धाकली जाऊ

 थोरल्या जाउबाई कायम आपल्या धाकल्या जाऊची ईर्षा करत. तसं पाहिलं तर धाकली वर्षा साधी सरळ आणि शुद्ध मनाची होती, तिचा नवरा मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आणि साहजिकच चांगला पगार. दोघेही भाऊ वेगवेगळ्या शहरात राहत, सणावाराला दोघे भाऊ आपापल्या बायका मुलांना घेऊन गावी जात. 

धाकला मनीष म्हणजेच वर्षाचा नवरा लहानपणापासून अभ्यासात हुशार, त्याच्या तल्लख बुद्धीने त्याने खूप प्रगती केली आणि सहजपणे स्वतःचं घरही झालं. थोरला राकेश मात्र अभ्यासात कच्चा होता. त्याने फार काही प्रगती केली नव्हती, कुणाच्या तरी आग्रहाखातर एक कोर्स केला आणि त्या आधारावर एका कंपनीत रुजू झाला. हुद्दा आणि पगार दोन्हीही तसे कमीच होते. पण त्याच्या या परिस्थितीला साथ द्यायचं सोडून थोरल्या जाउबाई सतत त्यांना दोष देत, कारण एकच…”तुमच्या धाकल्या भावाला इतकं शिकवलं मग तुम्हाला का असं वाऱ्यावर सोडलं?” धाकल्या मनीषची प्रगती, त्याच्या बायकोचं चार चौघात मिरवणं, आणि नुकतंच स्वतःचं घेतलेलं घर याची प्रचंड जळवणूक थोरल्या जाउबाईंना होत होती. आपण थोरले असून भाड्याच्या घरात राहतोय आणि ती दोघे अगदी राजासारखा संसार करताय..जाऊबाईंच्या मनातील हा द्वेष अगदी विनाकारण होता. आता राकेश अभ्यासात हुशार नव्हता, त्याने अभ्यास केला नाही आणि प्रगती केली नाही यात वर्षाचा काय दोष?
दिवाळी आली तसे दोन्ही भाऊ गावी जायची तयारी करू लागले. वर्षाला 12 वर्षाची एक मुलगी आणि थोरल्या जाउबाईंना 16 वर्षाचा मुलगा होता. गावी गेल्यावर वर्षाने थोरल्या जाउबाईंना नमस्कार केला , त्यांना त्यांचा मान दिला पण थोरल्या जाउबाईंना तिला पाहताच नको नको झालं. तिच्या अंगावरचे कपडे, भारीतले दागिने, महागडी पर्स पाहुन जाउबाईंना अजून कसतरी झालं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी ते लपवलं. थोरल्या जाउबाई वर्षाशी यम स्पर्धा करत. ती कशी माझ्याहून हलकी आहे हे सासरी दाखवण्याचा तिचा प्रयत्न असे. मग तिच्या मुलाला हाती घेऊज तिने तिचा खेळ सुरू केला.
“सुशांत बाळा, जा आजी आजोबांचे पाय पड..”
सुशांतने पाय पडले,
“अरे फक्त आजी आजोबा नाही, सर्वांचे पड..”
थोरल्या जाउबाई एकेक ऑर्डर देत होत्या आणि सुशांत ते ते ऐकत होता. माझा मुलगा जास्त संस्कारी आहे, आम्ही त्याच्यावर खूप चांगले संस्कार केलेत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 
आजीने सर्वांना पाणी आणून दिलं, सुशांत आणि वर्षाची मुलगी स्वरा दोघांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. थोरल्या जाउबाईंनी चटकन बॅगेतून सोनपापडी काढली आणि सासऱ्यांसमोर धरली..
“बाबा, तुम्हाला आवडते म्हणून आणली..बाकी कुणाला माहीत नसलं तरी मला तुमची आवड निवड माहितीये बरं का..”
वर्षाला टोमणा बसेल असं ती बोलली. सासरेबुवा हसले आणि चटकन एक सोनपापडी तोंडात टाकली.
एकदम मोठा घास गेल्याने त्यांना ठसका लागला. त्यांनी सुशांत च्या खांद्यावर हात ठेवला आणि काहीतरी सांगू लागले, सुशांत आईकडे पाहू लागला..आई त्याला काहीतरी सांगू लागली पण त्याला समजेना..तेवढ्यात स्वरा पुढे आली आणि आजोबांच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला. आजोबा शांत झाले, पाणी पिऊन त्यांना बरं वाटलं. 
“सुनबाई..गुणाची आहे हो तुझी पोर..”
स्वराचं कौतुक जाउबाईंना ऐकवलं गेलं नाही. माझ्या मुलाने इतकं सगळं करून त्याचं कौतुक मात्र नाही, तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसत होते. सासरेबुवांनी ते ओळखलं आणि म्हणाले..
“मुलांवर संस्कार बळजबरीने केले जात नाहीत, ते आपोआप घडत जातात. आई वडिलांचं अनुकरण म्हणजे संस्कार, आई वडिलांचं वागणं म्हणजे संस्कार, आई वडिलांची वाणी म्हणजे संस्कार..ते ना लादले जातात ना बोलले जातात…ते फक्त अनुसरले जातात…”
थोरल्या जाऊबाईंचा चेहरा पडला, मग वर्षा पुढे आली..
“हो बाबा अगदी खरं, म्हणूनच आपला सुशांत, आल्या आल्या सर्वांच्या पाया पडला. आपल्या आईच्या आदेशाचं पालन केलं.. त्याची मातृभक्ती दिसून येते..आपल्या सुशांतला पाहिल्यावर मला तर प्रभू श्रीरामच आठवतात..”
वर्षाच्या या बोलण्याने थोरल्या जाउबाई ओशाळल्या. त्यांच्या मनातील द्वेष कमी झाला असेल वा नसेल, पण संस्कार काय असतात हे मात्र तिला आज अचूक समजलं. 

1 thought on “धाकली जाऊ”

Leave a Comment