दैवलेख (भाग 15)

 #दैवलेख (भाग 15)

सईने लग्नाची बातमी देवांगच्या घरी येऊन सांगितली, पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. सई एकटी तेवढी उसळ्या मारत होती. देवांग आता कचाट्यात सापडला, सईला लग्नाचं वचन देऊन ठेवलेलं आणि इकडे साखरपुडा वैदेहीसोबत केलेला. सईने बातमी दिली, देवांगकडे पाहिलं.. आणि म्हणाली,

“काय रे ही मुलगी कोण?”

देवांग मौन राहिला, देवांगच्या आईने ठसक्यात सांगितलं..

“देवांगची होणारी बायको आहे ही..”

सईला धक्का बसला, 

“देवांग? काय प्रकार आहे हा?”

देवांगने मन घट्ट करत सांगितलं..

“होय, मी हिच्याशी साखरपुडा केलाय..”

सईचा संताप अनावर झाला,

“मूर्खासारखं बोलू नकोस, मी तुला काय समजत होते आणि तू किती नीच निघालास? लग्नाचं वचन माझ्याशी आणि लग्न दुसरीशी? वा…देवांग तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..पण तुला सोडणार नाही मी, पोलीस केस करेन तुझ्यावर, मला फसवलं म्हणून आत टाकेन तुला..”

हे ऐकून घरातले सगळे घाबरले, काय करावं काय बोलावं कुणाला सुचेना..तोच मागून आवाज आला..

“केस तर आम्ही करणार आहोत सई तुझ्यावर..”

सर्वांनी दाराकडे पाहिलं, तिथे देवांगचा चुलत भाऊ आदेश उभा होता..तो आत आला आणि देवांगला म्हणाला,

“देवांग, आपण एकाच ऑफिसमध्ये आहोत..सई चे सगळे कारनामे मला माहित आहे, पण तुझी मैत्रीण म्हणून तुला काही बोललो नाही मी..”

“क..क…कसले कारनामे? काय बोलतोय?” – सई घाबरत म्हणाली…

“सांगतो सगळं, देवांग, तू सुट्टीत घरी आलेलास तेव्हा राजेश ने कंपनीला डिझाइन्स दिलेले, ते त्याला जमणारे नव्हते..म्हणून त्याने सईला पैसे देऊन तुझ्याकडून आयडिया काढून घेण्यास सांगितले…सईला तुझ्यासोबत लग्न करण्यात इंटरेस्ट नाही, तिला इंटरेस्ट आहे तुझ्या पैशात, तुझ्या पगारात.. कंपनीत तू हुशार आहेस, तुला पटापट बढती मिळते आणि म्हणून ही तुझ्यासोबत आहे. तू सुट्टीवर होतास तेव्हा राजेश सोबत ही फिरायची, त्याच्याकडून पैसे काढून घ्यायची…आता कंपनी तुला एका कामासाठी परदेशात पाठवणार आहे, ही गोष्ट तुला माहीत नाही पण ऑफिसमध्ये ही बातमी सई च्या कानावर आली, तिलाही तुझ्यासोबत यायचं होतं, म्हणून आता लग्नाची घाई करतेय ही…आणि तू उगाच हिच्यात अडकून पडलास..एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे ही…अश्या कित्येक मुलांना लग्न करेन म्हणून खोटी आश्वासनं देऊन ठेवलेली हिने…”

हे ऐकताच सई घाबरली, आपलं पितळ उघडं पडलं म्हणून कावरीबावरी झाली…काहीही न बोलता तिथून निघाली..तोच देवांग म्हणाला..

“आणि मी समजत होतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यासारख्या भोलवट माणसाला खोट्या प्रेमात अडकवताना तुला लाज नाही वाटली? आज मला समजलं, मला चित्रात ती काटेरी वाट कोणती होती , वादळ कोणतं आणि चाफ्याची फुलं कोणती…” वैदेहीकडे त्याने एक कटाक्ष टाकून तो हे म्हणाला…

सई मान खाली घालुन तिथून निघून गेली..आता घरातलं मोठं संकट मिटलं होतं.. वैदेही आणि देवांग शेवटी एक होणार होते..वैदेहीला अश्रू आवरत नव्हते, मनासारखी गोष्ट होण्याची तिला सवयच राहिलेली नव्हती..देवांगच्या आईने तिला जवळ घेतलं…तिचे डोळे पुसले..देवांग सुद्धा डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे बघत राहिला..

“हीच ती…सुटलेली ट्रेन, सुटत चाललेलं काहीतरी..आणि पुन्हा गवसलेला चाफा..”

आजीला हे सगळं ऐकून आनंद झाला..त्या देवांगच्या आईला म्हणाल्या,

“हे सगळं होणारच होतं गं… दैवलेख कधी कुना टळला..”

देवांग आणि वैदेही त्याच्या खोलीत गेले, वैदेहीला देवांगने घट्ट मिठी मारली आणि म्हणाला,

“त्या दिवशी ट्रेनमध्ये तू भेटलीस, तेव्हाच मनात काहीतरी चलबिचल झालेली..पण सई मुळे मी सगळ्या भावना रोखून धरत होतो… आजी म्हणलेली की आपलं लग्न कधीच झालंय, अगदी पोटात असतांना… तेव्हा ऐकतांना स

हसू यायचं, पण आता समजतंय…लग्न बंधनात एक अदृश्य अशी अतूट शक्ती असते जी कोणत्याही परिस्थितीत नवरा बायकोला एकत्र आणते…”

घरात सगळे कामात असताना आदेश हळूच आजीकडे गेला…

एकमेकांना बघून त्यांनी हातावर टाळी दिली..

“आदेश, बरं झालं तू मला सई बद्दल सांगितलं, नाहीतर मी वैदेहीचा विषय काढून हट्टीपणा केलाच नसता…आणि पुढचं सगळं झालंच नसतं… त्यांचं पोटात लग्न झालेलं पण लग्नाचं त्याला उशिरा सांगणार होते, सई चं प्रकरण समजलं आणि मी आकांडतांडव केला..शेवटचे दिवस मोजतेय असं दाखवलं….त्याशिवाय पुढचं सगळं झालंच नसतं इतक्या लवकर…शेवटी वैदेही झाली की नाही आपली?” आजी चुटकी वाजवत म्हणाली..

आदेशने दोन्ही हात जोडले,

“आजी तू धन्य आहेत..”

समाप्त

1 thought on “दैवलेख (भाग 15)”

Leave a Comment