बसला…
बाबा असं करणं शक्यच नाही..मग ही फाईल इथे??
तिने आईला ते दाखवलं..आईचाही विश्वास बसेना..
“नाईक साहेब असं करणं शक्यच नाही…हे काम त्यांचं नाही..”
“मला माहित आहे आई..पण हे सगळं कोण करत असेल??”
इतक्यात बाहेर पोलीस येतात आणि झडती घेण्याचं कारण सांगतात…
“झडती?? कसली झडती??”
“सांगायला वाईट वाटतंय पण हे खरं आहे…नाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे…दुर्दैवाने त्यांच्या जाण्यानंतर तो पुढे आला..”
तेजु ला समजतं की त्यांना मुद्दाम अडकवण्यात आलं आहे..ती पटकन तिच्या हातातली फाईल मागे घेते आणि मागून तिच्या टॉप मधून पाठी जवळ लपवते…दोन्ही हात गच्च आवळून हाताची घडी घालते…. पोलीस सर्व शोधाशोध करतात…पण त्यांच्या हाती काहीही लागत नाही…आई तेजु कडे बघते…तेजु आईला शांत राहायचा इशारा करते…
पोलीस जातात…
“तेजु…ती फाईल का लपावलीस?? नाईक साहेब कधीही असं खोटं वागले नव्हते..”
“म्हणूनच त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले होते…ही फाईल कुणीतरी मुद्दाम आपल्या ऑफिस मध्ये ठेवली होती..साधारण मागच्या आठवड्यात…कारण त्या आधी मी ही फाईल कधीच इथे पाहिली नव्हती…”
तेजु पटकन कॉम्प्युटर चालू करते आणि cctv फुटेज बघते…तिच्या लक्षात येतं… मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून ज्याला निवडण्यात येणार होतं हे त्याचंच काम होतं…
“अच्छा…असं आहे तर..”
“गोविंद?? नाईकानंतर भरवशाचा माणूस म्हणून आम्ही त्याचाकडे पाहायचो…आणि त्याने असं वागावं???”
“आई..सत्ता फार बुरी चीज आहे…सत्तेसाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो…ही फाईल मुद्दाम इथे ठेवली..जेणेकरून नाईकांची बदनामी झाली असती आणि माझ्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला असता…”
“राजकारण समजायला लागलं की तुला..”
“होय…आता मीही या गेम मध्ये उतरणार…बघू…कुणाची बिशाद आहे या नाईकांच्या मुलीला भिडण्याची…”
गोविंद ला धडा शिकवण्यासाठी तेजु एक योजना करते आणि ती पुढील आठवड्यात पूर्ण करायची असं ठरवते..तोवर ती आपला अभ्यास चालू देते….तासनतास ऑफिस मध्ये बसून ती कसलं तरी काम करत असते…ती नक्की काय करते आहे हे आईलाही ती सांगत नाही…
“तेजु..अगं मला कळू दे तू नक्की काय करते आहेस ते..”
“आई…निवडणुकीच्या काही दिवस आधी मी हे जनतेसमोर आणणार आहे..आत्ता मला काहीच विचारू नकोस..”
क्रमशः
Khup ch chhan next part aturta Ma'am